भक्तीचे फळ
भक्तीचे फळ
आज खूप दिवसांनी शंभू शाळेला जाण्यासाठी निघाला होता. सकाळी लवकर शाळेला जायचे आहे म्हणून त्याने रात्रीच सगळी तयारी केली होती. तो दहावीत होता. दहावीच्या मानाने तो खूपच समजूतदार झाला होता. आपले सर्व वह्या पुस्तके शालेय वस्तू जागच्या जागी ठेवून अभ्यासाला प्राधान्य देत असे. त्याचे सर्वकाही नीटनेटके असायचे. या पसरलेल्या महामारी मुळे खूप महिने झाले त्यांना शाळेत जाता आले नव्हते, पण आता दहावीचा वर्ष असल्याने शिक्षकांनी देखील धोका पत्करत शाळा चालू करण्याचा निर्णय घेतला होता. पालकांच्या संमती पत्राने त्यांनी शाळा चालू करण्याचे ठरवले. सर्व प्रक्रिया पूर्ण करत त्यांनी शाळा चालू केली होती.
शंभू व त्याचे मित्र खूपच खुश होते, कारण आज खूप महिन्यांनी ते प्रत्यक्ष भेटणार होते. शंभूला रोजची खूप सुंदर आणि संस्कारी सवय होती. आंघोळ वगैरे झाल्यानंतर रोज गणपतीची पूजा करत असायचा. त्याचा हा नित्यक्रम असायचा. गणेश पूजा केल्याशिवाय तो घराच्या बाहेरच पडत नसे. घरातले देखील त्याचे खूप कौतुक करायचे. सगळ्यांच्या गळ्यातला ताईत होता शंभू. शंभू ची गणेश पूजा आटोपली, न्याहरी देखील झाली. आता तो शाळेत जाण्यासाठी निघाला होता. शाळा दोन किलोमीटरच्या अंतरावर असल्याने तो सायकलवरच जात असे. आज त्यांने सायकल देखील चकचकीत केली होती. सायकलची हवा नीट तपासून घेतली. चैन ला तेल वगैरे करून रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज केले होते. दप्तर कॅरेजवर ठेवून सायकलचे पायडल मारत आईचा निरोप घेतला आणि मस्तपैकी शाळेच्या दिशेने सायकल चालवत गेला.
वाटेत गणेश मंदिर येत होते. बाजूला सायकल लावून त्याने आज शाळेच्या पहिल्या दिवशी गणेश दर्शन घ्यायचे मनातल्या मनात ठरवले. पायऱ्या चढून वर जाणार इतक्यात तिसऱ्या पायरीवर एक मुलगा बसलेला त्याला दिसला. त्या मुलाचे कपडे नुसते धोती अडकवलेली होती. इतरांपेक्षा अतिशय वेगळा तो दिसत होता. त्याचे पोट सुटलेले होते. त्याचे शरीर उन्हात चमकत होते. गाल तर खूपच फुगीर होते. शंभू त्या मुलाला बघत-बघत पायऱ्या चढत होता. कोणाचेही लक्ष वेधून घेईल अशी त्या मुलाची शरीरयष्टी होती. त्या मुलाने देखील हळूच कटाक्ष टाकला. तो शंभू कडे अशा भावनेत बघत होता, जणू शंभू आता त्याला काही तरी विचारेल, परंतु शंभूला घाई असल्याने तो भरभर पायऱ्या चढत गणेश दर्शनासाठी मंदिरात गेला होता. बाप्पाचे दर्शन घेऊन, पुजाऱ्यांकडून प्रसाद व आशीर्वाद घेऊन परत तो खाली जाण्यास निघाला. तो आज देवदर्शनाने स्वतःला धन्य मानत होता आणि खुप आनंदी होता, कारण आज त्याला सर्व मित्र शिक्षक भेटणार होते. त्याच्या मनात अभ्यासाचे काही प्रश्न घोळत होते. त्या सर्व प्रश्नांचे उत्तर शिक्षकांकडून घेण्यासाठी त्या नादात तो भरभर पायऱ्या उतरत होता. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो दुसऱ्या पायरीवरून घसरत खाली आला. त्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती. पायऱ्यांवर रक्त पडले होते. तो घरंगळत खाली आल्याने त्याला जबरदस्त दुखापत झाली होती. तो बेशुद्ध झाला होता. बेशुद्ध होण्याआधी त्याच्या तोंडात आईचे व गणेशाचे नाव होते. तो त्याच्या आईचे व गणेशाचे धावा करत होता.
दुसऱ्या दिवशी शंभुने डोळे उघडले, तेव्हा तो इस्पितळात होता. आजूबाजूला पाहिले तर कोणच दिसत नव्हते, परंतु थोड्या अंतरावर त्याला तो गुटगुटीत मुलगा मात्र दिसला. तो काहीतरी खात होता आणि हसत होता. शंभुने त्याला हाक मारली आणि तो विचारू लागला की तो इकडे कसा आला, त्याचे आई-वडील कुठे आहेत ? त्याला शाळेला जायचे होते, परंतु त्याला काहीच समजत नव्हते तो सतत प्रश्न विचारत होता. तेवढ्यात तो गुटगुटीत मुलगा समोर आला आणि त्याने घडलेला प्रसंग सांगितला. शंभू घसरत खाली त्या मुलाच्या पायाजवळ येऊन पडला होता. त्या मुलाने त्याला इस्पितळात आणले होते आणि तेव्हापासून तो त्याच्या जवळच होता. तेवढ्यात डॉक्टर आले त्यांनी शंभूला पूर्णपणे तपासले, घरचा पत्ता, आई वडिलांविषयी विचारले.
थोड्याच वेळाने शंभू चे आई-वडील घाबरत घाबरत इस्पितळात पोहोचले. त्यांनी शंभूला पाहताच गळ्याला लावले आणि देवाचे आभार मानले. डॉक्टरांना विचारताच डॉक्टर म्हणाले, की एका मुलाने त्याला वेळेवर दवाखान्यात आणले म्हणून बरे झाले, नाहीतर आज याचे प्राण संकटात होते. परिस्थिती आवाक्याबाहेर गेली होती. नशीब त्या मुलाने वेळेवर याला दवाखान्यात आणले. आई-वडील दोघेही त्या गुटगुटीत मुलाचा शोध घेत होते. त्यांना त्याचे आभार मानायचे होते, परंतु तो मुलगा गायब झाला होता. तो कुठेच दिसत नव्हता. जेव्हा शंभू ला विचारले तो मुलगा कुठे गेला, शंभूला देखील हे माहीत नव्हते. निराश होऊन शंभुने झोपण्यासाठी डोळे बंद केले तर त्याला समोर तोच मुलगा उभा असल्याचे भासले. त्या मुलाच्या पाठीमागून सूर्यकिरणे पसरत होती. हळूहळू त्या मुलाचे रूपांतर गणेशात झाले होते. आपल्या स्मित हास्याने गणेश शंभुला आशीर्वाद देत होते.
हे सर्व पाहून शंभू धन्य झाला होता. हा नयनरम्य सोहळा उपभोगत होता. मनोमन तृप्त होऊन तो स्वतःला गणेश दर्शनाने धन्य मानत होता, स्वतः:ला भाग्यवान समजत होता. आज गणेशाने शंभुचे प्राण वाचविले होते. नित्य पूजेचे फळ त्याला आज अशारितीने मिळाले होते. नशिबा बरोबर आज शंभुच्या प्रार्थनेने ही प्राण वाचवले होते. शंभू मनापासून गणरायाचे आभार मानून देवास धन्यवाद देत होता.
त्या मुलाच्या रूपाने प्रत्यक्ष गणपतीबाप्पाच शंभुला दर्शन देण्यासाठी आले होते. हे शंभू चे स्वप्न होते का खरे होते ? हे मात्र उलगडले नाही. परंतु जो कोणी होते त्याने शंभुचे प्राण वाचवले होते. शंभू मनापासून त्यांचे आभार मानत होता आणि त्या मुलाच्या रूपात देवबाप्पाला पहात होता.
