पाऊसगाणी
पाऊसगाणी
1 min
190
म्हटलं तर पाऊस
म्हटलं तर हे पाणी
भरलेल्या आभाळाची
तू समजून घे वाणी!
किती घालशील बांध
किती अडवशी पाणी
थेंब ओघळतो तरी
घेता मिटून पापणी!
देता चाहूल क्षणाची
विचलित तू विराणी
कसे ठरेल पाऊल
बरसता गं अंगणी!
वारा चंचल गंधीत
वार्ता सांगे कानोकानी
अंतरात लपलेली
लख्ख दिसे सौदामिनी!
मिटणार ना कधीही
काळजावरील लेणी
युगायुगांची कहाणी
गाती पाऊसगाणी!
