अगर तुम साथ हो
अगर तुम साथ हो
"अरे येतोयस ना?? किती वेळ लागेल??" समीहा चिडलेली पण तरीही तसं न दाखवता जरा सौम्य आवाजात नीरजशी फोनवर बोलत होती. "अग हो निघालोय..पोहचतोय दहाच मिनिटात". नीरजही वैतागलेला पण तरीही संयम राखून समीहाला उत्तर दिलं. दोघेही वेगळे राहत असल्यापासून आज एक दोन महिन्यांनी पुन्हा समोरासमोर येणार होते तेही नीरजच्या घरी. नीरज दहा मिनिटात पोहचतोच... समीहा पाठमोरी दरवाजासमोर उभी असते. नीरज येताच मागे वळते..दोघांची नजरानजर खूप दिवसांनी...दोघेही हरवून जातात.. नीरज भानावर येऊन कुलूप काढत सॉरी म्हणतो. समीहाही it's ok अस म्हणून घरात प्रवेश करते.
घरात प्रवेश करताच सगळ्या वस्तू नीटनेटक्या आणि जागेवर पाहून नीरजला विचारते, "बाईने आवरलं वाटतं घर". "नाही...ती येत नाही बरेच दिवस झालं..लहान मुलगी आजारी आहे तिची." समीहाला पाणी देत नीरज उत्तरला.
समीहा समोरच्या सोफ्यावर बसून घरातल्या प्रत्येक गोष्टीच निरीक्षण करत होती.
"चहा की कॉफी घेशील?" नीरजने विचारलं...
"तू करणार आहेस?" काहीशा अवाक नजरेने बघून समीहाने नीरजला विचारले.
काहीही उत्तर न देता नीरज किचनमध्ये जातो.
"कॉफी" - समीहा
पण तुला तर चहा आवडतो ना? - नीरज
हो पण तुला कॉफी आवडते ना. - समीहा
तुला चहा मला कॉफी त्यात सकाळची ऑफिसला जायची दोघांची घाई यामुळेच आपली सकाळ भांडणानेच सुरूवात व्हायची. - नीरज
हम्म. पण माहीत नाही कस पण आजकाल मी चहाऐवजी कॉफीच जास्त पितोय.
समीहा एक नजर नीरजकडे बघून स्मितहास्य करत इकडे तिकडे बघू लागली.
समीहा - अरे तुझ्या टॉवेलला पाय आले वाटतं.. आपोआप जायला लागला आता सुकायला (काहीशा टोमण्याच्या स्वरात) नीरज - (हसत) हो त्याची मालकीण गेल्यापासून तो स्वतःच्या पायाने चालायला लागला.
यावर नीरजला टाळत कप ठेवायला किचनमध्ये जाते. नीरजही मागोमाग त्याचा कप ठेवायला किचनमध्ये जातो.
समीहा - किचन अगदी टापटीप ठेवलंयस. आधी मी कप ठेवायला जरी सांगितलं तरी तो प्लेट्सच्या रॅकमध्ये भरती व्हायचा. अरे वा... हा क्रॉकरी सेट तुला आवडत नव्हता ना.. तरीही समोर मांडलायंस.. मला किती ओरडलेलास यावरूनच एकदा. नीरज - अग छान दिसतो ना तो.. तूच म्हणायचीस ना लुक चांगला येतोय इथे असा ठेवला की म्हणून...
समीहा - मी नेहमीच काहीतरी म्हणायचे आणि तुला ते अयोग्य वाटायचं मग भांडण सुरूच व्हायचं.
नीरज - सगळंच तुझं बरोबर आणि माझं चुकीचं असं नव्हतंच ना... तुझ्याही काही गोष्टी चुकत होत्या पण तुला ते मान्य नसायचं.
समीहा - हे बघ यावर आता बोलायचं नाही. तसंही आपण वेगळे होणार आहोत आता... भांडायचं नाही असं मी ठरवून आले... माझी पुस्तकं आणि फाईल्स घ्यायला आले ते घेते आणि जाते.
समीहा बेडरूममध्ये जाते... खिडकीवरचे गुलाबी रंगाचे मलमली पडदे, बेडवर व्यवस्थित लावलेलं बेडशीट, तिचा आवडता फ्लॉवरपॉट, लॅपटॉप, चार्जर सगळंच ज्याच्या त्याच्या जागेवर बघून समीहाला प्रश्न पडला नीरज इतका सुधारला?? समोरच तिचा आणि नीरजचा लग्नातला फोटो बघून तिच्या डोळ्याच्या पापण्या ओलावतात.
कपाटाची चावी कुठे आहे... ती नीरजला हाक मारून विचारते..
नीरज बेडरूममध्ये येतो आणि सांगतो तू नेहमी ठेवायचीस तिथेच.
समीहा - तू कधीपासून जागेवर ठेवायला लागलास वस्तू?? आधी तर सगळा पसाराच असायचा आणि त्यात कोणतीच वस्तू भेटत नाही म्हणून माझ्यावरच चिडायचास.. मी वस्तू जागेवर ठेवूनही तुला कधी सापडल्याच नाहीत म्हणा जाऊ दे.
चावीने कपाट उघडून समीहा बघते तर कपाटातले कपडेही घडी करून अगदी व्यवस्थित लावलेले...
तिच्या फाईल्स आणि पुस्तकं उचलत जाताना नीरजला विचारते "खरंच का हा टापटीपपणाचा बदल तुझ्यात झालाय?? की दुसरं कोणी येतं घरात??
नीरज - दुसरं कोणी म्हणजे म्हणायचं काय आहे तुला??
समीहा - स्पष्टच विचारते ती मेघना तुझी ऑफिसमधली खूपच जवळची मैत्रीण... जिच्यामुळे त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकला नाहीस.. तसं तर तू कधीच वेळेत कुठे आला नाहीस माझ्यासाठी... कारण एकच असायचं नेहमी... ऑफिसमध्ये खूप काम आहे. त्या दिवशीही तिच्याचमुळे आपल्यात मोठी भांडणं झाली.. मी घर सोडलं पण तू तिला नाही सोडलंस... Good keep it up.
नीरज - समीहा तिला आपल्यात आणत जाऊ नकोस तुला खूपदा सांगितलं आहे. भांडण तिच्यामुळे नाही तर तुझ्या डोक्यात असणाऱ्या संशयी भुतामुळे झालं. मी त्या दिवशीही सांगितलं की तिला तातडीने घरी जायचं होतं... बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होत म्हणून मी फक्त मैत्रीच्या नात्याने तिला घरी सोडायला गेलो तिथेच उशीर झाला म्हणून तुझ्या घरी येता आलं नाही. पण तुझ्या डोक्यात नको ते शिजत होतं त्यामुळे काही समजून घ्यायच्या मनःस्थितीतच नव्हतीस. रागाने घरंच सोडून गेलीस. आपल्यात एकमेकांना वेळ देता येत नाही.. एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी वेगळ्या.. तुझी नेहमीची भुणभुण असं नको असंच कर, हेच खा आणि हेच कर त्यात स्वाभिमान गोंजारायची हौस त्यामुळे आधीच खूप वाद होत होते त्यातून हे संशयाच भूत शिरलं तुझ्या डोक्यात. आमची फक्त मैत्री आहे बाई.
समीहा - (दोघांचा समोरचा फोटो हातात घेऊन, डोळ्यातल पाणी अलगद पुसत) बघ ना लग्नात किती खुश होतो आपण दोघे. आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असंच वाटायचं लग्नाआधी आपल्याला... पण हळूहळू तू बदलत गेलास. तू तुझ्या कामात बिझी आणि मी माझ्या. प्रेमाची जागा तिरस्काराने आणि संवादाची जागा भांडणाने कधी घेतली कळलंच नाही. माझं चिडणं, बोलणं, रागावणं तुला दिसू लागलं पण त्यामागची काळजी, प्रेम कधीच नाही दिसलं. सात जन्माच्या नात्यात दुरावा कधी आला कळलंच नाही. Sorry आज भांडायचं नाही आणि इमोशनलही व्हायचं नाही असं ठरवलेलं पण फोटो पाहून जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. आता वेगळे होतोयच आपण.. माझ्या नीटनेटकेपणाच्या, नेहमीच असं वाग तसं नको अशा लेक्चरमधून मी कायमच मुक्त करते तुला. खुश राहा तू कोणासोबतही. मी निघते bye.
नीरज - (समीहा निघताना तिचा हात पकडून) कोणासोबतही कसं राहू जेव्हा मला तूच सोबत म्हणून हवी आहेस. (आश्चर्याने मागे वळते)
... भांडण झालं तेव्हा तू ही आणि मीही खूप रागात होतो... तू मेघनावरून संशय घेतलास याचा खूप राग आलेला मला. गेली तर गेली सोडून.. राहीन मी एकटा या आविर्भावात होतो. पण जसा राग शांत होत गेला तसं घर तुझ्याशिवाय सुनंसुनं वाटू लागलं. एकटा राहीन असं म्हणणारा माझा खोटा अहं गळून पडलेला. तुला फोन करायचा विचार यायचा डोक्यात पण तेवढ्यात ती घटस्फोटाची नोटीस हातात पडली. तुझ्याकडून ती अपेक्षा नव्हती. मग वाटलं तुलाच हे नातं नकोय तर जबरदस्ती का टिकवा. पण रोज तुझी आठवण यायची तेव्हा कॉफी प्यायचो. तुझ्या आठवणीत तुला आवडतं तसंच घर आवरू लागलो, सजवू लागलो. तू जवळ असण्याचा भास व्हायचा तेव्हा घरात. प्रत्येक वस्तू, गोष्ट तुला हवी तशीच ठेवण्यात मनालाच आंनद मिळायचा. वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल राग होताच पण तुझ्यावरचं प्रेम तुझ्या तुला या घरात जिवंत ठेवायला भाग पाडायचं.
मलाही माहितीये तुझ्या मनातही हीच भावना आहे म्हणून तर आज हा मोरपिसी रंगाचा मी दिलेला कुर्ता घालून आलीस. मीच गिफ्ट केलेले कानातले, मीच पसंद केलेली पर्स, माझ्याच आवडीची सँडल इतकंच काय परफ्यूम पण माझ्याच आवडीचं मारून आलीस. खरंतर तूही मला तुझ्यातून वेगळं करू शकलेली नाहीस म्हणून तर अजूनही तुझ्या फोनची कॉलरट्यून 'तेरे बिन नई लगदा दिल मेरा ढोलना' हीच आहे. आपलं ते 'तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना' अशीच गत आहे गं फक्त या दुराव्याने ते कळलं आपल्याला.
समीहा - (डोळे पुसून थोडं हसत) आणि तुझी पण तर 'अगर तुम साथ हो' ही मी सेट केलेलीच कॉलरट्यून अजूनही आहे. मीही तुला खूप मिस केलं या दिवसांत. वाटायचं पळत यावं तुझ्याकडे पण मीच का जावं..तुला गरज नाही का माझी असे नको ते विचार थांबवायचे स्वतःला. कितीदा तुला एकदा पाहण्यासाठी तुझ्या ऑफिसमोरूनही फिरले. तू सोबत आहेस तर सगळं आहे नीरज माझ्या आयुष्यात नाहीतर ते भकास आहे.
नीरज - खरं आहे तू सोबत असशील तर माझ्या असण्याला अर्थ आहे नाहीतर तुला माझ्यातून वगळता मी शून्यच आहे. पुन्हा कधीही भांडायचं नाही असं ठरवून समीहा आनंदाने नीरजच्या मिठीत अलगद विसावते आणि काही क्षणातच नीरजला ओरडते "तुझे शूज जागेवर न ठेवता असे बाहेर कसे टाकलेस.. तुला किती वेळा सांगितलं नीट राहत जा, नीट वागत जा'.