आवड
आवड


गाडी स्टेशनवर थांबली. उतरणारे प्रवासी भरभर उतरू लागले. स्टेशनवर असलेल्या हमालांची धावपळ सुरू झाली. जास्त दिसणाऱ्या सामानाकडे त्यांची नजर व पाय वळू लागले व नंतर प्रवाशांकडे पैशांच्या बाबतीत घासाघीस करू लागले. मी सुध्दा सर्वात शेवटी उतरलो. माझ्याजवळ जास्त सामान नव्हते. एक लहानशी सुटकेस होती. मला हमालाची मुळीच गरज नव्हती. पण, माझी नजर एका म्हाताऱ्या हमालावर पडली. त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या वयोमानाने त्याला हमालाचे काम झेपेल असे वाटत नव्हते. पण मला त्याची दया आली. त्याने माझी सुटकेस उचलण्यासाठी हात पुढे केला व भिरभिरत्या नजरेने माझ्याकडे पाहिले. मी सुध्दा "उचला बाबा" असे म्हणालो. माझ्यामुळे बिचाऱ्याला चार पैसे मिळतात तर मिळू द्या असा मनात विचार केला.
आम्ही दोघे चालू लागलो. मला खूपच शरमल्यासारखे वाटत होते. मी आजोबांना बोलकं करण्याचा प्रयत्न केला. "काय आजोबा कधीपासून हे काम करताय?" म्हातारा बोलू लागला, "साहेब, माझ समध आयुष्य हेच काम करण्यात गेले. आता मला जड ओझं पेलवत नाही. पण काम करायची इच्छा लय हाय. आपणासारख्याची नजर गेली की मिळतात चार दोन रूपये. तसे मला काम करायची ही गरज नाही. मला मुलगा, सून सगळे आहेत. मला काही कमी नाही. पण, लहानपणापासून हे काम करत असल्याने मला आता घरी बसवेना." "लहानपणी म्हणजे कधी आजोबा"?
"अरे माझे बाबा सुध्दा हेच काम करत होते. त्याच्या संगतीला म्हणून मी येत होतो. तेव्हा मी जेमतेम आठ वर्षाचा होतो. नेहमी प्रमाणे बाबा काम करत होते. डोक्यावर ट्रंक,त्यावर लहान बँग, खांदयाला केरी बँग व हातात सुटकेस, आणि बाबांच्या मागे लहान अटेची घेऊन मी. अचानक काय झाले कळलेच नाही. बाबा धपकन खाली कोसळले. मी किंचाळलो. सर्व लोकांचा घोळका जमला. बाबा पडले ते उठलेच नाहीत. तेव्हा घरी आई व लहान भाऊ व बहीण,आम्ही एकटे पडलो.
बाबा स्टेशनवर काम करतात हे मला ठाऊक होते. माझं शिक्षण तिसरी पर्यंन्त झालं होतं. आम्हाला कुणाचा आधार नव्हता. मी शाळा सोडली व संसाराला हातभार लावायचे ठरवले. मी बाबांसारखीच हमालगिरी करू लागलो. भावंडाना शिक्षण दिले. बहिणीचेही वयात आल्यावर दोनचे चार हात केले. भावाला सुध्दा लांब बाहेर शिकायला पाठवले. मी सुध्दा लग्न केले. मला एक मुलगा आहे. आता त्याचेही लगीन झाले आहे. माझ्या मुलाला मी खूप शिकवले
. तो ही चागंल्या कंपनीत आँफिसर आहे. त्याचे घर बंगल्यासारखे आहे. गाडी नोकर चाकर सगळं त्याच्याकडे आहे. मला सुध्दा तो चागंल्या प्रकारे वागवतो. माझी सून ही खूप प्रेमळ व लाघवी आहे. पण, साहेब खरं सांगू कां? कुणाला सांगू नका हं. ती समोरची झाडी दिसते ना तेथे माझे वास्तव्य आहे. तेथे एक गुहा आहे. रोज संध्याकाळी फिरायला म्हणून मी इथे येतो. त्या गुहेत जाऊन पेहराव बदलतो व नंतर स्टेशनवर येतो व हे काम करतो. ह्या अशा वेषामुळे मला कोणी ओळखत नाही. मी मात्र सर्वांना बरोबर ओळखतो. मी संपूंर्ण आयुष्य ह्या कामात घालवले. मला ह्या गाड्यांचा आवाज , गोंधळ ऐकला नाही तर चुकल्यासारखे वाटते. आठवड्यातुन दोन- तीन वेळा तरी मी हे काम करतो आणि त्याचा पत्ता कुणालाच लागत नाही. साहेब तुम्ही मात्र ही गोष्ट तुमच्यापाशीच ठेवा हं." " बरं बाबा " मी म्हणालो. थोड्या वेळाने मी बाबांना म्हटले, "आजोबा, आता तुम्ही चला. माझं घर जवळ आलं." " कुठ जायचे बाळ तुला. मी पोचवतो की." मी त्यांना नको नको म्हणून खूप आग्रह केला तरी बाबांनी ऐकले नाही. त्यांनी मला माझ्या ठिकाणा पर्यंत पोचवले.
माझे ठिकाण म्हणजे दुसरे तिसरे कुणाचे घर नसून खुद्द बाबांचेच घर होते. बाबांचा मुलगा सूरज व मी बरोबरच शिकत होतो. मी ईंजिनियर झालेलो. माझी व सूरजची खूप दोस्ती होती. सूरजच्या आग्रहानेच मी त्याच्या घरी आलो होतो. सूरजचे बालपण मला माहित होते. सूरज एक आर्दश मुलगा आहे हे मला माहित होते. खरच तो त्याच्या बाबांना जिवापलीकडे जपत होता. त्याच्या बाबांनी हे काम करावे? मला काही सुचेना. प्रत्येकाच्या आवडी, छंद, इच्छा वेगळ्या असतात. सूरजने बाबांना सूखात ठेवले होते. त्यांना काहीही कमी नव्हते. त्याच्या बाबांची आवड त्यांच्या आवडता तो आनंद मी कसा हिरावून घेऊ? बाबांनी मला ओळखले नव्हते पण बाबांनी सांगितलेल्या माहितीवरून मी मात्र बाबांना ओळखले होते. पण बाबांचा आनंद टिकवण्यासाठी हे गुपीत मला थोडा वेळ तरी लपवायला पाहिजे होते. बाबांनी मला घरी पोचवले व ते निघुन गेले.
मी घरांत शिरलो गप्पा गोष्टी,चहा पाणी झाले. तेवढ्यात बाबा (आमचे कुली महाशय) हातात काठी घेऊन परतले. सूरजने बाबांशी ओळख करुन दिली. मी बाबांकडे पाहून त्यांच्या पाया पडलो. "यशस्वी हो"असा बाबांनी आशिर्वाद दिला. त्यांच्या डोळ्यात चमक होती त्याच बरोबर चूप रहा, मला दिलेल्या वचनाची आठवण ठेव असा आग्रह ही होता.