Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

चिंगी आणि टिंग्या (लव्हस्टोरी)

चिंगी आणि टिंग्या (लव्हस्टोरी)

7 mins
1.0K


"काय रे ए टिंग्या सगळे शेंगदाणे संपवलेस भेळ मधले. नेहमीच आहे तुझं, मी खाईन म्हणून आधी सगळे खातोस जा मला नको आता भेळ. खा तूच😏" "अग चिंगे मी कुठे तूच संपवलेस, उलट मी तुला शोधून द्यायच्या नादात खाल्लेच नाहीत. नेहमीच तुझंच आहे, खायचं स्वतः आणि मला ओरडायच." "हा हा बस कर आता... मला फक्त शेंगदाणे घेऊन दे, मला काही माहीत नाही. तुझे तेच नेहमीचे डायलॉग ऐकून कान बधिर झाले माझे." "अरे दादा फक्त शेंगदाणे द्या ओ मॅडमना. आणि मला अजून एक भेळ." "आता तुला भेळ का पाहिजे? माझ्यासाठी शेंगदाणे बास". "चिंगे मला माहितीये शेंगदाणे संपले की तू या भेळकडे वळणार. मला काय खाऊ देणार नाहीस म्हणूज अजून एक भेळ घेतली." "कसला भारी आहेस रे तू टिंग्या. कसं एवढं चांगलं ओळ्खतोस तू मला😀". "बाई पस्तीस वर्षे संसार केला ना तुझ्यासोबत मग चांगलंच ओळखतो तुला". "ए टिंग्या तू उपहासाने बोललास ना हे असं पस्तीस वर्ष संसाराचं? तुला बर नाही वाटत का एवढा चांगला संसार केला आपण?" "चिंगे नेहमीच तू असा गैरसमज करून घेतेस. मी चांगल्या मनाने बोललो ग. तुला घाबरून नाही. आता मी तुला घाबरतच नाही मुळात." "हा टिंग्या शाळेत घाबरायचास मला माहितीये. आणि आताही घाबरतोसच." "चिंगे शाळेत तुला कोण घाबरत नव्हतं अस आहे का? तू होतीसच तशी डांबरट. सगळ्यांच्या खोड्या काढणारी,मारणारी, भांडखोर मुलगी. आठवतंय का रस्त्याने दगड पायाने पुढे ढकलत चालायची सवय होती तुला आणि तोच दगड एक दिवस फेकून मला मारलेलास. खूप राग आलेला तेव्हा तुझा😡". "😀अरे हो , तीच तर पहिली भेट आपली. तू एवढा हुशार आणि sincere मुलगा होतास शाळेत,कोणाशी बोलायचा नाहीस ...म्हंटल बघू खोड काढुन तुझी, बोलता येत का तुला😀". "हा आणि मुदाम खोड काढून पण तू खोटं बोललीस की चुकून लागला. माफी नाही मगितलीस माझी. पण तेव्हा तुझा राग येण्याऐवजी घाबरलोच होतो मी. एवढ्या भांडखोर मुलीसोबत काय बोलायचं म्हणून मी तुला सोडून दिलेलं. पण तुझ्यात काहितरी वेगळं होत जे मला तुझ्याकडे घेऊन यायचं. तू भांडखोर होतीस पण प्रेमळही होतीस. गरज असेल त्यांना तू मदत पण करायचीस. शाळेत मी असाच एकटक तुझ्याकडे बघत बसायचो. तेव्हा हे प्रेम वगैरे काही कळत नव्हतं पण फक्त बघतच राहायचो तुझ्याकडे". " हो तू बघायचास ते मलाही कळायचं आणि म्हणून मी तुला एकदा बोललेही होते डोळे फोडेन तुझे😆". "हो म्हणून तुझ्याशी बोलायची कधी हिम्मतच मी केली नाही. पुढे जाऊन कॉलेज मध्येही माझा पिच्छा सोडला नाहीस. तिथे तुला बघून छान तर वाटलेलं पण भीतीही वाटलेली. त्यात त्या एका मुलाने तुझी छेड काढलेली तर तू त्याचा गालच रंगवलेलास. त्या दिवसापासून तर तुझ्याशी मैत्री करण्याचीही हिम्मत झाली नाही. आणि हे सगळं कमी होत म्हणून कॉलेजच्या नाटकात माझी हिरोईन म्हणून तुला घेतलेल. तेव्हा तर कपाळावर हातच मारून घेतलेला. सरांना जाऊन सांगितलं दुसरी मुलगी घ्या तर ते बोलले हव तर तु जा पण तो रोल ती मुलगीच करेल. मला हिरोचा रोल सोडायचा नव्हता म्हणून धाडस केले तुझ्यासोबत काम करायचं😁" "हो ना मी पण तुला नाटकात बघून वाटलेलं याला काम येत असेल कां तरी🤔. पण नंतर काय माहीत होतं की तुझ्या अभिनयाच्याच मी प्रेमात पडेन. नाटकात इतका हरवून जायचास तू की जेवणाचीही आठवण व्हायची नाही तुला. हळूहळू मी पण शांत होऊन तुझ्याशी बोलायला लागले आणि मैत्रीचे सूर जुळले आपले. मी ही नाटक करताना तुला पाहतच राहायचे. मैत्रिणी चिडवायच्या मला तुझ्या नावाने पण हे प्रेम वगैरे असलं काय नसत म्हणून मी त्यांनाच झिडकारून लावायचे. आठवत का तुला.. एकदा नाटकाच्या प्रयोगा वरून येताना पाऊस खूप होता आणि माझ्याकडे छत्री असून तू तुझं जॅकेटही मला दिल होतस.मला खर तर भिजायचं होत पण तू भिजू नाही दिलस आणि म्हणालास तू भिजलीस की आजारी पडशील आणि मग मी दुसरी हिरोईन शोधेन. तुझ्यासोबत दुसर कोणीतरी?🙄....मी कल्पनाच पण करु शकत नव्हते. केवळ तेवढ्यासाठी मी पावसात भिजले नाही. तेव्हा नाही कळलं की हेच प्रेम पण त्यादिवशी रात्रभर झोपले नाही. मैत्रिणीला माझ्या मनाची घालमेल समजली आणि ती तेव्हाच बोलली तू त्याच्या प्रेमात पडलेस पण तुला ते वळवून नाही घ्यायचं. आणि खरंच मी ते कळूनही वळवून नाही घेतलं. कॉलेज संपल्यावर मी पुण्याला गेले पुढील शिक्षणासाठी... तेव्हा मात्र तुला खूप मिस करायचे. ती नाटकं, तुझ्यासोबतचे क्षण सारखे डोळ्यासमोर तरळायचे.तुझी सोबत हवीहवीशी वाटायची. तुला हे सगळं सांगायचं होत पण तेव्हा फोनही नव्हते. भेटताही येत नव्हतं. मी जे अनुभवते तेच तू अनुभवतोयस का याचाही विचार करायचे पण तू नाही म्हणालास तर.... हा विचार कधीच नाही आला मनात😃. काही दिवसांनी आपलं गेट टूगेदर होत. ही संधी सोडायचीच नाही असं मी ठरवलेलं. तुला भेटून सगळं काही सांगायचं असा निश्चय करूनच निघाले. मी पावसात भिजत आलेले पुण्यावरून. तू समोर दिसताच भान हरपलेलं पण आज बोलायचं ठरवलेलंच. तुला बाजूला घेऊन सांगितलंही की मी तुला मिस करते, तुझी तिकडे खूप आठवण येते. पण तूझ एकच चाललेलं अग एकटी आहेस तिकडे,नवीन आहे सगळं अजून म्हणून तस होत असेल. तुला कळून घ्यायचं नव्हतं काहीच. तेव्हा मीच रागवून बोललेले अरे मूर्खा माझं तुझ्यावर प्रेम आहे कळत नाही का? मला वाटत पहिलं आणि शेवटचं प्रपोज तस असेल😀" "होना आणि मीही घाबरत तुला हो पण बोललेलो. इतके दिवस माझ्या भावना मी अव्यक्तच राहून दिलेल्या तुला मैत्रीण म्हणून गमवायच्या भीतीने. त्यानंतर आपला पुणे मुंबई प्रवास सूरु झाला. प्रेमात भेटण्याची अधीरता तेव्हा अनुभवली.वाटलं नव्हतं कधी तुझ्यासोबत प्रेमाच्या पावसात चिंब भिजायचेही दिवस येतील😍." "टिंग्या सारख्या शांत,सोज्वळ,गरीब मुलाच्या प्रेमात मीही पडेन अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रे😄. आपली भांडणही झाली,थोडा रुसवा फुगवाही झाला. जास्त करून मी भांडले आणि तू मनवलस. तू मनवावं म्हणूनच मी कधी कधी भांडायचे. नुसतं मुळुमुळु प्रेम मला नसत जमल बुवा😂. प्रेम तर फुलत होत आणि आता लग्न करायची वेळ आलेली. आपल्या दोघाना माहीत होतं की आपल्या आंतरजातीय विवाहाला घरून मान्यता मिळणार नाही. म्हणून मी तुला बोललेले सरळ cकरू". "अग हो पण ते मला नाही पटत. आपल्या सुखासाठी आई वडिलांना त्रास आणि त्यांचा अपमान होणं हे कुठेतरीं मनाला रुचत नव्हतं आणि ती सल मनात घेऊन आपला संसारही करू शकलो नसतो. म्हणून दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही या अटीवर ठाम राहून त्यांची मान्यता घ्यायची असा निर्णय घेतला. आणि तो यशस्वीही झाला. एक वर्ष घेऊन ते शेवटी तयार झाले बघ लग्नाला. तेव्हा खर वाटत नव्हतं की तुझ्याशी लग्न होतंय. ज्या मुलीने मजेत म्हणून मला दगड मारला त्याच मुलीसोबत जन्मोजन्मीची गाठ मी मारत होतो😅." "हो अविश्वसनीय होत खरं आपलं लग्न पण झालं आणि तेही आपल्याला हवं तसं. खूप बडेजावकी न करता लग्न साधेपणाने करून आपण लग्नाच्या पैश्यांनी गरीब मुलांना मदत केलेली. आपले विचार सगळीकडे जुळत होते. न सांगता बऱ्याच गोष्टी आपल्याला एकमेकांच्या कळायच्या म्हणून तर तू मला आवडायचास. लग्नानंतरही प्रत्येक निर्णयात तू साथ दिलीस मला. माझे छंद जोपासायला, जे आवडत ते करायला,नोकरी करायला सगळ्यात मला तुझा पाठिंबा होता आणि म्हणून तर संसाराचं ओझं कधी वाटलं नाही मला." "अग चिंगे मीच काय तू पण तर साथ दिलीस मला आपल्या संसारात. संसार वेलीवर फुलं उमलली तशी तू तुझी नोकरी सोडलीस. मला नाटकाच्या प्रयोगासाठी कितीतरी दिवस घराबाहेरच राहावं लागायचं तेव्हा तूच तर सांभाळलस आपलं घर,मुलं. त्यांच्यावर चांगले संस्कार केलेस,योग्य शिक्षण दिलस. तू आहेस सगळं सांभाळायला या विश्वासाने मी बिनधास्त बाहेरची लढाई लढू शकलो. वेडे संसार दोघांचा असतो आणि यालाच तर सहजीवन म्हणतात ना. तू मला न मी तुला साथ देणं. एकमेकांना पाठींबा देणं😊" "हो टिंग्या खरंतर आपल्यात तू जास्त समजूतदार आणि मी न थांबणाऱ्या अथांग सागरासारखी. तू आलास आणि आयुष्यात कुठे थांबायला हवं आणि कुठे नको हे कळलं. माझ्यासारख्या वादळाला पेलण काय सोप्पी गोष्ट होती का😛 पण तू निभावलस हो तेही अगदी छान." "बाई तुझ्याशी लग्न करतानाही माझ्या मनात जरा धाकधूक होतीच. भांडखोर , आगाव मुलीशी लग्न करतोय....नक्की टिकेल ना? स्वतःला हा प्रश्न डोक्यावर अक्षदा पडतानाही विचारत होतो😄. पण म्हंटल ना तू चिडखोर असलीस तरी प्रेमळ खूप आहेस. हळवी आहेस. योग्य अयोग्यची समज आहे तुला आणि मुळात बिनधास्त आहेस जे माझ्या मनाला नेहमीच भावत. निभावलं आपण दोघांनीही लग्नाचं हे दिव्य😀." "टिंग्या मी एवढी पण भांडखोर आहे का🙄? सारख बोलतोयस भांडखोर,चिडखोर. हा आहे स्वभाव असा त्याला काय करणार😅. पण सप्तपदीच्या वेळी दिलेलं वचनं निभावलं की नाही बघ मी. साथ दिली ना प्रत्येक चांगल्या वाईट काळात. सोडून नाही ना गेले तुला😂" "आता जातेस ना पण चिंगे सोडून? नको ना ग जाऊ. एकदा विचार कर तू गेल्यावर माझं काय होईल. मुलं तर आपआपल्या संसारात रमली ग. माझं मन कुठे रमवु तू गेल्यावर तूच सांग. एकट्याला सोडून नको ना जाऊ😥". "अरे टिंग्या रडू नकोस. आपलं काय ठरलंय या विषयावर बोलायचं नाही,रडायचं नाही. संकट येईल त्याला धीराने सामोर जायचं दोघांनी. अरे मला कॅन्सर सारखा आजार आहे हे माहीत झालं म्हणून आपण प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखं जगतोय. रोज या समुद्रकाठी येऊन भेळ खात जुन्या आठवणींना उजाळा देतो. संसाराची बेरीज,वजाबाकी मांडत बसतो. तुझं माझं काय चुकलं याची उजळणी करत माफीही मागतो. पण ज्यांच्या नशिबी अचानक जाणं असत त्यांना ही उजळणी करायला मिळते का बघ. खूप काही बोलायचं,द्यायचं मागे राहून जात त्यांचं. तस आपल्या सोबत होत नाहीये यातच समाधान मानून हसत जगायचं रे.

संसाराच्या या प्रवासात कोणा तरी एकाला मागे राहावं लागतं कोणाला तरी पुढे जावं लागतच. वाट्याला आलेलं तेवढं भरभरून जगावं अस तूच म्हणतोस ना आणि आता हतबल होतोयस. अस नको करू. आपल्या वाटणीचा संसार आपण कोणाचीही दृष्ट लागेल असा केला. उलट अरे त्याच आठवणी जगायलाही तुला दिवस कमी पडतील एवढं देऊन चालले मी. माझ्यानंतरही तुझं आयुष्य कोणत्याश्या कोपऱ्यात बसून घालवू नको बघ. तुझं नेहमीच फिरायला जाणं, नाटकं लिहिणं, नाटकं बघायला जाणं, नातवंडांकडे जाणं सगळं नियमित चालू ठेव आणि मग एक दिवस भेटू आपण पुन्हा दोघे😀. मी असेन अशीच तू म्हणतोस तशी भांडखोर तुझ्याशी भांडायला😅. हे बघ शेंगदाणे संपले मला अजून हवेत दे आताच्या आता." "ओ दादा द्या अजून शेंगदाणे मॅडमना😊". ©सरिता सावंत भोसले


Rate this content
Log in