Meghana suryawanshi

Others

4.2  

Meghana suryawanshi

Others

भरती

भरती

2 mins
185


      सायंकाळी सूर्यनारायण आणि धरणीमध्ये लपंडाव चांगलाच रंगला होता. सुर्यनारायण जे लपून बसले ते काही धरणीला लवकर मिळाले नाहीत. गुरफटून बसलेली ती धरणी माय उद्याच्या सुर्यनारायणांच्या आगमनाची वाट पाहत तशीच निपचित पडून राहिली. तिच्या साथीला अथांग सागर होता. दिवसभर इकडे तिकडे आपल्या लीला करून खळखळणारा तो सागर आज पौर्णिमेच्या गोलमटोल चंद्राकडे पाहत जरा जास्तच रागवला होता.


       काय असावं बरं रागामागील कारण? त्या दोहोंमधील ऋणानुबंध ना कधी धरणी मायला कळाले तर ना कधी लाखो तारकांची चादर आच्छादून शांत निद्रेत असणाऱ्या त्या निरभ्र आकाशाला. कधी अनोळखी आकृतीला सामावून घेणारा तो सागर चंद्राच्या बाबतीत असा का? त्या निरभ्र आकाशाला वाटे की चंद्राच्या मोहक रूपागत आपणास असे रुप का मिळाले नसेल? चंद्राइतकेच मला देखील सुंदर का केले नाही? अशी तक्रार तो सागर करत असावा. सागराचा हा गैरसमज तरी झाला नसेल ना की त्यास भेटायला येणारे धरणीवासी चंद्राच्या रुपाला आकर्षित होऊन त्याच्या कडे येतात! पण मग दिवसा चंद्राच्या अनुपस्थिने त्याच्या शंकेचे निरसन का होऊ नये? अशा अनेक मनातील प्रश्नांनी आकाशाची घालमेल झाली होती. याउलट धरणीमायला वाटे की, सागराला स्वतःच्या सुंदरतेचे कौतुक अधिक आहे! तो उंच उंच लाटांनी हात उंचावून जणु हे सांगत आहे की, या समस्त सृष्टीमध्ये माझ्या इतका अथांग, जिकडे नजर जाईल तिकडे क्षितिजावर राज करणारा माझ्यासारखा कोणी नाही! 


        पण मग नक्की खरं काय? निरभ्र आकाशाने आणि धरणीमायला वाटणारे विसंगत तर्क खरच योग्य असतील? स्वतःची सुंदरता आणि त्याचे कौतुक करायला कोणाला नाही आवडत? दोघांनीही तेच केले. निरभ्र आकाशाने चंद्राच्या सौंदर्याचे कौतुक करून नकळत आपला पण मान उंचावला. धरणीने सुद्धा याउलट वेगळे असे काहीच केलेले नाही. त्या दोहोंमधील तर्क वितर्क लावण्यात या दोहोंमध्ये भांडण लागले नाही ते एक नवलच म्हणायचे. चंद्राच्या आणि सागराच्या वरवरच्या रूपाचे कौतुक केले खरे पण अंतर्गत सौंदर्याकडे लक्ष देण्याचे दोघांच्याही लक्षात आले नाही. चंद्र आणि सागर या दोघांमधील संबंध त्यांनाच ठाऊक आपण तर्क लावण्यात काय अर्थ? नाहीतर का तो सागर गोलमटोल चंद्राकडे पाहत पुढे पुढे सरकत असेल आणि जेव्हा तो नसतो तेव्हा तो मागे मागे सरकत असेल, जणु काही चंद्राच्या अनुपस्थिने तो हिरमुसला असावा आणि भयानक शांततेची त्याला भिती वाटत असावी. दोघांमधील वाद कदाचित सौंदर्यावरून कधीच नसेल. कारण सौंदर्याची व्याख्या वरवरच्या सौंदर्याने कधीच पुर्ण होऊ शकत नाही, तीला साथ हवी असते ती निर्मळ, निस्वार्थी, सर्वांना समजून घेणार्‍या मानसिकतेची. 


      भांडण कोणामध्ये होत नाही? त्याशिवाय जगण्याची खरी गंमत ती काय? खरं सौंदर्य काय असते आणि त्याची चौकट यांत बसणारे सौंदर्य नक्कीच त्या दोघांना लाभले आहे. हो खरच! रात्रीच्या भयानक शांततेत स्वतःच्या प्रकाशाने प्रत्येकास धीर देण्याचे चंद्राचे सौंदर्य आणि प्रत्येकास स्वतःमध्ये सामावून घेण्याचे आणि आपली संपत्ती दुसर्‍यास देण्याचे सागराचे सौंदर्य! सौंदर्याकडे पाहताना अंतर्मुख होऊन ते समजून घेतले तर खरे सौंदर्य दिसते, नाहीतर दिसतो तो फक्त दृष्टीपटलावरील भास!        


Rate this content
Log in