बाबांचे पत्र
बाबांचे पत्र
मी अकरावी पास झाले तेव्हा मी मुंबईला भाऊ वहिनी बरोबर अंधेरीला राहत होते आणि माझे आई बाबा गोव्याला. पास झाल्यावर आनंद सर्वांनाच होतो तसा मला ही झाला. पण खरा आनंद जास्त झाला तो माझ्या बाबांच्या पत्राने. त्यावेळी अकरावी पास होणे हे जरा कठीणच असायचं, कारण आता सारख्या सवलती म्हणजे टुशनस, कोचिंग क्लासेस, गाईड वगैरे प्रकार नव्हतेच. पाठ्यपुस्तके सुध्दा धड नसायची. शाळेत शिक्षक पुस्तका शिवाय सुद्धा एवढं चांगलं शिकवायचे व नंतर त्यावरचे नोट्स द्यायचे. त्या नोट्सवरंच आमचा अभ्यास असायचा.
मैत्रिणी ही एकमेकांना मदत करत होतो. फ्रेंच, इंग्रजी, भाषेच्या मॅडम तर स्वतःच्या घरी बोलवून आमच्या काही अडचणी असल्या तर त्यात मदत करायच्या. गणित, सायन्स चे शिक्षक शाळा सुटल्यावर किंवा रविवारी वर्ग घ्यायचे. खरंच तो काळ एक वेगळाच होता
. गुरुशिष्याचे नाते खरंच श्रेष्ठ होते. आता असे शिक्षक नाहीत आणि विद्यार्थी ही नाही. गेले ते दिन गेले.
बाबांनी पत्राने माझे एवढे कौतुक केले की मी बोर्डात पहिली आल्या सारखा मला आनंद झाला. बाकिच्यांची ही पत्रे आली, पण बाबांच्या पत्राने एक वेगळाच आनंद दिला. त्या पत्रातला शब्दांशब्द माझ्या मनात भरला.
माझ्यापेक्षा माझ्या बाबांनाच जास्त आनंद झाल्याचे दिसत होते. जेव्हां आपल्या आई वडिलांना आपल्यामुळे समाधान मिळतं, खरंच, खूप खूप आनंद होतो.
त्या पत्रातले बाबांचे आशीर्वाद आणि प्रेरणा मी सतत उराशी बाळगल्या आणि पुढे येईल त्या अडचणींवर मात करत बी.ए डिग्री घेतली आणि नंतर बी.एड. करून बाबांसारखाच शिक्षकी पेशा स्वीकारला. आयुष्यात जे काही यश संपादन केले ते फक्त बाबांच्या त्या पत्राच्या प्रेरणेनेच.