शाळा, मित्र, बाक
शाळा, मित्र, बाक
खूप आठवते आजही ती शाळा
ते बाक, ते मित्र आणि तो फळा
सुट्टीत एकमेकाचे डबे पळवणे
कधी आपलं दुसऱ्यास भरवणे
एकमेकांशी निर्माण होई साहचर्य
गप्पा गोष्टीत रमती सारे मित्रवर्य
चित्रकलेच्या तासाची गंमत फार
व्यंगचित्रे काढून पोरं चुकवत मार
गणित, भूमिती व विज्ञान तासांचे तर विचारूच नका हो बाई
सूत्रं, प्रमेयं व संज्ञा सारं काही क्षणात डोक्यावरून जाई
इतिहास, भूगोलाची तर भीतीच मनात
सनावळ्या, नकाशा सारे विसरून जात
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे तास फार मजेत जात
नवनव्या गोष्टी, कल्पनाविलासात सारे रंगून जात
खेळाच्या तासाला होई दंगामस्ती फार
आठवड्यातून फक्त मिळती तास चार
आॅफ तासांना तर विचारूच नका किती मज्जा यायची
नकला, गाणी, चुटकुले यात सारी कशी गूंगूनच जायची
तास तो संपूच नये असंच सारखं मनात यायचं
बेल देणाऱ्या कांकावरच मन धुसफुसत राहायचं
राष्ट्रीय सण, उत्सव, जयंत्या, स्मृतिदिन खूपच उत्साहात साजरे व्हायचे
शालेय वातावरण जयघोष व जयहिंदच्या नाऱ्याने दुमदुमून जायचे
अशा शालेय जीवनातील त्या स्मृती सांगाव्या तरी किती
आजही गुरूजन, मित्र आठवले तरी नकळत डोळे पाणावती
