SWATI WAKTE

Others

3.1  

SWATI WAKTE

Others

भुलाबाई

भुलाबाई

3 mins
894


विदर्भातील एका छोट्या गावातील ही गोष्ट आहे. ही गोष्ट १९८५ ते १९८७ च्या दरम्यानची आहे. इथे ७, ८,९ ह्या वयोगटातील चार मैत्रिणी रहात होत्या. त्यांची नावे रोहिणी, अश्विनी, जया आणि ज्योती अशी होती. जया दुसरीत, रोहिणी आणि ज्योती तिसरीत तर अश्विनी चौथीत शिकत होत्या. त्यांची शाळा एकच आणि शेजारीच राहायच्या. त्यामुळे शाळेत सोबत जाणे, येणे करायच्या, सोबत खेळायच्या. सर्व सण आई, बाबांसोबत साजरे करायच्या. पण त्यांचा हक्काचा आणि फक्त त्यांचा सण म्हणजे भुलाबाई. भुलाबाईचे आगमन भाद्रपद पौर्णिमेला व्हायचे. त्याची त्या आतुरतेने वाट बघत. भुलाबाईच्या मातीच्या प्रतिमा त्यांच्या आईसोबत जाऊन घेऊन येत. पण त्यासाठी एक जागा घरातील ठरवून ती स्वच्छ करून ठेवायच्या. कुणी कोणाडा स्वच्छ करायच्या तर कुणी कोपरा स्वच्छ करायच्या. त्यात सुंदर सजावट करायच्या आणि खाली पाट ठेवून त्यावर भुलाबाई बसवायच्या. समोर दिवा लावायच्या. कुठून कुठून फुले गोळा करून हार भुलाबाईसाठी करायच्या. समोर सुंदर रांगोळी काढायच्या. दारासमोरही सुंदर रांगोळी काढायच्या. ह्या सर्वांसाठी त्यांची चढाओढ असायची. त्यामुळे एवढ्या लहान वयात त्यातून त्या कलात्मकता, स्वच्छता शिकायच्या. सकाळी उठून शाळेच्या आधी कुठूनकुठून फुले आणून त्यांचा हार करणे, रांगोळी काढणे पूजा करणे व नंतर शाळेत जाणे असा त्यांचा दिनक्रम असायचा. शाळेतून आल्यावर, स्वतःचे आवरून परत दिवा लावून मैत्रिणी गोळा करायच्या व भुलाबाईचे गाणे तालासुरात म्हणायच्या. गाण्याची सुरवात व्हायची ती... पहिली गं पुजाबाई... ह्या गाण्यापासून आणि गाणी अगदी तोंडपाठ सर्वांच्या सर्व असायची. ह्या सर्व गाण्यात माहेरचे कौतुक व सासरच्या निंदा असायच्या. मुलींना त्याचा अर्थ कळायचा नाही पण जोरजोराने टाळ्या वाजवून, सोबत टिपऱ्या खेळत मजेत म्हणायच्या.


शेवटचे गाणे झुलेबाई झुला आणि नंतर, अडकित जाऊ किडकित जाऊ... असायचे. ज्यात भुलाबाईच्या लोकांची निरनिराळे नावे ठेवल्या जायची जसे - अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता... असे नाव ठेऊन त्यातून यमक साधणे शिकायच्या आणि सर्वांत शेवटी असायचे... भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला... ह्यांनी गाण्याचा शेवट व्हायचा. नंतर जिच्या घरी भुलाबाई असायच्या ती मुलगी खाऊ किंवा प्रसाद एका झाकलेल्या डब्यात घेऊन यायची. जसे मुलींनी म्हटले... बाणाबाई बाणा साखरेचा बाणा गाणे संपले खिरापत आणा.... तशी ती मुलगी खाऊच्या स्टीलच्या डब्याला हलवायची व त्यात कुठले जिन्नस आहे ते त्याच्या आवाजावरून ओळखायला सांगायची. समोरच्या मुली काही हिंट्स विचारायच्या जसे तिखट, गोड़ की फिक्का आहे, रंग कुठला आहे त्यातून बऱ्याचदा तो कुठला पदार्थ हे त्या समोरच्या मुली ओळखायच्या व बऱ्याचदा ओळखायच्याही नाहीत. तेव्हा जिच्या घरचा पदार्थ ओळखला नाही तिला जिंकण्याचा आनंद होता. असे सहा ते आठ वाजेपर्यंत पाच-सहा घरी गाणे म्हणून स्वतःच्या घरी परतायच्या. सर्वांच्या घरी निरनिराळा प्रसाद खायच्या. प्रसाद तरी काय असायचा गुळ-खोबरे, शेंगदाणे, फळं, पोहे, करंजी ह्यासारखे पदार्थ असायचे. प्रत्येकाच्या वाट्याला एक किंवा दोन चमचे यायचे. पण त्यात त्यांना जी मजा यायची ती जगातल्या कुठल्याच गोष्टीत नाही यायची. मैत्रिणीची सोबत सजावटीची चढाओढ, रांगोळी, खाऊ ओळखणे ह्यातून बरेच काही शिकायच्या. असा हा भुलाबाईचा सण एक महिना चालायचा... भाद्रपद पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालायचा.


त्या मुलींमध्ये सर्वांत मोठी अश्विनी म्हणून तीच ठरवायची कुणाकडे कधी गाणे म्हणायला जायचे ती व्यवस्थित कर्म लावून द्यायची. त्या भुलाबाईचा शेवटचा दिवस म्हणजे अश्विन पौर्णिमेचा म्हणजेच कोजागिरीचा त्या दिवशी ज्वारीच्या खोपड्या म्हणजेच ज्वारीच्या पिकाच्या काठ्या आणायच्या. त्याचे झोपडीसारखे बनवून तुळशीजवळ भुलाबाईला न्यायच्या. त्याचा असा अर्थ होता की भुलाबाई एक महिना माहेरी आल्या आणि शेवटच्या दिवशी त्यांना सासरी विदा करायचे म्हणून तयारी करायची त्या दिवशी प्रत्येकीकडे बत्तीस प्रकारचा खाऊ असायचा, हा काही खाऊ बाहेरून काही आई घरी करून द्यायची. अशाप्रकारे ह्या भुलाबाईला विदाई द्यायच्या. अशाचप्रकारे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निरनिराळे सण साजरे जातात. त्याने फक्त आपली संस्कृतीच नाही तर खूप काही शिकायलाही मिळते असे हे महाराष्ट्रातील सण व साजरे करणारे ह्युमॅन्स ऑफ महाराष्ट्र, त्यांना खरोखरच सलाम...


Rate this content
Log in