Dr.Smita Datar

Others

2.3  

Dr.Smita Datar

Others

चहा

चहा

2 mins
22.4K


               चहाच्या ग्लासात डोकावून बघताना विलासला भूतकाळ आठवला. त्या चहाच्या तपकिरी रंगात त्याच बालपण बुडबुड्याप्रमाणे तरंगत होत. तो स्टेशनवर कधी आला, कोणी आणलं , काही आठवायचं नाही.पण जे काही आठवत होते, ते स्टेशनवर पुस्तकांच्या दुकानाच्या बाजूला मुटकुळं करून पडलेले आपण, आणि कोणीतरी हातात सरकवलेला चहाचा क्रेट. चहा विकणारा पोऱ्या म्हणूनच स्वतःची स्वतःशी झालेली ओळख.

               रेल्वे स्टॉल वाला चाचा मात्र भला माणूस होता.रत्नागिरी स्टेशनवरच्या त्या स्टॉलवर त्याने जणू ठेवूनच घेतल होत आपल्याला. तो फार प्रेमळ होता अश्यातला भाग नाही. लहानपणी अंगावर कोरलेले वळ आणि कानशिलाखाली उमटलेली बोट , याचं दायित्व चाचाकडेच होत. तेव्हा डोळ्यातल्या अश्रूंबरोबर चाचाबद्दलचा रागही घळा घळा वहात असायचा. पण कधी उपास घडल्याचं आठवत नाही. चाचाच्या स्टोल वर बटर, टोस्ट, चिवडा काहीबाही मिळायचं.चाचा गुंडांशी भांडायचा. धिप्पाड, पठाणी  चाचाला ते टरकून असायचे.कदाचित त्यामुळेच माझं बालपण फुललं नसेल कदाचित, पण नासलं नक्कीच नाही. सहा फुटी धिप्पाड शरीर, गलमिश्या , फुटभर दाढी आणि सदा वटारलेले लालभडक डोळे , या त्याच्या अवतारामुळे स्टेशनवर चाचाच्या विरोधात जायची कोणाची टाप नव्हती.चाचाने हातात दिलेला चहाचा क्रेट सांभाळत, चहा विकतच माझं बालपण ट्रेनच्या रूळा मधून खडखडत होत.

              असाच एकदा थकून ट्रेनच्या एका डब्यात आडोश्याला लवंडलो होतो. अंगात जरा कणकण होती., थंडी वाजत होती. जाग आली तेव्हा टी सी तिकीटासाठी ढोसत होता. ट्रेन चालू होती आणि सगळा डबा आगगाडीच्या तालावर डोलत होता. आणि क्षणार्धात चाचाचा करारी चेहरा डोळ्यापुढे तरळून गेला. टी सी च्या लाथांनी दुखणार अंग आणि डोळ्यावर तापाची झापड, आयुष्य नक्की कुठे धावतंय कळत नव्हत. इतक्यात पांढऱ्या कपड्यातल्या कुणीतरी टी सी जवळ माझी रदबदली केली असावी. बहुधा तिकिटाचे पैसे भरले असावेत. त्या पांढऱ्या कपड्यांनी माझी रवानगी एका आश्रमात केली.

             आश्रमातच मोठा झालो. हातातले चहाचे कप जाउन वह्या पुस्तकं आली होती.आश्रमात शिक्षणाबरोबरच संस्कार मिळत होते. वाईट काय ते बघितलं असल्याने आश्रमातल्या शिक्षणाचं, सुरक्षिततेच महत्व कळत होत. रोज प्रार्थना म्हणण्या इतपत वाणी शुध्द झाली होती. तरी रत्नागिरी स्टेशन वरच्या चहाच्या आरोळ्या रात्री अपरात्री कानात घुमायाच्या. आरपार छेद घेणारे चाचाचे लालभडक डोळे रोज चहा पिताना आठवायचे.

               आश्रमातला मी गुणी मुलगा होतो. शिकलो. पदवीधर झालो. आश्रमातल्या गुरुजींचा, ट्रेन मध्ये भेटलेल्या त्या पांढऱ्या कपड्यांचा मी ऋणी होतो. तरी प्रेमाविना गेलेलं बालपण कुठेतरी मनाला गरम चहाचे चटके द्यायचं.

              कॉलेजमध्ये भेटलेली विभा , आयुष्यात आलेलं पहिले प्रेम, या प्रेमाने दिलेली दिशा, माझी गाडी आयुष्याच्या रुळांवरून सुसाट धावायला लागली. विभाच्या बाबांचं चहा ..नाश्त्याच छोट हॉटेल, रात्रीचा दिवस करून चेन ऑफ हॉटेल्स मध्ये बदललं. संसार सुख , सुबत्ता, प्रेम सगळी स्टेशने लागली. बदलली नाही ती एकच गोष्ट, अजूनही मी रोजचा चहा जाड काचेच्या छोट्या ग्लासातून पितो.

                                                   

                                                                                                

               


Rate this content
Log in