सगळे एकाच माळेचे मणी
सगळे एकाच माळेचे मणी
कुरघोडीच्या राजकारणात
कोण कोणावर कधी घसरेल
काही भरवसा नाही
अन् कालचा मित्र आज असेल
असंही काही नाही..!!
सकाळी उगवणारा नारायण
सायंकाळी मावळणार हे नक्की
एकाच माळेचे सतरा मणी
ही म्हण आहे तितकीच पक्की..!!
सुपातल्यांनी जात्यातल्यांना
उगाच नावे ठेवू नयेत
भरडणार मात्र दोघेही
हे सुज्ञास सांगावे लागत नाही
अन् मूर्खांच्या बोलण्यात
तसाही अर्थ नसतो काही..!!
उंटावरच्या शहाण्यांचे
दिखाव्यासाठीच असते
बोलघेवडे धडपडणे..
मान कापलेल्या कोंबडीचे जसे
केविलवाणे फडफडणे..!!
यत्किंचितशा लोण्यावरून
आपापसात भांडत राहतात
भक्त बोके वाटणीवरून..
अन् माकड पळवते सारे लोणी
कधी नगरसेवक, कधी आमदार
तर खासदार बनून..!
