वारं मनातलं
वारं मनातलं
नको ते वाद
निरर्थक संवाद
बेछूट तो हल्ला
मनं ती कापणार
नको तो झंझावात
वादळ ते घोंगावणार
मनात चाललेलं द्वंद्व
कसं शांत होणार ?
नको वेडी आशा
व्यर्थ त्या अपेक्षा
नको ती निराशा
जिवघेणी उपेक्षा
अपेक्षाभंगाचं शल्य
मनाला कुरतडणार
तुटलेला तो भरोसा
काळीज चिरणार
नाजुक भावनांना
अव्यक्त संवेदनांना
नाजुक असं ते मन
किती काळ जपणार ?
अव्यक्त ते मन
आतल्या आत गुदमरुन
दम कोंडुन कधी
मुक्यानेच रडणार
आक्रोशाचा लाव्हा
पेटून उठणार
कोवळ्या मनाला
बेचिराख करणार
मनातलं काहुर
मनाच्या नकळत
अगदी दुरवर
सभोवताली पसरणार
वारं मनातलं
पश्चात्ताप करत
अगदी हलकेच
डोळ्यांना भिजवणार
मायेच्या फुंकरेनं
अहंकाराला सारुन
मनातलं वादळ
थोडसं शांत होणार
काळाच्या स्पर्शाने
आत्मपरीक्षण करत
गैरसमज मनातले
सारे ते मिटणार
मनाचं मनाशी
पेटलेले तुफान
समजुतदारपणे
आपसुकच शमणार
