शुभ दिपावली
शुभ दिपावली
दिपावली असे सण
सर्वांच्याच आवडीचा
आनंदाची उधळण
दावी रूप संस्कृतीचा
येता सण दिवाळीचा
स्नेह ज्योती उजळिल्या
सजलीत घरेदारे
दीपमाळा सजविल्या
होता स्वच्छता घरांची
सुरु फराळाची घाई
लाडू चिवडा करण्या
दंग झाल्या ताई -माई
आनंदाच्या प्रकाशात
होते दिवाळी साजरी
मुले बाळे नटलेली
गोड दिसती गोजरी
सुवासिक उटण्याचा
गंध सारा फैलावत
स्नाने अभ्यंग चालती
फटाक्याच्या आवाजात
लक्ष्मी पूजन सोहळा
ओळ लावू पणत्यांची
झुले आकाश कंदील
शान वाढे अंगणाची
प्रतिपदा दिन असे
साडेतीन मुहुर्ताचा
शेवटचा भाऊबीज
बंधु प्रेमाच्या नात्याचा
दूर सारण्या तिमीर
लावुनिया दीप ओळी
घरे उजळू दीनांची
काढू सुंदर रांगोळी
एक गोष्ट करु नक्की
नको फटाके दुषण
ध्वनी हवेचे रोकून
दूर करु प्रदुषण
अशी असे दिपावली
सर्व सणांची ही राणी
" शुभ दिवाळी "सर्वांना
हीच प्रभो विनवणी.
