अनंत मित्र प्रेमाची गोष्ट
अनंत मित्र प्रेमाची गोष्ट
आज रविवार. आठवडा सुट्टीचा दिवस. निवांत वेळ. कालच अन्तूअण्णाचे गावाकडील मित्र आले होते. सुट्टीत कंटाळा आला की थोडं निवांत होण्यासाठी ही गावाकडची मित्रमंडळी अधूनमधून कोकणच्या पर्यटनाला येत असत. मग तो डुक्करकडा... तिथे होणार ते स्वतःच्या हातांनी बनवलेलं गावाकडचं गावरान चिकन, चांदण्या रात्रीचा आनंद घेत सर्वांची बसलेली पंगत... सर्व काही मनमुरादच.
अन्तूअण्णा, मनोजसाहेब, बापू, सदा व मी सकाळीसकाळी मॉर्निंग वॉक केलं.
"आजच्या दिवसाचं नियोजन काय?",असं मी अण्णाला म्हणालो. "जाऊ नेहमीप्रमाणे रत्नागिरीत व पुन्हा मार्गस्थ होऊ रात्री गावाकडे होळीच्या सुट्टीला."
सर्वांनी आपली आवराआवर केली. ओटीवर गोल बसून सकाळीसकाळी मावशीने भाजलेली गरमागरम भाकरी व प्रदीपने नदीतून आणलेल्या माशांचे कालवण... त्यावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला आणि दिवसभराच्या सफरीला सुरुवात झाली. रत्नागिरीहून आरे-वारे समुद्रकिनारी पोहचायचं होतं. वाटेत थोडं नारळपाणी घेतलं. दुपारच्या उन्हामध्ये निळाशार समुद्र व त्याच्या पाण्यावरील चकाकणारी सुर्याची रुपेरी किरणे प्रखरतेने जाणवत होती. थंडगार शहाळ्याचे पाणी पोटात गेल्यावर सुरुच्या बनाकडे आमचे पाय जाऊ लागले. सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची गर्दी तर होतीच. सुरुच्या बनात, दुपारच्या उन्हात थोडा विसावा घेतला. समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूवर जलचरांनी काढलेली सुंदर अशी नक्षीचित्रे पाहात, ओहोटीकडे चाललेला निळाशार समुद्र लाटा न्याहाळत, खेळणारी मुले, समुद्र किनार्यावरील स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्र सफरीवर जाणारे पर्यटक, दुपारच्या उन्हामध्ये समुद्रस्नानाचा आनंद घेणारी मुलं, सर्वच काही डोळ्यांमध्ये साठवत, निवांत सुखावणारे क्षण आम्ही अनुभवत होतो. वाढतं वय विसरून बालपण अनुभवता येत होतं. आपल्या सुंदर हातांनी आपली नाव समुद्रकिनार्यावरील वाळूत रेखाटताना व त्यांना मोबाईलच्या कॅमेऱ्यात बद्ध करताना एक विलक्षण आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. समुद्राच्या लाटा लयबद्ध यायच्या आणि वाळूतील रेखाटलेली अक्षरे पाण्यात विरुन जायची. असाच खेळ चालू होता. माणसाच्या आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण असेच वाळूत रेखाटलेल्या अक्षर शिल्पासारखे असतात. एखादी सुखाच्या लाटेची क्षणिक लहर दुःख नाहीशी करून जाते व दुःखाची जोराची लाट सुखाचे क्षण दूर घेऊन जाते.
आता परतीची वाट धरली. सर्वांनी वाटेत हलकाफुलका कोकणी भाताचा आस्वाद घेतला व वैभववाडीमध्ये मनोज साहेबांच्या पाहुण्यांना भेटण्यासाठी निघालो. त्यांना भेटून आम्हाला गावी जायचं होतं. वैभववाडीला जाताजाता रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेतील सीमेवरील मोसम या गावाहून जायचं होतं. माझ्या नोकरीच्या सुरुवातीचा तो गाव. माझ्याबरोबर असणाऱ्या या मित्रमंडळींना मी म्हणालो आपण पाच मिनिटे मोसममध्ये थांबून जाऊ. त्यांनी लगेच होकार दिला. मी लगेच मोसममधील माझ्या मित्रास फोन लावला. त्याचेही नाव अनंत होते. अनंता मोसम पुलाजवळील शेतामध्ये काम करत होता. "मी मोसम पुलाजवळ येतो, तुम्ही तिथे या,"असे तो लगेच फोनवर म्हणाला.
आमची गाडी मधुबन हॉटेलजवळ पोहोचली. जवळच रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीमेवरील शुक नदी वाहत होती. मधुबन हॉटेलजवळून आमची गाडी वळसा मारून भुईबावड़ा रस्त्याने मोसम पुलाजवळ पोहोचली. आमची थांबलेली गाडी पाहून अनंता आपल्या स्कुटरने गाडीजवळ आला. शेतातील कपडे असल्यामुळे गुरुजी कपडे बरोबर नाहीत, असे म्हणत त्याने माझ्या हातामध्ये हात दिला. मीही, 'आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं' म्हणत त्याला आलिंगन दिले. मैत्रीत प्रेमाचाच सुगंध असतो. त्याला कोणतीही सीमा नसते ना बंधन...
खरंतर अनंताची आणि माझी सतरा-अठरा वर्षांपूर्वीची ओळख. शिक्षक म्हणून मी त्याच्या वाडीमध्येच राहायला होतो. त्यावेळी अनंता आपली शेतीवाडी सांभाळत असे. सुरुवातीला मला तिथे करमत नसे. मी ही त्या परिसरात नवीन होतो. त्यावेळी वाडीतील ही मित्रमंडळी माझ्या खोलीवर येत. मला जवळपासच्या बागेत, शेतात फिरायला सोबत नेत असत. सुट्टीच्या दिवशी आमचे क्रिकेटचे सामने रंगायचे. ही कोकणची माणसं फणसासारखी वरुन काटेरी दिसणारी मनातून गऱ्याप्रमाणे गोड होती. आपल्याला मित्र असावा, असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मैत्री करताना पहिल्यांदा स्वतःचा मित्र व्हावं लागतं. मैत्री जुळविण्यासाठी गरज असते ती स्वत:वर विश्वास ठेवण्याची, जाती-पातीची बंधने झुगारण्याची, संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची, विशाल हृदय, संवेदनशील मन जपण्याची, दुसर्यांना व्यवस्थितपणे समजून घेण्याची. आजही आमचं दररोजचं संभाषण नसलं तरी ते हृदयातलं मित्रप्रेम कायम आहे.
अनंतने जेमतेम हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले होते. तो नेहमी शिक्षण कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त करायचा. शिक्षणापेक्षा काम करण्याची जिद्द असल्यास मोठे होण्यास वेळ लागत नाही, असे मी नेहमी म्हणायचो. तो आपल्या मोठ्या भावाबरोबर शेतीवाड़ी करायचा. त्याचा कष्टाळू आणि जिद्दी, प्रामाणिक स्वभाव मला आवडायचा.चेहऱ्यावर नेहमी हास्य आम्हाला अनंत मित्रप्रेम देऊन जायचे. नेहमी त्याला कोणतेही काम कमी वाटत नसायचे. लोकांची कामे, शेतीची कामे सतत करायचा.
आपले कुटुंब सांभाळताना त्याला मोठा आधार देणारा त्याचा दादा अचानक देवाघरी गेल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला होता. त्यातून स्वतःला सावरत त्याने पुन्हा आपल्या परिवाराला साथ दिली. सुरवातीला असणारा एक ट्रॅक्टर घेऊन काम करणारा अनंत आज छोटी-मोठी कामे करत जेसीबी घेण्यापर्यंत झेप घेतली. पारंपरिक भातशेती करत असताना आज ऊसशेतीकडे तो वळला.
जीवनात मित्र खूप भेटतात. पण खरे नावाप्रमाणे आजही अनंत मित्रप्रेम असणारे विरळच. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो! मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातून निर्माण झालेले सूर! आणि खरा मित्र म्हणजे अनोळखी सुरांतून निर्माण होणारं एक सुमधुर गाणं! मैत्री जुळते ओळखीमुळे, पण ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याच्या सुख-दु:खात सामील झाल्यानंतर जो "माणूस" तयार होतो तो खरा मित्र अन् तिच खरी मैत्री!
या दूषित जगात गंगेच्या पाण्याइतकाच निर्मळ असणार्या, मित्रांमधील मरगळ दूर करणार्या, गरज पडली की मेणाहून मऊ अन् वज्राहून कठीण बनणार्या मित्राची, मैत्रीची नितांत गरज आहे.
मित्राचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कर्ण. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण. मला नोकरीच्या सुरुवातीला भेटलेला अनंत आणि सध्या माझ्या नोकरीच्या निमित्ताने माझ्यासोबत असलेले अनंत अर्थात अन्तूअण्णा यांचे मित्रप्रेम नेहमीच अनंत, अतूट असेल यात तीळमात्र शंका नाही.