Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Fantasy

4.6  

Shubhankar Malekar XII C 360

Children Stories Fantasy

आठवणी...

आठवणी...

4 mins
416


15 ऑगस्टला आमच्या शाळेत झेंडावंदनचा कार्यक्रम असतो. खूप वर्षांनंतर आम्ही मित्रांनी पुन्हा शाळेत जायचे ठरवलं. सकाळी 5.30 ला उठून शाळेत जायची तयारी केली. मी 6.30 पर्यंत शाळेत पोहचलो. मला जरा उशीरच झाला होता. आत जाताच समोरच माझे मित्र आणि आमचे दहावीचे वर्गशिक्षक उभे होते. सरांची माझ्याकडे नजर जाताच सर म्हणाले, "मळेकर आजसुद्धा उशीराच."माझे सगळे मित्र हसू लागले. मला ही त्या दिवसांची पुन्हा आठवण आली. आमची शाळा सकाळची असायची. मला सकाळी उठायला नेहमी उशीर व्हायचा. माझ्यामुळे माझा मित्र सूरजलाही शाळेत जायला उशीर व्हायचा. नंतर आम्ही सगळे झेंडावंदनासाठी मैदानावर गेलो. आम्ही तिथे खुर्चीवर बसलेलो आणि शाळेतली मुले मैदानावर बसलेली. आम्हीसुद्धा शाळेत असताना मैदानावरच बसायचो. सर आम्हाला नेहमी उंचीप्रमाणे उभे राहायला सांगायचे. तेव्हा माझी उंची जरा कमीच होती म्हणून सर मला पुढे उभे राहायला सांगायचे. काही वेळ मी पुढे उभे राहायचो नंतर सर दुसरीकडे गेले की मी पुन्हा मागे जाऊन उभे राहायचो. कारण पुढे उभे राहिल्यावर शिक्षकांचं लक्ष असायचे आपल्याकडे. मागे उभे राहिला की मित्रांसोबत गप्पागोष्टी करता येतात.

      

काही वेळाने प्रमुख पाहुणे मैदानावर आले आणि झेंडा फडकवण्यात आला. आम्ही तिरंगी झेंड्याला सलामी दिली आणि राष्ट्रगीत बोललो. त्यानंतर शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर स्काऊट गाईडच्या मुलांनी परेड सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी भाषण दिले. शेवटी छान असा देशभक्तीपर गीतवर इयत्ता नववीच्या मुलांनी सुंदर असे नृत्य सादर केले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर आम्ही शाळेतल्या सर्व शिक्षकांना भेटलो. त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर आम्ही शाळेत गेलो. शाळेत जाताच आम्हाला आमच्या शाळेची घंटा दिसली. शाळेत असतात ती घंटा एकदा तरी आपण आपल्या हाताने वाजवावी असे वाटायचे. त्या बाजूलाच आमच्या मुख्याध्यापकांचे कक्ष होते. फार कमी वेळा मला या कक्षात प्रवेश करण्याचा योग आला होता. त्याच्या बाजुलाच आमचा वर्ग होता. आम्ही वर्गात गेलो. आमच्या त्या वर्गातल्या फार आठवणी जाग्या झाल्या. आम्ही ज्या बाकावर बसायचो त्यावर आम्ही आमचे नाव कोरून ठेवले होते. वर्गात शिक्षक नसताना आम्ही बाकाला कान लावून बाक आणि कंपास बॉक्स वाजवत बसायचो. पुन्हा आम्ही त्या बाकावर बसून आमच्या आठवणी ताज्या केल्या. आम्ही पहिल्या बाकावर बसायचो नाही कारण शिक्षक नेहमी पहिल्या बाकावरच्या मुलांना उत्तर विचारायचे. आमचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे पीटी, कारण त्या तासाला आम्हाला बाहेर मैदानावर खेळायला सोडायचे.


      पावसाळ्यात शाळेत येता येता आम्ही पूर्णपणे भिजून जायचो आणि वर्गात आल्यावर सर येईपर्यंत आम्ही मागच्या बाकांवर आमची छ्त्री सुकत ठेवायचो. पावसाळ्यात मैदान मात्र चिखलाने भरलेले असायचे. पावसाळ्यात नेहमी एका ना एका दिवशी छत्री उलटी व्हायची आणि अनेकदा मी छत्री शाळेत विसरलोय. शाळेतून घरी जाताजाता मित्राकडे दप्तर देऊन मस्त पाऊसात भिजायचो घरी गेल्यावर आई विचारायची, "छ्त्री असून इतका भिजलास कसा?" तर आम्ही सांगायचो, "आई पाऊस खूप जोरात होता हवेने छत्री उलटी झाली." परंतु पावसाळ्यात मात्र पुस्तक नेहमी भिजायची. जागोजागी पाणी भरलेलं असायचं आणि जोरात पाऊस असला तर आम्हाला सुट्टी मात्र मिळायची. शाळेच्या सहलीला तर खूपच मज्जा यायची. सहलीच्या आदल्या रात्री मात्र झोपच नाही लागायची. सकाळी 5 वाजता उठून आम्ही सहलीला जायची तयारी करायचो. सकाळी छान अशा थंडीत आम्ही शाळेत जायचो.


      त्यानंतर आम्ही संपूर्ण शाळा फिरलो. त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या वर्गशिक्षकांकडे गेलो. त्यांच्याशी खूप काही बोललो. ते नेहमीच आम्हाला मदत करायचे, नेहमीच आमच्याशी हसून खेळून वागायचे, अनेकदा त्यांनी आम्हाला मारही दिलाय परंतु त्या मागचा उद्देश नेहमी चांगलाच असायचा. आमचा वर्ग प्रत्येक गोष्टीत हुशार होता. आम्ही मस्तीत पुढे, अभ्यासात पुढे, खेळात पुढे, मैत्रीत पुढे, सांस्कृतिक स्पर्धेत पुढे होतो. मधल्या सट्टीत एक वेगळीच धम्माल असायची. मधल्या सुट्टीत खेळता यावं म्हणून आम्ही तासालाच डब्बा खायचो. मधल्या सुट्टीत मैदानावर जाऊन आम्ही खो खो, कबड्डी खेळायचो. आम्ही खूप वेळा मैदानात धडपडलोयसुद्धा परंतु कधीच कोणी खेळायचं नाही सोडलं. वर्गात नेहमीच आपल्या बाजूच्या मित्रासोबत गप्पा मारायला फार मज्जा यायची. कधी कोणी मस्ती केली तरी कोणीही त्याच नाव शिक्षकांना नाही सांगायचं. भलेही सर्वांना शिक्षा होवो. परंतु आता मात्र त्या आठवणीच राहिल्या. नंतर आम्ही सगळे आमच्या पहिली ते चौथी ज्या शाळेत शिकलो तिथे गेलो. तिथल्या शिक्षकांना भेटलो ते अजुनही आम्हाला विसरले नाही. त्यांना भेटून खूप छान वाटला. त्यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर आम्ही एका झाडाखाली जाऊन बसलो. आमच्या शाळेत खूप झाडे होती. रक्षाबंधनाच्या दिवशी शाळेतली मुलं त्या झाडांना राखी बांधायचे. शाळेने आम्हाला खूप काही शिकवले. तिथे बसून आम्ही फार वेळ गप्पा मारल्या त्यानंतर आम्ही आपापल्या घरी गेलो. जाताजाता मनात फार आठवणी जाग्या होत होत्या. एकच दुःख आहे ते म्हणजे ते दिवस आपल्याला पुन्हा अनुभवता नाही येणार.


गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी...    


Rate this content
Log in