STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

2  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

आभाळ ओथंबून आलेले - मावशी

आभाळ ओथंबून आलेले - मावशी

4 mins
119

             मावशी किंवा हिंदीत तिला मांसी म्हणतात. म्हणजेच जी आईसारखी आहे किंवा तिचेच प्रतिरूप आहे ती मावशी.या नात्याबद्दल लिहावं तेवढं कमीच! कारण हे नातं आहेच तसं ज्यांच्या वाट्याला ही मावशी आली त्यांनाच कळेल की, मावशी काय असते ते? आजकालच्या एक दोन अपत्यांच्या काळात मात्र हे नातं अगदी दुरापास्त झालंय.दोघे असतील तर एकतर मामा नाहीतर मावशी आणि एकटेच असल्यास तर मग चान्स च नाही हो....!


मी खूप नशीबवान की मला मात्र तीन मावश्या आहेत. माझी मोठीं मावशी अगदी साधी ,सरळ सौम्य स्वभावाची बाई, शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली.आपल्या श्रुती ची आई !ही इतकी साधी आहे ना की आम्ही तिच्यापेक्षा कितीतरी लहान असूनही तिलाच तिच्या साधेपणावरून ऐकवत असतो.

मधली मावशी या मावशी च्या अगदी विरुद्ध !हुशार,अतिशय धोरणी अशी ही माझी मावशी. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत प्रामुख्याने हीचाच हात. ही एका कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्या आहे.माझ्यापेक्षा फक्त नऊ वर्षांनी मोठी. माझी लहान मावशी म्हणजे साऱ्या गोष्टींचे सुंदर मिश्रण असलेली. मी आज लिहिणार आहे ते याच मावशीवर...


माझी छोटी मावशी. माझ्यापेक्षा अगदी सहा वर्षांनी मोठी असलेली. हिचं माझ्या जीवनात असणं म्हणजे माझे भाग्यच! माझा जन्म आई आणि तात्यांच्या लग्नानंतर दहा वर्षांनी झालेला. आई नोकरी करायची. ती शिक्षिका होती. माझी आई वगैरे एकूण आठ भावंडं. माझी आई सगळ्यात मोठी. लग्नाच्या आधीपासूनच नोकरी करणारी. आई आणि तात्या दोघांनीही आपापल्या कुटुंबातील साऱ्यांना जणू शिक्षित करण्याचा जणू विडाच उचललेला. त्यामुळे माझे चुलत भाऊ,बहीण, आत्याची मुलं,मामा ,मावशी ही सगळी आमच्याकडे राहून शिकली.


       तर माझी ही मावशी सगळ्यात छोटी. ती अडीच वर्षांची असतांनाच माझी आई मातृत्वाच्या ओढीने तिला घेऊन आली आणि मग ती इथलीच झाली.

खरं तर यामुळे तिचं बालपण कायमचं हिरावलं गेलं. कारण इथे सगळीच शिकणारी मुलं त्यांना अभ्यास करता यावा म्हणून साऱ्या कामांचा लोड आईवरच असायचा.त्यातल्या त्यात तिची नोकरी. ती थकली की मग माझा मामा आणि मावशी तिची मदत करायचे. आणि हे सगळं बघतच ती लहानाची मोठी झाली.अन् अगदी नकळत्या वयातच समजदार झाली. खूप छोटेपणीच जबाबदारीची जाणीव झाल्याने तिचे बालपण आणि भावविश्व पार बदलूनच गेले.


          त्यातच माझा जन्म झाला.मग हळूहळू माझ्या बाबांना तिच्यावर आपल्या हातून अन्याय झाल्याची जाणीव व्हायला लागली. स्वतः ची मुलगी झाल्यानंतर मुलीसाठी उचंबळून येणारे प्रेम त्या लहानगी साठी कधी आले नाही याची बोच त्यांना जन्मभर राहिली. मी जसजशी मोठी होऊ लागली. माझे विश्र्वच ती झाली.इतर मुलींना जशा मोठ्या ताया असतात तशीच ती मला वाटायची.माझ्यावर तिचे जीवापाड असलेले प्रेम.माझा प्रत्येक हट्ट ती तीच्यापरी पूर्ण करायची.आमच्या दोघींच्या वयात फारसा फरक नसूनही ती मला बरेच दिवस कडेवर,पाठीवर घेऊन फिरायची. त्यामुळे माझी तर मज्जाच असायची.


             काही दिवसांनी मधली मावशी कॉलेज शिक्षणासाठी आमच्याकडे राहायला आली. ती जात्याच हुशार. स्वतंत्र अभिव्यक्ती असलेली. मेंढरं, कोकरांप्रमाणे गरीब जिणे जगणाऱ्या आम्हा दोघींना तिने आत्मभान दिले. तिच्या तालमीत मग माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वाची जडण घडण होत गेली. आमच्यामध्ये नवे स्फुरण जागृत केले. ही मावशी मात्र लहान मावशी सारखे अती लाड करायची नाही. त्यामुळे ती आवडायची नाही तेव्हढी.छोटेच वय ते! मी माझ्या मावश्यांच्याच विश्वात एवढे रमले होते की बास्स. छोट्या मावशीच्या रुपात तर मावशी,बहीण,मैत्रीण आणि त्याहीपलीकडे एक नवे विश्व तयार झालेले.उन्हाळ्यात सुट्यांमध्ये त्यांना गावाला सुद्धा मला लपून जावे लागायचे. मग मोठी झाल्यावर मात्र मीच हट्ट करून त्यांच्यासोबत जायचे.


          दोघीही छान शिक्षित झाल्या. आणि मी अकरावीत असतांना आई गेली. आणि मावश्या अजूनच जबाबदार झाल्या. दोघीही नोकरीला लागल्या. दोघींचीही लग्न झाली. मी सुद्धा शिक्षणा साठी बाहेर पडली. लहान मावशीकडले काका सुद्धा अतिशय प्रेमळ मिळाले.त्यांच्या रूपाने माझ्या बाबांना हक्काचे मोठे जावई मिळाले. माझे लग्न होईस्तोवर मावशी आमच्याकडे यायची माझ्या हट्टापायी .


            माझ्या लग्नात मात्र माझ्या,मावश्या,मामी आणि वहिनीने सारे सांभाळले.माझ्या लग्नानंतर मग मात्र माझे माहेरपण मावशीकडेच झाले. माझ्या बाळंतपणात माझी काळजीपोटी डिंकाचे लाडू पाठवण्यापासून सारे तिने केले. जेव्हा की ती इथेच लहानपणापासून राहिल्याने तिच्यासाठी मात्र हे सोपस्कार कुणीच केले नव्हते. कारण आमची काळजी वाहणारी आई आधीच देवाघरी गेली होती.


            तात्या गेल्यानंतरही मावशीने मात्र मला आईची माया कधीच कमी पडू दिली नाही. मावशी , काका अगदी गरज पडली की हाकेसरशी धाऊन येतात.माझी मुलं तिच्याकडे जायला सतत आसुसलेली असतात.तिच्या दोन्ही उच्चशिक्षित मुली एक डॉक्टर अन् एक इंजिनिअर माझ्या मुलांच्या अगदी हक्काच्या मावश्या बनल्या आहेत. माझ्या तीनही मावश्यांच्या मुली माझ्या मुलांचे इतके लाड पुरवतात की मला सख्खी बहीण नाही याची आयुष्यात कधी खंतच वाटली नाही.


             माझे बाबा नेहमी म्हणायचे.मुक्ता मला कळत नाही की शेवटच्या क्षणी डोळ्यासमोर कोण येईल तू की भूमी? जर तू आलीस तर भूमीवर अन्याय होईल अन् भूमी आली तर तुझ्यावर अन्याय होईल. पण या गोष्टींचे आम्हा दोघींना कधीच काही वाटले नाही कारण आमच्यात असलेले निर्व्याज प्रेम. ही अशी मावशी मला लाभली हे माझे भाग्यच! खरेतर आम्ही दोघी मनानी बहिणीच! पण ती चुकून माझी मावशी म्हणून जन्माला आली अन् माझ्या आयुष्यात या दोन्ही नात्यांची आभाळमाया पेरून गेली. मी नेहमीच चिंब भिजलेली असते या ओथंबलेल्या आभाळाच्या आभाळ मायेने..!


Rate this content
Log in