चिमणाई...!.
चिमणाई...!.


सकाळ पासून पोटाला काही मिळतय का अस पहात ती दीड एक तास भिरभिरत होती....जवळ जवळ तीस पस्तीस चा पल्ला पार करुन.. अकराव्या माळ्यावर नायर आंटिंच्या कुंडीतल पाणी पिऊन जरा खिडकीच्या गजावर ती विसावली...
साचलेल्या पाण्यात मान घुसळून अंगावर पंखान पाण्याच्या फवारा उडवत कुंडीतल्या मातीत पाय चिकट करुन ती परत झेपावली पोटाची भूक शोधायला...
शहराच्या कोपऱ्यात असलेल्या मिल पर्यत ती पोहचली..ट्रकमधून तांदळाची पोती चढवता उतरवता खाली पडलेले तांदूळदाणे.. पाहून ती खाली उतरली..
आजुबाजुच्या घरट्यातील शेजारी पाजारी लांबच्या नात्यातील मावशीची मुलगी जवळच दाणे टिपित होती...
थोडसं खाऊन ती चिखलाचे पाय घेऊन तांदळावर यथेच्छ फिरली.. काही दाणे तोंडात दाबून व तांदूळ चिकटलेले पाय पोटाशी धरुन ती आता घरट्याकडे परत मागे उडत होती आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी....