'अनमोल नातं'
'अनमोल नातं'
ऐंशी नव्वद च्या दशकातली गोष्ट आहे. तो जमाना पत्र लिहिण्याचा होता. आता सारखे मोबाईल, व्हॉट्सॲप' तेव्हा नव्हते, त्यामुळे आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांची ख्यालीखुशाली पत्र लिहूनच विचारावी लागत असे. आपल्या भावना व्यक्त करण्याचं पत्र हे एक प्रभावी माध्यम होतं.
मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते की मला माझी काळजी करणारी, घेणारी प्रेमाची खुप माणसं मिळाली. माझा मावस भाऊ दिलीप चव्हाण (दादा) त्याचं माझ्यावर खुप प्रेम आहे. तो एकटाच, त्याला भाऊ-बहिण नाही, चुलत भावंडं आहेत पण त्यांची सर्वात जास्त आवडती बहीण मीच आहे. माझ्यावर त्याचा जीव लहानपणापासूनच आहे. तो बारावी पास झाला आणि देशसेवा करण्यासाठी मिल्ट्रीत दाखल व्हायचं असं त्याने ठरवलं. कारण या लाईफचं त्याला खुप आकर्षण होतं. भरतीसाठी अर्ज केला. काही दिवसांतच त्याला कॉल आला. त्यासाठी कोल्हापुरला गेला व सिलेक्टही झाला. आता पुढे त्याला ट्रेनिंगसाठी बेंगलोरला जावं लागलं.
मिल्ट्री ट्रेनिंग कसं असतं ते त्याला थोडफार माहित होतं, पण ते किती खडतर असतं ते प्रत्यक्ष अनुभवल्यावरच कळले. ते खडतर ट्रेनिंग अन् त्या दरम्यान येणारे रोजचे अनुभव तो मला पत्रातून लिहून पाठवत असे. फिजीकल फिटनेस ट्रेनिंगबद्दल तो पत्रातून सविस्तर लिहीत असे. पहाटे लवकर उठून कसा व्यायाम करावा लागतो, आज असं ट्रेनिंग झालं, तसं झालं . रनिंग, पुशप्स, पुलप्स, आणि बरेच व्यायामाचे प्रकार सविस्तरपणे लिहीत असे. ट्रेनिंग दरम्यान चुकणाराला होणारी शिक्षा, सगळं काही बारीक सारीक गोष्टी तो सांगत असे. तिथली शिस्त, दरारा, जेवण याबद्दल सगळं काही तो पत्रातून लिहून कळवत असे. जवानांना केवळ शारिरीकदृष्ट्याच नव्हे तर&n
bsp;मानसिकदृष्ट्या ही खंबीर बनवलं जायचं आणि त्याचबरोबर सहनशीलही, हे त्याने वर्णन केलेल्या सविस्तर माहितीतून समजत असे. ही पत्र मी आईला वाचून दाखवत असे. तिचा ही त्याच्यावर पोटच्या मुलासारखा जीव आहे. खरं तर अशी सविस्तर माहिती आणि खुशालीची पत्र तो मलाच पाठवत असे, एवढं आमचं बहिणभावाचं प्रेम होतं.
दिवाळी आणि संक्रतीच ग्रिटींग कार्ड पाठवून आमच्या कुटुंबातील सर्वांना शुभेच्छा संदेश पाठवायचा.
त्याने पाठवलेल्या पत्रांचा मोठा गठ्ठा मी सांभाळून ठेवला होता. माझ्या माहेरी माझ्या काही वस्तू माझ्या आईने अजुन जपुन ठेवलेल्या आहेत. त्यात हा गठ्ठा ही होता. पण आता हा अनमोल ठेवा त्यात मला सापडला नाही. ही पत्र कुठे अन् कशी गहाळ झाली कळतंच नाही मला. माझ्या मनाला त्याची खुप चुटपुट लागून गेली. त्या वर एक छान पुस्तक तयार झालं असतं. असो, आता यावर काही इलाज नाही.
'लान्स सुभेदार नायक 'या पदावरून एक्कावन्नाव्या वर्षी तो आता रिटायर झालाय.पुण्यात असतो. वहिनी माझी केवळ वहिनीच नाही तर खास मैत्रिणी सारखं आमचं नातं आहे. आमचं बहिण भावाचं प्रेम अजुनही अखंड आहे आणि अव्याहतपणे ते अखंड रहाणार आहे.....
मला आलेलं पहिलं पत्र ही त्यानेच पाठवलेल. नियुक्ती झाली अन् ट्रेनिंगला बेंगलोरला जातोय हे सांगणार ! तेव्हा आमच्या घरी फोन नव्हता, पण त्याने पाठवलेल्या पत्रांनी केवढा मोठा जिव्हाळा जपला गेला.हे मी कदापिही विसरू शकणार नाही. माझ्या पेक्षा तो पाच वर्षांनी तरी तो मोठा आहे, पण तो मला ताई म्हणतो.
'प्रिय ताई' अशी पत्राची सुरुवात मला खुप सुखावून जायची.