शाळा
शाळा
वाटे कधी कधी धावत जावेच त्या शाळेवर
घंटा वाजताच त्या वर्गात घुसावेच वेळेवर...
झालाच उशीर छडीची ती शिक्षा पण भोगावी
नाही होणार पुन्हा उशीर मला यावेच ताळेवर...
आलेत गुरुजी, उभे राहून... नमस्ते गुरुजी म्हणावे
बसा खाली म्हणताच... पटकन बसावे जागेवर...
आदेश गुरुजींचा पाळत, पुस्तक लगेच उघडावी
सुरु करावा तो धडा जो काल सोडला होता अर्ध्यावर...
शिकण्याचे आता दोन तास झाले...
उसंत मिळाली, वेळ घालू थोडा धिंगाणा करण्यावर...
आला खेळाचा तास... जोरात धावत जावे ग्राऊंडवर
खेळतील कोणी क्रिकेट, कबड्डी तर कोणी बसतील बुडावर...
संपली शाळा की तशी दप्तरे लगेच आवरावी
धूम ठोकून घरी, ताव मारावा टोपल्यातल्या भाकरीवर...
