आनंदाचे झाड
आनंदाचे झाड


अमृतघट भरले तुझ्या घरी
का वणवण फिरशी बाजारी
मोत्या इवला, मनी सानुली
कुशीत कवळूनी त्यांना बसली, प्रेमे किती तव राजसबाळी
काळ तिथे क्रमिलास किती?
आम्हाला शाळेत ही कविता होती. त्याचे कवी आता आठवत नाहीत पण त्यातला गर्भितार्थ चांगलाच लक्षात आहे. आनंद ही शोधण्याची वस्तू नसून, ती गवसण्याची वस्तू आहे. आपल्या आजूबाजूला, छोट्याछोट्या गोष्टीतदेखील आनंद असतो फक्त त्याचा उपभोग घेता आला पाहिजे.
पावसाचे पहिले थेंब, सकाळी सकाळी थंडीच्या दिवसात गवतावर चमकणारे दवबिंदू,परमेश्वराच्या कुंचल्याने विविध रंगांनी नटलेले आभाळ, या साऱ्या गोष्टीतून सौंदर्याबरोबरच आनंद घेता आला पाहिजे. केसात कोणीतरी माळलेला मोगर्याचा गजरा, त्याच्या सुगंधानेदेखील मन प्रसन्न झाले पाहिजे. महिन्याचा पगार झाल्यावर त्यातील थोडेसे पैसे आई-वडिलांच्या किंवा सासू - सासऱ्यांच्या हातात ठेवणे व त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद कृतकृत्यतेची भावना, यातून सुद्धा आनंद मिळतो. महिन्या-दोन महिन्यातून एखाद्या दिवशी एखाद्या वृद्धाश्रमात जा, अनाथाश्रमात जा, त्यांना काहीतरी थोडासा खाऊ घेऊन जा, थोडावेळ त्यांच्यासाठी द्या त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. तो तुम्हाला जगण्याची ऊर्जा देतो. एखादा दिवस सरप्राईज घरी या घरातील मंडळींना वेळ द्या त्यांना आनंद द्या, तुम्ही आनंद घ्या. बायकोच्या वाढदिवसाला तिला एखादी सरप्राईज साडी आणा, वर्षभर ती तुमच्यासाठी राबत असते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा तुम्हाला किती आनंद मिळतो ते.
रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना हाड् म्हणून हाकलण्यापेक्षा त्यांना चार बिस्किटे खाऊ घाला, बघा ते किती विश्वासाने जवळ येतात. कधीकधी तर नुसता त्यांच्या डोक्यावरून हात जरी फिरवला तरी ती खुश होतात, आनंदी होतात, आनंदाने तुमच्याभोवती उड्या मारू लागतात. त्यात तुम्हालादेखील आनंद मिळतो.
अशा कितीतरी गोष्टी आहेत एखाद्याला वेळप्रसंगी मदत करणे, संकटात सापडलेल्याला मदत करणे, मग त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान, आनंद तुम्हालादेखील खूप काही देऊन जातो. एकंदरीत परोपकारी मदतीची वृत्ती ठेवली तर आनंदाचे झाड तुमच्या दारात ऊगवते, ते इतस्ततः शोधण्याची गरज नाही.