बाई... मी झोपतो !
बाई... मी झोपतो !
तसं तर शाळेत मुलं अभ्यास करायला, मित्रांना भेटायला आणि खेळायला येत असतात. वर्गातील सारेच मुलं हुशार नसतात तसे सारेच कच्चे देखील. पण वर्गातील हुशार मुलांना जो मान सन्मान मिळतो तोच सन्मान अभ्यासात मागे असलेल्या मुलांना कधीच मिळत नाही. त्याच्यामागे नेहमी टोमणे ठरलेले असतात. कधी वर्गातील मुले तर कधी वर्गातील शिक्षकांकडून या मुलांना टोमणे खावे लागतात. सहसा असं पाहायला मिळतं की, ज्या वर्गात मॅडम शिकवायला उभे राहतात त्या वर्गात मुलं थोडं गोंधळ जास्त करतात, ( काही मॅडम यास अपवाद जे की आपला वर्ग खूप छान सांभाळतात ) पण त्यादिवशी सातव्या वर्गात नीरव शांतता होती. मॅडम बोर्डावर गणितं लिहून देत होती आणि बाकीचे विद्यार्थी ती गणितं सोडवीत होती. मुख्याध्यापक तेथून जात होते तेव्हा त्यांची सहज नजर शेवटच्या बाकावर गेली, ज्याठिकाणी एक मुलगा बेंचवर आडवा पडला होता म्हणजे झोपला होता. मुळात वर्गात तोच जास्त गोंधळ करायचा ज्यामुळे सारा वर्ग गोंधळ केल्यासारखं वाटायचं. मुख्याध्यापकानी हळूच वर्गात प्रवेश केले आणि मॅडमला हळू आवाजात विचारलं, " तो का झोपला आहे ? " यावर मॅडमने सांगितलं " झोप येत आहे म्हटलं नि झोपी गेला. तसंही तो कुणाला अभ्यास करू देत नाही त्यापेक्षा तो झोपलेला बरा !" यावर काही मुलं म्हणाली, " सर, तो मॅडमच्या तासात रोजच झोपतो." मुख्याध्यापक मॅडमकडे एक कटाक्ष टाकून काहीही न बोलता वर्गातून बाहेर पडले.
मुख्याध्यापकांचे विचारचक्र चालूच होते. त्याला एवढ्या सकाळी का बरं झोप आली असावी ? एकवेळ दुपारचं खिचडी खाल्यावर डुलकी येत आहे म्हटल्यास त्यावर शंका येत नव्हती. पण असे का ? याचा शोध घेण्यासाठी मुख्याध्यापक विचार करू लगले. तो ज्या नगर मध्ये किंवा गल्लीत राहत होता, त्या गल्लीतील काही मुलांचा शोध घेतला. त्यांना बोलावून घेतलं आणि त्या मुलाचे परिवारासह इतर माहिती गोळा केल्यावर कळलं की, तो खूपच गरीब आणि अनाथ मुलगा आहे. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले होते आणि घरात तिच्या आईसोबत राहत होता. घर चालविण्यासाठी आई धुणीभांडी करत होती तर हा देखील शाळा सुटल्यावर कुठल्या तरी दुकानात काम करत होता. तसेच सकाळी उठून पेपर टाकायचं देखील काम करत होता. शिक्षण संपण्याच्या अगोदर त्याच्या हातात पैसा येऊ लागला होता, त्यामुळे त्याला या शिक्षणाचे काही महत्व वाटत नव्हते. घरात आई त्याच्यावर रागावत होती म्हणून तो शाळेत येत होता. हसणे, खेळणे व बागडण्याच्या वयात त्याच्यावर जबाबदारी पडली होती. शाळा सुटल्यावर दुकानात जाऊन काम करून रात्री दहाच्या सुमारास घरी यायचा, जेवण करून झोपायला उशीर व्हायचं आणि परत सकाळी पेपर टाकण्यासाठी लवकर उठावं लागायचं. यामुळे त्याची झोप पूर्ण होत नसे. त्यामुळे तो शाळेत आलं की त्याला झोपावं वाटू लागायचं. शिक्षक वर्गात असताना कसेबसे बसायचा आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या तासाला मॅडम वर्गावर आले की तो म्हणायचा, " बाई , मी झोपतो ...!" त्याची कटकट नको म्हणून मॅडम देखील त्याला झोपण्याची परवानगी द्यायची. ही गोष्ट मुख्याध्यापकाना समजल्यावर त्यांना राहवलं नाही. त्यादिवशी सर्व शिक्षक व मॅडम यांना आपल्या कार्यालयात बोलावलं आणि त्या झोपणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी सर्वाना कल्पना दिली. सर्वांनी मिळून त्याला दत्तक घेण्याचा आणि त्याचे संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली.
दिवाळीच्या सुट्या लागण्यापूर्वी एके दिवशी त्या मुलाच्या आईला शाळेत बोलावून घेतलं, दिवाळी निमित्ताने त्या मुलाला छानसा ड्रेस, त्याच्या आईला साडी आणि काही फटाके दिवाळी भेट म्हणून सर्वापुढे दिलं आणि मुख्याध्यापक त्यांच्या आईला म्हणाले, " या मुलाला शाळा व शिक्षण घेऊ द्या, या मुलाला कोठेही कामावर पाठवू नका, आता यापुढे त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आमची शाळा उचलणार आहे." हे ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. आपल्या पदराने तिने डोळे पुसले, सर्वांचे आभार मानून ती घरी गेली. त्यांची यंदाची दिवाळी या घटनेने आनंदात गेली. त्यानंतर तो मुलगा शाळेत कधीच झोपला नाही, उलट त्याचा शाळेतील धिंगाणा देखील कमी झाला, तो चांगला अभ्यास करू लागला. चांगले मार्क घेऊन त्या शाळेतून दहावी उत्तीर्ण झाला. येथील शिक्षकांनी त्याच्या पुढील शिक्षणाची देखील सोय केली होती त्यामुळे तो उच्च शिक्षण घेऊ शकला आणि एका महाविद्यालयात ज्युनिअर लेक्चरर म्हणून काम करताना पाहून त्या मुख्याध्यापकाला खूप आनंद झाला.
