नदी सागर..
नदी सागर..
काल ती सहज म्हणाली,
असं नेहमीच का व्हावं..?
की सरितेनं वेडात सागराकडे धावावं..
अन् सागराने मात्र लाटांशी खेळावं
सागराचं मन इतकं निर्दयी का व्हावं..??
मी हसून म्हटलं,
अगं दिसतं तसं मुळीच नसतं
म्हणूनच सरितेचं मन अलगद फसतं..
सागराची ओढ खरी सरितेकडेच असते
लाटांशी नाते निखळ मैत्रीचे असतं..!!
तशी चिडली जराशी अन् म्हणाली,
उगाच थातुर माथूर बोलू नको
आणि नाकाने कांदे सोलू नको..
मी इतकीही भोळी नाही
तू समजतो तशी साखरेची गोळी नाही..!!
मी हसलो पुन्हा अन् म्हणालो,
जरा निरखून बघ लाटांना
मग कळेल तुलाही
सागराशी खेळता खेळता
लाटा किनाऱ्याशी लगट करतात
लोक मात्र उगाच सागराला दोष देतात..!!
आणि खरं सांगायचं तर
उधाणलेल्या सागरास
सरितेच्याच कुशीत शिरायचं असतं..
तीच्या गोडव्यास हृदयात भरायचं असतं..
आपले खारे(खरे)पण
तिच्यावर येथेच्छ उधळायचं असतं..
सारितेच्या प्रवाहात त्यालाही फेसळायचं असतं..!!
