'आठवणीतला रेडिओ'
'आठवणीतला रेडिओ'


माझ्या लहानपणी म्हणजे ८०-९० च्या दशकात आम्हाला रेडिओचे खुप अप्रुप वाटायचं. तेव्हा खेडेगावात रेडिओ हे मनोरंजनाच, आणि माहितीच प्रभावी साधन होतं.
बहुतेक लोकांकडे रेडिओ असायचा. आमच्याकडे फिलिप्स कंपनीचा रेडिओ होता. पहाटे पाचला आई रेडिओ सुरू करायची. एका सुमधुर ट्युनने रेडिओ प्रसारणाला सुरूवात व्हायची.नमस्कार हे आकाशवाणीच सांगली केंद्र आहे अशी सुरुवात होऊन प्रभात वंदन व लगेच भक्तिसंगिताचा कार्यक्रम सुरू व्हायचा. भक्तिगीते रोज ऐकून त्यांची अवीट गोडी लागली होती.देवांच्या वारा नुसार पहिलं गाणं असायचं, म्हणजे गुरुवारी ब्रम्हा-विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले ....तर शनिवारी अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय हनुमान ....असं गाणं ऐकायला मिळालं की सर्वत्र चैतन्य पसरायचं.
सकाळी ६.५५ च्या बलदेवानंद सागर यांच संस्कृत बातमीपत्र असायचं. सात वाजताच्या बातमीपत्राची सर्वजण आतुरतेन वाट पहात असायचे, तेव्हा वृत्तपत्र घरी येई पण थोड उशिरा. रेडिओच्या बातमीतूनच राजकिय, सामाजिक घडामोडी लोकांपर्यंत लवकर पोहोचायच्या.
प्रभात वंदन, विज्ञान ज्योत, दादा ताईचा सुमधुर आवाजातला संवाद खुप असायचा, हा संवाद माझ्या आवडीचा होता. गाण्यांच्या काही सदरांमधुन उपयुक्त अशी माहिती मिळायची.
आपली आवड हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी १०.३० वाजता असायचा त्यात श्रोत्यांनी पत्र पाठवून कळवलेली आवडीची छान गाणी ऐकवली जायची. यातून खुप छान छान मराठी गाणी समजली. बालगीतांचा ही कार्यक्रम प्रसारित व्हायचा. सगळी आवडती बालगीत
मला व माझ्या भावंडांच्या तोंडपाठ होती. असावा सुंदर चाॉकलेटचा बंगला.. ये आई मला पावसांत जाऊ दे .. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..? साने गुरुजींचे आता उठवू सारे रान... एकसुरात पुर्ण गाणं म्हणायचो. खरंच रेडिओ ने आमच्या कानावर खुप चांगले संस्कार केले.
सोमवारी रात्री नऊ वाजता नाटक लागायचं आठवड्यातून एकदा लागणाऱ्या नाटकाची आम्ही आतुरतेने वाट बघत असायचो. रात्री आठ वाजता अमीन सयानी यांच्या बहारदार आवाजात सुरू असलेला 'बिना का गीतमाला' हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ही खुप आवडायचा. घरातली मोठी माणसे आणि मुले क्रिकेटची काॅमेंट्री (धावत समालोचन) आवडीने कान देऊन ऐकत असतं.
सुगम संगीत, लोकसंगीत, भावगीते रेडिओ मुळे खुप चांगल्या पध्दतीने समजलीत. दररोज अर्धा तास एखाद्या दर्जेदार कादंबरीच वाचन ऐकायला मिळायचे. लेखक, विविध क्षेत्रातल्या नामांकित लोकांची मुलाखत असायची.
काम करत करत घरातल्या महिला रेडिओ ऐकत असतं. रेडिओ ऐकण्याची मज्जा काही औरच होती.
नंतर टीव्ही आले तरीही रेडिओ ची लोकप्रियता कमी झाली नाही. रेडिओमुळे मनोरंजनाबरोबर ज्ञान, माहिती, साहित्य, कला, संगीताची जाण मिळत होती.
आता सध्या ही आकाशवाणी ची केंद्र सुरू आहेत, २३९खाजगी रेडिओ स्टेशन आहेत. रेडिओ कमी प्रमाणात ऐकला जातोय पण त्याचे महत्त्व झाले नाही. हीच त्यांच्या आवाजाची खरी ताकद आहे.
(प्रिय वाचक हा लेख वाचून तुमच्याही आठवणी जाग्या झाल्या असतील,त्या येथे नक्की शेअर करा.)
लेख आवडला असेल तर शेअर करा माझ्या नावासह.