अन्नदात्रीचा एकटीचा संसार
अन्नदात्रीचा एकटीचा संसार
नमस्कार आशा ताई, आज तुम्हाला "मातीतली अन्नदात्री" या पुरस्काराने सन्मानित केलं जातंय. कसं वाटतंय तुम्हाला हा पुरस्कार स्वीकारताना??? इथपर्यंत तुमचा प्रवास तुमच्या शब्दात ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. एका वृत्तवाहिनीतर्फे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात टीव्ही अँकरकडून आशाताईंना प्रश्न विचारला जातो. 'मातीतील अन्नदात्री' किती अनोखा शब्द आहे नाही का! या शब्दाचा अर्थही माहीत नसावा त्या माऊलीला. फक्त दहावी शिक्षण...बाहेरचं जग त्याआधी कधी अनुभवलंही नसताना आज स्वबळावर एकटीच्या खांद्यावर संसार पेलून आज समस्त जगासमोर हा पुरस्कार स्वीकारताना इतक्या वर्षांचा कठीण काळ तिच्या डोळ्यासमोर उभा ठाकला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आशा ताई शाळेत हुशार पण घरची परिस्थिती बेताची..त्यात दहावी शिक्षणच खूप..आता लग्न केलं की डोक्यावरच ओझं कमी होईल या विचारसरणीत घरचे अग्रेसर असल्याने आशाताईंनी दहावीची परीक्षा देताच त्यांचं लग्न सुरेशरावांशी करून दिलं. दहा एकर जमीन (तिघांत), मोठ घर, दोन मोठे दिर नोकरीला म्हणजे एवढया शेतीचे मालक फक्त सुरेशरावच होतील..पोरीच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल या विचारांनी वडिलांनी आशा ताईंना श्रीमंत घराची सून मिरवशील अस सांगून लग्नाला तयार केलं. लग्नानंतर एकत्र कुटुंबात आशाताई कसाबसा आपला जम बसवत होत्या. नवरा रात्रंदिवस शेतात आणि या घरात राबायच्या. घरातील वाद विवाद सोबतीला होतेच पण लवकरच संसारात आलेल्या दोन अपत्यांमुळे (एक मुलगा आणि मुलगी) यांत सारं काही विसरून जायच्या.
शेती म्हणजे सगळं निसर्गाच्या भरवश्यावर असणारा खेळ. चार वर्षे सतत दुष्काळाचे सावट असल्याने सुरेश रावांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला त्यातच दोन्ही भावांनी जमिनीत स्वतःची वाटणी मागून जमीन विकण्याचा निर्णय घेतला. डोक्यावर कर्ज,मुलांची शिक्षण, आणि जमिनीशी जोडलेली नाळ या भावनिक,व्यावहारिक गुंतागुंतीमुळे सुरेशराव दिवस रात्र काळजीत राहू लागले. जमिनीचा हिस्सा द्यायला ते तयार होते पण ती विकण्याचा निर्णय त्यांना मान्य नव्हता. स्वतःजवळ असणाऱ्या हिस्स्यातही दुष्काळाने काही पिकत नव्हतं. वाढतं कर्ज,नात्यांमधील दुरावे आणि बायको मुलांचा सांभाळ या काळजीने ते खचले आणि एक दिवस सुरेशरावांनी आत्महत्या केली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आशा ताईंना मुलांसह घराबाहेर काढलं गेलं. डोक्यावर छत नाही , खायला हातात पैसे नाही फक्त हक्काची जमीन घेऊन त्या लहान मुलांसोबत घराबाहेर पडल्या. काही दिवस वडिलांनी आधार दिला पण अस किती दिवस चालणार होतं.....अखेर कधीही चूल मूल या परिघाबाहेर न पडणाऱ्या आशाताईंनी हातात नांगर घेतला. सुरुवातीला वडिलांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने त्यांनी शेती करायला सुरुवात केली. बचत गटातुन काही पैसे घेऊन कुक्कुटपालनाचा जोडधंदाही सुरू केला. लोकांच्या वाईट नजरा झेलत, त्यांच्या टोमण्या आणि दूषणांकडे दुर्लक्ष करत त्या प्रामाणिकपणे दिवसरात्र मुलांना सोबत घेऊन शेतीत कष्ट करू लागल्या. पेरणी,भांगलन, मळणी सगळं काही मुलांनाही सोबत घेऊन त्या स्वतःच करत होत्या. देवालाही त्या माऊली वर दया आली असावी म्हणून त्या वर्षी वरूण राजा प्रसन्न झाला. पाऊस बघून आशाताई आणि मुलाच्याही डोळ्यातून आनंदाश्रू बरसू लागले.
शेतीत
चांगलं पीक आल्यावर आणि कुक्कुटपालनातुनही थोडे पैसे जमल्यावर त्यांनी स्वतःसाठी हक्काचं स्वतःच छोटं घर बांधलं. एकट्या माऊलीचा संसार आता स्वतःच्या घरात सुरू झाला.मुलं शेतीसोबत शाळेतील अभ्यासातही खूप हुशार होती. आशाताई दिवसभर शेतात राबून मुलांचा अभ्यास नीट चालू आहे का नाही याकडेही काटेकोरपणे लक्ष द्यायच्या. जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर हळूहळू आशाताईंनी शेतीवरील कर्ज फेडत आणलं होतं सोबतच त्या बचत गटातही सक्रिय होत्या. माहेरी व सासरी कधीही एक रुपयाचाही व्यवहार केला नाही पण बचत गटात त्यांच्या बुद्धीची चुणूक त्या दाखवत होत्या. प्रामाणिकपणा व धाडसी वृत्ती पाहून वरिष्ठांनी नवनवीन उपाययोजनांमध्ये त्यांना सहभागी करुन घेतलं होतं. गटात नव्याने सामील होणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्या योजनांची माहिती देत होत्या. अनुभवाच्या जोरावर इतर स्त्रियांना नवनवीन योजनांच आता ट्रेनिंगही देतात.त्यांच्यात लपलेल्या किंवा कधीही समोर न येऊन दिलेल्या धाडसी वृत्तीमुळे आणि आत्मविश्वासामुळे त्यांनी एकट्याने खूप प्रगती केली होती. कुक्कुटपालन व्यवसायातही बरेच टक्के टोणपे सहन केले पण हार मानली नाही. दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलं. शेती ही आपली आई आहे जी आपला उदरनिर्वाह करते त्यामुळे तीच योग्य संगोपन व्हावं या हेतूने मुलाला कृषी क्षेत्रातील शिक्षण घ्यायला लावले. मुलीचही शिक्षण पूर्ण करून तिला नोकरी करू दिली. कालांतराने मुलीसाठी योग्य वर शोधून हुंडा घ्यायचा नाही या अटीवरच मुलीचं लग्न लावून दिलं. शिक्षण कमी असेल पण अनुभवाने आशाताईंनी जीवनाचे धडे गिरवले होते. काय योग्य अयोग्य यातील फरक त्यांना कळत होता. मुलांवरही योग्य संस्कार करून त्यांना स्वावलंबी बनवलं होतं.
मुलगा आता आधुनिक शेतीचे तंत्र स्वतःच्या शेतीत अवलंबतोय. आशाताई एवढ्या प्रवासानंतरही थकल्या नाहीत...त्या अजूनही शेतातील कामे स्वतःच करतात. या माऊलीच्या डोळ्यांत आता एकच स्वप्न आहे ते म्हणजे थोडं मोठं घर आणि मुलाचं लग्न. जिथे शून्यातून त्यांनी एवढी प्रगती केली तिथे त्यांचं हे स्वप्नही नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही. एक स्त्री तिच्यावर वेळ आली किंवा तिला संधी दिली तर ती संधीच सोन करून दाखवते... कधीच हार मानून मागे हटत नाही तर संकटाला सामोरं जाऊन जिंकते याच उत्तम उदाहरण म्हणजे आशाताई. आज आशाताई जेव्हा मागे वळून पाहताना तेव्हा डोळ्यासमोर एका चाकावर उभारलेला संसार उभा राहतो. खऱ्या अर्थाने मातीतील अन्नदात्रीला पुरस्कार स्वीकारताना काही बोलता येत नव्हतं पण डोळ्यातून झरझर वाहणारे अश्रू सगळा प्रवास कथन करत होते.
कथा सत्य घटनेवर आधारित. अशा खूप सत्यघटना तुमच्या माझ्या अवती भवती घडतात. बळीराजा परिस्थिती समोर हतबल होऊन मृत्यूला कवटाळतो पण त्याच्या मागे अखेरपर्यंत त्याची बायको एका चाकावर तिचा संसार चालवत असते तेही अविरत, न थकता. शेतीतील कामात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांसाठी प्रेरणास्तोत्र ठरते. स्त्री फक्त स्त्री नसून ती एक आई असते. स्वतः मरणयातना सहन करून नवीन जीव जन्माला घातलेला असतो. मग या डोक्यावर कर्ज असो की अजून कोणतं जीवघेण संकट ती मुलांना पोरकं करून जाऊच शकत नाही. लढण हा तिचा स्वभाव गुणधर्म असतो आणि ती लढते आणि ती जिंकतेच.