निरोप तुमचा घेतो
निरोप तुमचा घेतो
निघालोय मी
आता निरोप तुमचा घेतो
पुढच्या वर्षी येईन
असं नाईलाजाने म्हणतो..!!
डीजेचा डेसिबल
कानास फारच छळतो
उंदीर माझा वाहक
मग घाबरून दूर पाळतो..!!
हिडीस नृत्याचा प्रकार
डोळ्यास नाही रुचत..
झाकून घेतो डोळे
बाकी काहीच नाही सुचत..!!
विसर्जनास तुमच्या
कसले तारतम्य नसते..
रात्र होते फार
अन् विमान माझे चुकते..!!
मन तुमचेच कोते
माझी नाहक ऊंची वाढवता..
रस्त्यात मंडप घालून
उगाच वाहतूक अडवता..!!
चुका तुम्ही करता
अन् लोकं मला नावे ठेवतात..
माझ्या अस्तित्वावर मग
नाहक प्रश्न उठवतात..!!
भावभोळ्या भक्तासाठी
तरी यावे लागेल मला..
तुम्ही कधी सुधारताय
हे ही पहावे लागेल मला..!!
