मोगरा माळू मल्हारीला
मोगरा माळू मल्हारीला
आला आला वसंत आला
पुरंदरी ग मोगरा फुलला
पठारी दूरदूर डवरला
आसमंती सुवास दरवळला
मोगरा माळू मल्हारीला
मोगरा माळू म्हाळसेला
मोगरा माळू ग बानूला
मोगरा माळू जेजुरीला
श्वेत शुभ्र टप्पोर मोगरा
कुंद अशा काही शुभ्र कळ्या
गुंफुण माळेमध्ये वाहिल्या
सुगंध गाभारी दरवळण्या
वैशाखातल्या त्या वणव्यात
लाहीलाही अंगांगाला
चंदन उटी ती सर्वांगाला
लावली म्हाळसाकांताला
असे सदा गाभारा पिवळा
मोगर्यानी आज तो नटला
दिसे सखे किती शुभ्र ढवळा
आणि पसरला मंद परिमळा
देवा तव सोन्याची जेजुरी
लाभली बघ किनार रुपेरी
भक्तांच्या श्रद्धेला भाळला
मोगरा जेजुरीस माळला
