अन काक स्पर्शून गेला....
अन काक स्पर्शून गेला....


आईच्या पाचव्या श्राद्धाचा दिवस आला. मी आदल्या दिवशी सर्व तयारी, करत असे, ओटीसाठी नारळ, पानं, फुलं, हार, फळं, केळीची पानं...पण या वर्षी काहीच नाही. लाॅकडाऊनचं कारण तर होतंच, त्यावर सोसायटी क्वॅरन्टाईन मध्ये! वरील पैकी एकही वस्तू आणायला जायची सोय नाही. कणीक, वगैरे वस्तू संपत आलेल्या. कसं काय करायचं?
देव, आई आणि गुरुंचं नाव घेतलं आणि आहे त्या सामानात पूजा आणि नैवेद्याची तयारी सुरू केली. आईला भजी आवडायची म्हणून दर वर्षी भजी असतेच, त्यासोबत तांदळाची खीर, बटाट्याची भाजी, पुरी, मसाला भरलेली तळलेली मिरची, वरण, भात....इतकं तर झालं!
कावळ्याचा घास एका प्लेट मध्ये काढला. आता प्रश्न होता ती ठेवायची कुठे. गच्चीत नेहमीप्रमाणे जाणं थोडं जोखमेचं होतं, त्यात कावळा कुठेच दिसेना. ती प्लेट आईच्या फोटोपुढे धरली आणि प्रार्थना करेपर्यंत, "काव!" असा आवाज आला. खिडकी समोरच्या बालक्नीच्या काठावर कावळा बसला होता. मी ग्रिलमध्ये प्लेट ठेवली आणि त्याला मी दिसू नये म्हणून मागे होण्याआधीच तो झेपावला. तरी मी दोन पावलं मागे गेले. मग काहीच हालचाल ऐकू आली नाही म्हणून पुढे आले. कावळा तर नव्हताच, प्लेटमधली भजी गायब झाली होती!
काक स्पर्शून गेला होता!