आजी आजोबा (जेष्ठ नागरिक )
आजी आजोबा (जेष्ठ नागरिक )
जवळपास सहा महिन्यांनी आजी आजोबा घरी आल्यामुळे अवनी आणि आर्यन खूप आनंदात होते. ते सारखे आजी आजोबांभोवती गिरक्या घालत ,बिलगत त्यांना काय गंमती जमती सांगू आणि काय नको असे झाले होते सहा महिन्यात त्यांनी आजी आजोबांना खूप मिस केले होते
अवनी आणि आर्यन दोघे भावंड. अवनी अवघी पाच वर्षाची तर आर्यन आठ वर्षाचा होता. त्यांचे आई बाबा दोघेही नोकरी करत होते. आई सारिका बँकेत तर बाबा मनोज संगणक अभियंता होते. सारिकाला लग्नानंतर दोन वर्षांनी आर्यन झाला. सारिका नोकरी करत असल्यामुळे मूल सांभाळून नोकरी कशी करावी याच्या विचारात होती. तिचे सासू सासरे गावी होते.सासू सासऱ्यांजवळ या समस्येची चर्चा करताच सासू सासऱ्यांनी मुलांची जबाबदारी आमची असे वचन दिले व गावचे घर बंद करून सारिका आणि मनोजकडे कायम वास्तव्यास आले. आर्यन सहा महिन्याचा झाल्यावर तिने बँकेत जायला सुरवात केली. तेव्हपासून सासू सासऱ्यांनी त्याचे पालन पोषण करण्यास सुरवात केली. सहा महिन्याच्या मुलाला सांभाळायला मदतीला सारिकाने तशी एक मुलगी ठेवली पण बाळाचे सर्व मालिश,अंघोळ, खाण्यापिण्याच्या वेळा आजीचं बघत होती. ती बाळाला त्रास होऊ नये म्हणून दुपारी बाळ झोपल्यावरही स्वस्थ झोपत नव्हती. आजोबाही त्याला आजीसोबत संध्याकाळी गाडीत बसवून फिरविणे तो रडला तर त्याला समजावत होते. हळूहळू आर्यन दोन वर्षांचा झाला. त्याला शाळेच्या बसमध्ये बसविणे, त्याची बॅग भरणे आल्यावर त्याला आवडेल ते खायला देणे नंतर दिवसभर त्याला गाणे म्हणून दाखविणे, झोपविणे शाळेत काय शिकविले ते घेणे, झोपविणे, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभम करोति म्हणवून घेणे आणि आपल्या आयुष्यात लोक कसे महान असतात , दुसर्यांना मदत करणे कसे महत्वाचे, माणसे जोडणे कसे महत्वाचे हे गोष्टीरूपात सांगणे हे सर्व करत.
सारिका आणि मनोज रात्री सात सडे सातला दमून घरी आल्यावरही त्याला वेळ देऊ शकत नव्हते. तेव्हाही आजी आजोबाच त्याला बघत . नंतर परत आर्यन तीन वर्षांचा झाल्यावर अवनीचा जन्म झाला. नंतर तेच सर्व आजी आजोबा तिच्यासाठीही विनातक्रार करत.यावेळी जबाबदारी मात्र त्यांच्यावर दुहेरी होती तरी ते सर्व हसतच करत. दोन्ही मुलांचे कोडकौतुक सारखेच करत. दोघांनाही संस्कार द
ेत. बहीण भावाचे नाते जपण्याचा प्रयत्न करत गोष्टी सांगत . शुभमकरोति म्हणवून घेत असेच सर्व करता करता अवनी चार वर्षांची होईपर्यंत काही तक्रार नव्हती. पण अचानक सारिकाला वाटायला लागले कि मुले सारखे आजी आजोबांच्याच मागे असतात. ते आपल्याजवळ येथी नाही आणि काही हट्टही करत नाही म्हणून ती प्रत्येक गोष्टींवरून वाद वाद करू लागली. आणि मुलांना आजी आजोबांपासून दूर कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करायला लागली. त्यासाठी तिने शाळेनंतर लगेच काही वर्गांना पाठविणे सुरु केले पाळणा घरात ठेवणे सुरु केले. त्यामुळे आजी आजोबाला घर खायला होई. त्यांनी एक दोनदा मनोज आणि सारिकाला याची जाणीवही करून दिली. अरे दिवसभर आम्ही घरी असतो आणि मुलांशिवाय आम्हाला कर्मात नाही पण मनोज म्हणाला त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी व काळानुसार ज्ञान मिळविण्यासाठी योग्य तोच निर्णय आम्ही घेतला. एवढे असूनही अवनी आणि आर्यन संध्याकाळी घरी आल्यावर आजी आजोबांजवळच जात आणि सारिका मनोजकडे दुर्लक्ष करत आणि त्यामुळे वाद अधिकच वाढत होते. म्हणून आजी आजोबांनी गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला व ते गावी गेले. पण त्यामुळे अवनी आणि आर्यन खूप रडायला लागले. मनोज आणि सारिकाला वाटले चार पाच दिवसात विसरतील पण त्या दोघांनीही खाणे पिणे कमी केले. कुणाशी बोलत नव्हते. बाहेर खेळत नव्हते. सारिका आणि मनोजने त्यांना खूप समजाविले पण काही फरक पडत नव्हता. शाळेतूनही तक्रारी यायला लागल्या. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवनी खूप आजारी पडली. तिला डॉक्टरकडे नेले तिचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. तापात सारखी आजी आजोबा अशीच बडबडत होती.
मग मनोजने सारिकाशी बोलून आईबाबांना परत आणण्याचा निर्णय घेतला व जवळपास सहा महिन्यांनी आजी आजोबा परत आले आणि त्यांना बघताच अवनी आणि आर्यन दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले. अवनी आजी आजोबाला काही केल्या सोडायलाच तयार नव्हती. हे सर्व बघून मनोज आणि सारिकाचेही डोळे भरून आले व त्यांनी आईबाबांना माफी मागून कायम तिथेच थांबण्याची विनंती केली व आर्यन आणि अवनीचे पाळणाघरही बंद केले.
आता परत आर्यन आणि अवनी खूप आनंदी राहायला लागले व नातवंडांच्या सानिध्यात आजी आजोबाही खुश झालेत.