आठवणीतील मैत्री
आठवणीतील मैत्री


सौम्या मस्त वाफाळलेला चहाचा कप घेऊन खिडकीत बसली होता. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पाऊस खिडकीत बघत चहा प्यायला कोणाला आवडत नसेल असं या जगात कोणी नसेलच. सौम्यालाही हा मोह आवरला नाही. सगळं काम आवरून मस्त रिमझिम पाऊस बघत चहाचा आस्वाद घेत होती. खिडकीतून साधारण १३-१४ वयाच्या पाच मुली पावसात भिजताना दिसल्या. शाळेतून येतानाच त्यांची ही पावसातली मस्ती चाललेली. सौम्या त्यांना बघून भूतकाळात गेली. सौम्या,नलिनी,प्रिया,तनुजा आणि उर्वशी शाळेतल्या घट्ट मैत्रिणी. सौम्या तशी त्यांच्यात नंतर सामील झाली. बाकी चौघीजणी तिसरी पासून एकत्र होत्या. सौम्याने सातवीला त्यांच्या शाळेत प्रवेश घेतला. तस सौम्या,नलिनी आणि प्रिया एकाच बिल्डिंग मध्ये राहायच्या त्यामुळे तोंडओळख होती पण कधीच बोलणं नव्हतं झालं. ज्यादिवशी सौम्या त्यांच्या मध्ये सामील झाली तेव्हापासूनच त्यांच्या मैत्रीचा अध्याय सुरू झाला. पाचजणी नेहमी एकत्र असल्या तरी स्वभावात खूप फरक होता. सौम्या नावानेच सौम्य पण स्वभाव खूप तडफदार आणि फटकळ होती. अन्याय तिला सहन नाही व्हायचा. त्यात स्त्रीप्रधान होती, पुरुषप्रधान संस्कृती तिला अमान्य होती. नलिनी खूप शांत,संयमी,हुशार आणि भांडण,तंटा यापासून दुर राहणारी, स्वतःचच वेगळं अस जग असणारी होती. प्रिया आणि केतकी मध्ये बरच साम्य होत. दोघी फटकळ आणि मुख्य मस्तीखोर,आगाव होत्या. त्यांच्यासमोर बोलायची कोणाची हिम्मत नसायची. उर्वशी यात सगळ्यात शांत, स्वतःच्याच विश्वात जगणारी अशी होती. तनुजा हे वेगळंच रसायन होत जे कळतच नव्हतं. ती पण मस्तीखोर होती पण कोणाच्या अधे मध्ये नसणे, एकटेच राहणे असा तिचा फंडा होता. सौम्याचा शाळेचा पहिला दिवस. जरा अवघडूनच वर्गात आली आणि पहिल्याच बेंचवर जाऊन बसली कारण तिथेच जागा होती बसायला. पहिल्याच बेंचवर नलिनी आणि उर्वशी बसायच्या. प्रिया आणि तनुजा दुसऱ्या बेंचवर असायच्या. सौम्याला खूप कसतरी वाटत होतं पण पहिल्याच दिवशी नलिनी आणि उर्वशी ने तिच्याशी बोलून तिचा आत्मविश्वास वाढवला. नलिनीचा नेहमी पहिला नंबर यायचा परीक्षेत. अतिशय हूशार आणि प्रामाणिक होती ती. उर्वशी,प्रिया आणि तनुजा तिच्या मागोमाग असायच्या. पहिल्या दिवशी सौम्याला चौघीनी खुप सावरलेलं तेव्हापासून त्यांची चांगली गट्टी जमली. पाचजणींचा स्वभाव वेगळा असला तरी सगळ्या प्रेमळ, दयाळू, गरजूंना मदत करणे असा होता. एकमेकींसाठी तर नेहमी त्या सोबत असायच्या. कोणावरही संकट आले तरी बाकी चौघी तिच्या सोबत असायच्या. पैश्याची मदत च फक्त मदत नसते तर अश्या वेळी moral support खूप महत्त्वाचा असतो ते त्या नेहमी देत. एकदा असेच पाचजणी शाळेतून घरी जात असताना एका मुलाने नलिनी वर काहीतरी comment केली आणि ती सौम्याने ऐकली. झालं सौम्याला किती आवरलं तरी काय गप्प बसली नाही. त्या मुलाला म्हणाली,"तुझ्या घरी आई बहीण नाही का?" मुलगाही काही न बोलता तिथून निघून गेला. तो काही बोललाच असता तर प्रिया होतीच साथ द्यायला. अश्या बऱ्याच घटनांमध्ये प्रिया आणि सौम्या सोबत असायच्या आणि समोरच्याच्या नाकात दम आणायच्या. असच त्यांच्या बिल्डिंग मध्ये जो पाव अंडी विकायला यायचा त्याने वाकड्या नजरेने प्रियाकडे बघायची हिम्मत केलेली. दुसऱ्या दिवशी तो आला आणि खाली त्याची अंडी ठेवलेली सायकल लावून वरती द्यायला गेला. तेवढ्या वेळात या दोघीनी सायकल वरची अंडी फोडली. हा प्रकार कोणी केला हे त्याच्या ही लक्षात आल्यामुळे त्याने परत नजर वर करूनही प्रियाकडे पाहिलं नाही. तर अश्या या पाचजणी एकमेकांसाठी सोबत असल्या तरी त्यांच्यात भांडण झालेच नाही असं नाही बरं का. एकदा नलिनीने मस्करीत सौम्याला एका मुलाच्या नावाने चिडवलेलं आणि सौम्याला राग आवरला नाही, तिने पूर्ण वर्गासमोर नलिनीच्या कानशिलात लगावलेली. नलिनीला खूप दुःख झालं आणि स्वतःची चूक पण कळाली. ती संध्याकाळीच आईला घेऊन सौम्याच्या घरी गेली न तिची समजूत काढली. असे बरेच चांगले वाईट प्रसंग त्यांच्या मैत्रीत आले पण मैत्री तुटली नाही. त्यांची मैत्री बघून त्यांना शाळेत पाच पांडव नाव ठेवलेलं. असेच बरेचसे प्रताप त्यांनी शाळेतही केलेले. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचे स्तुती करणारे जेवढे त्यापेक्षा मैत्रीवर जळणारे जास्त होते. असच गैरसमजातून या पाचजणींमुळे सगळ्यांना त्रास होतो अशी तक्रार कोणीतरी मुख्याध्यापकांकडे केली आणि मग मुख्याध्यापकांनी या पाच पांडवांच्या पालकांना बोलावून ताकीद दिली की यांची मैत्री तोडा तरच यांचं भलं होईल आणि शाळेचं पण. समाज प्रेमाच्या विरोधात असतो हे ऐकलं होतं पण आता तो चक्क मैत्रीच्या विरोधात होता. पालकांनीही मनावर घेतलं आणि एकमेकींना भेटायच नाही असं बंधन पाचजणींवर टाकलं. या पाचजणीही हुशार होत्या. घरातून निघताना वेगवेगळ्या निघायच्या आणि मध्ये एके ठिकाणी एकत्र यायच्या...परत शाळा जवळ आली की वेगळ्या व्हायच्या. अस एक दोन महिने काढले. नंतर शाळा आणि पालक यांनीच हार मानली यांच्या मैत्रीपुढे. तस सौम्याच्या घरी वातावरण खूप कडक आणि शिस्तीच होत. तिची आई वारंवार या चौघींशी बोलण्यास मनाई करायची व सगळं शांतपणे ऐकेल ती सौम्या कसली. शाळेच्या सहलीला गेल्या तेव्हा समुद्र काठी वाळूत छान पाचजणींनी घरं बनवली आणि म्हणाल्या कितीही मोठे झालो तरी आपण एकत्रच राहायचं. अशीच बाजूबाजूला घर बांधून राहू शेवटपर्यंत. त्यावर उर्वशी म्हणाली," लग्न झाल्यावर ते कसं शक्य आहे?" प्रियाने लगेच उत्तर दिलं,"का नाही? नवऱ्याला सांगायचं आम्ही एकत्रच राहणार. जिथे सगळ्या तिथेच घर बांधायचं." यावर सगळ्यांच एकमत झाले आणि या पाच पांडवांनी तिथे वचनच घेतलं की ही मैत्री काही झालं तरी तोडायची नाही. इतकी वेड्यासारखी अल्लड मैत्री होती यांची. अशीच मस्ती,मजा,अभ्यास करत दहावी चांगल्या मार्कांनी पास झाल्या. आता प्रत्येकीने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. प्रिया आणि सौम्याने तर दहावीनंतर ती बिल्डिंग सोडून बाहेर गावीच राहायला गेल्या. तनुजा आणि उर्वशी एकाच कॉलेजमध्ये होत्या नलिनी मात्र वेगळ्या कॉलेजला होती. सौम्याला खूप दुःख झालं सगळ्यांपासून लांब जाताना कारण जाताना आईने तिला सांगितलेलं की परत इकडे कधी यायचं नाहीं, यांना भेटायचं पण नाही, नाहीतर शिक्षण थांबवून लग्न करण्यात येईल. नवीन कॉलेजमध्ये सगळ्या रमल्या खऱ्या पण पाचजणींची मैत्री मनांत घर करून होती. एक पोकळी निर्माण झाली होती. इकडे सौम्याच मन रमत नव्हत. काहीच संपर्क होत नव्हता चौघींशी.जाऊन भेटायलाही फार लांब होत आणि तेव्हा मोबाईलही दुर्मिळच होते त्यात घरून ताकीद होती भेटायचं नाही. सौम्या कसतरी येईल तो दिवस घालवायची. एकेदिवशी तिला कॉलेजमध्येच ओळखीचा मित्र भेटला जो त्या बिल्डिंग जवळच राहायचा. त्याला बघून तिला खूप आनंद झाला. सगळ्यांची आपुलकीने चौकशी केली आणि मी चौघींना खूप miss करते अस सांग म्हणाली. त्याने तो निरोप दिला आणि सोबत नलिनीचा मोबाईल नंबर आणला. आता कुठे सौम्याला बर वाटायला लागलं. तिच्याकडे मोबाइल नव्हता त्यावेळी पण coin box वरून फोन करून ती सगळयांची खुशाली विचारायची. इकडे या चौघी वेळ मिळेल तस भेटायच्या पण सौम्याला येता यायचं नाही. एकदा सौम्याने ठरवलेच जायचं आणि तस ठरवून ती नलिनीच्या वाढदिवसादिवशी गेलीच भेटायला.जवळ जवळ एक वर्षाने पाचजणी भेटत होत्या,खूप खुश होत्या. असेच दिवसामागून दिवस जात होते. सगळ्यांच शिक्षण चालू होतं. सौम्या घरी माहीत न होता अधून मधून भेटायला जायची. खासकरून नलिनीच्या वाढदिवसादिवशीच सगळ्या आवर्जून भेटायच्या. अश्यातच सौम्याला डिग्रीसाठी बाहेर जावं लागलं.तोपर्यंत मोबाइल बऱ्यापैकी सगळयांकडे असायचे. त्यामुळे मोबाइल मुळे त्यांची मैत्री अजून घट्ट होत गेली. नलिनीच शिक्षण पूर्ण झालं तस तीच लग्न ठरलं. प्रेमविवाह होता, मुलगा आधीपासूनच सगळ्यांच्या परिचयाचा होता त्यामुळे दोन कुलवरी मुलाकडून आणि दोघी मुलीकडून अश्या होत्या. सौम्या सुट्टी काढून तीन दिवस गेली लग्नाला. खूप वर्षांनी पाच पांडवांनी एकत्र येऊन धमाल मस्ती केली. नलिनी तिच्या नवीन आयुष्यात रमली. तोपर्यंत प्रियानेही आवडत्या मुलाशी लग्न केलं. तीच लग्न फार अचानक आणि घाईत झालं त्यामुळे कोणालाही जाता आलं नाही. तसे प्रियाला धक्के द्यायची सवयच होती त्यात हा नवीन धक्का. काही दिवसांत तनुजाचही लग्न झालं. तिच्या लग्नाला सौम्या फक्त जाऊ शकली, बाकीजणी आल्या नाहीत. काही दिवसांनी सौम्याची डिग्री पूर्ण होऊन ती नोकरी करायला लागली. नलिनी आपले घर सांभाळून नोकरी करत होती. उर्वशी,प्रिया पण नोकरी करायच्या. तनुजा लग्न झाल्यावर संसारातच मग्न झाली. आता भेट नाही व्हायची सारखी पण फोनमुळे जवळ होत्या एकमेकींच्या. कालांतराने उर्वशीच लग्न ठरल. तिच्या लग्नालाही फक्त नलिनीला जाता आल. कोणी कोणाच्या लग्नाला गेलं नाही म्हणून रुसून बसायच्या नाहीत. समजून घ्यायच्या आणि माहीतच होत की शुभेच्छा नेहमी सोबत असणार. सौम्या जमेल तस जायची भेटायला. प्रियाला मात्र शक्य नाही व्हायच आता भेटणं. हळूहळू काहीशी तिच्या वेगळ्या दुनियेतच ती राहू लागली. फोन पण कमीच झाले नंतर. सौम्यानेही तिला साजेसा मुलगा बघून लग्न केलं मात्र तिच्या लग्नाला कोणीच येऊ शकल नाही. लग्न झालंकी मैत्री मागे पडते तसच काहीस झालं प्रत्येकीच. प्रत्येक जण आपापल्या संसारात व्यस्त असताना अचानक कळत की प्रियाचा काहीच पत्ता नाही. तिच्या नवऱ्यालाही आजपर्यंत माहीत नाही की प्रिया अचानक का आणि कुठे गेली. या चौघी पण शक्य होईल तस तिला शोधण्यासाठी प्रयत्न करतात परंतू असफलताच पदरी पडते. आजही चौघी संपर्कात आहेत पण भेट नाही होत. आज पावसात त्या पाचजणींना भिजताना पाहून सौम्याला पाच पांडव आठवले. सहलीदिवशी समुद्रकाठी वाळवाळूने पाचजणींनी बांधलेलं घर समुद्राच्या लाटांनी वाहून गेल आणि आज त्या सुरेख आठवणी सौम्याच्या डोळ्यातून वाहत होत्या. बालपण निरागस आणि छान असत त्यात अश्या जीवाला जीव देणाऱ्या
मैत्रीणी असतील तर अजून सुंदर होत. सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळत असताना सौम्याला आठवत आता friendship day आहे आणि नवरा त्यादिवशी सगळ्या मित्रांना भेटायला जाणार आहे. सौम्या विचार करते दहा वर्षे झाली आम्ही पाचजणी भेटलोच नाही. या मैत्रीदिनाला नक्की भेटू. समोरासमोर नाही भेटता आलं तरी video call करू. या technology चा चांगला वापरही करूयात. नाहीतर या संसाराच्या रहाटगाडग्यातून अनेकदा मित्र मैत्रिणींना आपल्याला भेटताच येत नाही. सौम्या मनाशी ठरवते की काहीही करून यावेळी चौघी नक्की भेटू आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ. एकच खंत आहे की प्रिया कुठे आणि कशी असेल. कुठे असेल तिथे ती सुखात असो अस बोलून सौम्या बाकी तिघींना फोन करायला मोबाइल हातात घेते. तोपर्यंत पाऊस बरसून सगळीकडे छान सुगंध दरवळलेला असतो सौम्याच्या आठवणींसारखा. काय मग मैत्रिणींनो अश्या आठवणीतल्या मैत्रीत तुम्हीही भिजला असाल. तुमच्याही खुप जिवलग मैत्रिणी असतील ज्यांना भेटावंस वाटतय. सौम्याने तर ठरवल की या मैत्री दिनाला तिच्या प्रिय मैत्रिणींना भेटायचं आणि खूप गप्पा मारायच्या. तुम्हीही करा सुरुवात. मनमोकळं करा मैत्रिणींसोबत. भेटायची वेळ नाही येणार आपल्यालाच ती काढावी लागेल तेव्हा फार विचार न करता आणि वेळ न दवडता भेटा जिवलग मैत्रिणींना आणि करा साजरा मैत्रीदिन. मैत्रीसारखं निकोप अस दुसरं नातं नाही जगात. जपता येईल तेवढं चांगल जपा. सर्वांना मैत्रीदिनाच्या शुभेछा.