तू सध्या काय करतोस
तू सध्या काय करतोस
तू सध्या काय करतोस...
भेटलास तर विचारीन म्हणते...
आतुरतेचा किती अंत पाहतोस...
सतत वाट पाहायला लावतोस...
तू सध्या काय करतोस...
भेटलास तर विचारीन म्हणते ...
आषाढ-श्रावण सरून झाले कित्येक महिने...
बघ हं...
म्हणजे माझ्या लक्षात आहे...
अश्विनातही कधीतरी यायचास ना रे तू...
तुझ्या आठवणींचा दरवळ अजूनही आहे सर्वांग शहारा मिरवणारा...
तुझे आषाढातले धुव्वाधार कोसळणे...
घनगर्द आठवांचे दाटणे...
अन् हलकेच श्रावणातले रिमझिम बरसणे...
जणू आठवांचे विरळ होणे...
म्हणूनच विचारतेय,
तू सध्या काय करतोस...
तुझा तो इंद्रधनुशी दरबार...
भुई अत्तराचा फाया...
अलवार कृष्णमेघांची होणारी दाटी...
खिडकीतून डोकावणारे चुकार थेंब...
तुझ्या आठवांच्या पागोळ्यांना नाही रे रोखू शकत...
म्हणूनच विचारतेय तू सध्या काय करतोस...
कधी बोचरा...
कधी रेशमसरींनी सजलेला...
कधी नुसताच झुलवणारा...
वाट पाहून पाहून थकवणारा ...
सारं हवंय रे परतपरत मला...
म्हणूनच विचारतेय,
तू सध्या काय करतोस...
तू होऊन ये धरेच्या गालावरची हसरी हिरवी लहर...
तनामनावर फुटू दे ना नवानवा रे बहर...
मेघदूता सजू दे ना पुन्हापुन्हा धरेचे यौवन...
ये सहस्त्र धारांनी दे रे मजला दॄढ आलिंगन...
अन् परतपरत नको ना विचारायला लावूस...
तू सध्या काय करतोस...
