असा साधला संवाद
असा साधला संवाद
कु.हर्षल राजेंद्र सोनवणे, इयत्ता ३री शाळा प्रा.शा. गोविंदनगर ता. सोयगाव जि. औरंगाबाद, शाळेचे विद्यमान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र सोनवणे यांचा मुलगा, हो मला आज ही आठवते हा विद्यार्थी १ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदाच शाळेत आला कारण ही तसच आम्ही इयत्ता १लीच्या नवीन पात्र मुलांना नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्या आगोदर २ महिने आगोदरच त्यांना शाळेत बोलावत असतो म्हणजे त्याना शाळा शिरस्ता आंगी लवकर बानावा म्हणून. तसाच हर्षलही माधुरी म्हणजे त्याच्या बहीणी सोबत शाळेत आला अन मला पाहून रडायला लागला. सोबत आजी होत्या. लाडका आहे, एकुलता एक आहे, घर सोडून कुठे कधी गेला नाही, आईचा दुरावा पाहिला नाही अशी अनेक कारणे सांगून आजी,मला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मी पहिली अन दुसरीच्या मुलांना शिकवत होतो त्यामुळे नवीन प्रवेशीत मुले मी माझ्याच वर्गात बसवली.अन नेहमी प्रमाणे बडबडगीतांनी पहिल्या तासिकेची सुरुवात केली. आजीच्या सांगण्यावरून मी हर्षलकडे जास्त लक्ष देत होतो. तो बडबडगीते म्हणताना उत्साही नाही वाटला. एकदम गुमसुम आणि शांत. पहिले चार दिवस तो फक्त शाळेत यायचा, बसायचा काहीही करायचा नाही चित्रकार्ड देखील पाहत नसे कोणताही खेळ खेळत नसे. मग मी विचार केला कि याच्या मनातल गुपित जाणून घ्यायला याच्या मनात आपल्याला जागा करावी लागेल.आणि त्यासाठी प्रयत्न चालु केले अन एक मोठ संकट सगळ्या जगा समोर उभे राहिले कोरोना. मग काय सगळ बंद सर्व मुले कावरी बावरी झाली अचानक शाळा बंद म्हटल्यावर आम्ही मुलांना घरोघरी जाउन अभ्यास द्यायला लागलो. परंतु माधुरी जेवढी शाळेशी एकरूप झालेली तेवढा हर्षल दुरावलेला. मग मी त्याच्या वडिलांना आम्ही शाळेत येतो तेव्हा त्याला पाठवत जा असे सांगितले अन तेही तयार झाले शाळेत सोडायला यायची जबाबदारी माधुरीची. मास्क घातलेला, हातात दप्तर, घेउन घाबरट चेहऱ्याने शाळेत आलेला हर्षलआणि फक्त मी आम्ही दोघच. मग सुरुवात झाली एका वेगळ्या प्रवासाची, शिक्षक विद्यार्थी यातीलच मैत्रीपूर्ण संबंधाची, अनौपचारिक गप्पा, शेतातील गमती, गावातील मुलांचे किस्से, घरातील बहीणीची भांडणे, मुद्दाम हर्षलच्या घरी जायच विचारपुस करायची , एखाद्या दिवशी नवा पेन द्यायचा, जेजे मला हर्षलचा भित्रा स्वभाव बदलण्यासाठी आवश्यक होत ते मी जमेल तस करत होतो असा आमचा दररोजचा प्रवास. आठच दिवसात गप्प गप्प राहणारा हर्षल आता माझ्याशी मैत्रीपुर्वक बोलु लागला. तुम्ही सांगाल ते करेन सर म्हणायचा, अन अभ्यासाला सुरुवात करायचा. पुढील आठ दिवसात अक्षर ओळख, अंक ओळख झाली पुढील आठ दिवसात उजळणीतले सर्व पाठ आम्ही संपविले. बेरीज वजाबाकी पुढील आठवाड्यात फस्त केली. आता इंग्रजी विषयाकडे वळलो आणि ते ही पूर्ण करून आम्ही आनंदाचे दुसऱ्या लॉकडाउन ला सामोरे गेलो. माझ्या पूर्ण शैक्षणिक आयुष्यात इतका झटपट प्रगती करणारा आणि एखाद्या आदर्श विद्यार्थ्यांप्रमाणे जगणारा आणि वागणारा हर्षल पहिलाच मुलगा असेल. आज तो तिसरीत आहे आणि मला सांगायला आवडेल कि तो शाळेचा सर्वात लाडका आदर्श विद्यार्थी आहे. शांत स्वभाव , मेहनती, उत्साही , प्रचंड उर्मी, सर्वांना सहकार्य असाच आहे. आज पर्यंत कोणतीही तक्रार नाही कि कोणाच्या भांडणात नाही आणि अशा ह्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. आमचा हर्षल नक्कीच भविष्यात आमचा नावलौकिक वाढवणार यात तीळमात्र शंका नाही.
