तीचा जागर होऊ दे..........
तीचा जागर होऊ दे..........
*ती मायेचा पाझर, प्रसंगी होऊन कठोर*
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होवू दे।।धृ।।*
सदा माय ती घराची, सान-थोरही साऱ्यांची
सामर्थ्य ती वाहतसे, होऊनी ढाल उंबऱ्याची
सुश्रुषेचा गहिवर सारा, प्रेमळ झरा हा वाहू दे
*स्नेहमयी ती घागर , तिचा जागर होऊ दे।।१।।*
दिन-रात जागे मनं, तीचे लेकराच्यासाठी
संकटकाळी ऊभी माय, देखा तिच्या पिल्लासाठी
कर्तव्यदक्ष जननीचा दरवळ, घरा-घरात वाहू दे
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होऊ दे।।२।।*
रंग-रूपा पलिकडे, अढळ ध्रुवासमान
नभांगणातील तारकांचे, भासे लखलखते स्थान
घरादाराची मांगल्यज्योती,देव्हारी अशीच तेवू दे
*स्नेहमयी ती घागर,तिचा जागर होऊ दे।।३।।*
स्व-स्वप्नांना सारून बाजूला, रूप त्यागातही सजले
अडथळ्यांना देऊनी मात,अस्तित्वाचे ठसेही जपले
ओढा-ताणं, फरफट जीवाची, यश गुढी तिची उंच उभारू दे
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होऊ दे।।४।।*
तिच्या नात्यांचीही विणं,साक्षात भगवद् गीता
तिच्या कर्तृत्व ऋणाने आज, सागरही झाला रिता
अगणित मायेचं हे लेणं, घराघरातं लेवू दे
*स्नेहमयी ती घागर,तिचा जागर होऊ दे।। ५।।
