खीर आणि पुरी
खीर आणि पुरी
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफटून बसली ||
किती तू चिकट किती बाई तेलकट
तुला तळताना होते फार कटकट ||
कढईचे चटके बसतात हातावर
बारीक लक्ष लागतं उकळत्या तेलावर ||
तळल्यावर कशी फुगतेस टामटूम
उकाड्याने बायका होतात घामाघूम ||
शेवटी न राहवून पुरी म्हणाली
सांगते, नीट ऐक माझी कहाणी ||
असेन मी चिकट असेन मी तेलकट
सणांचा नैवेद्य परिपूर्ण फक्त माझ्यासकट ||
श्रीखंड-आम्रखंड यांच्याशी माझी यारी
घोळून गोड पाकात येते लज्जत भारी ||
तिखट लोणची, चटण्या, आमट्या
सगळेच आहेत माझे सवंगडी ||
बटर चीज बटाटा भाजी कढी
यांचीही साथ घडी-घडी ||
असा सगळ्यांसोबत येतो
निरनिराळा माझा स्वाद ||
तृप्त होऊन खवय्ये देती
समाधानाने दाद ||
ऐकून खीर जरा नरमली
उगीच हसलो म्हणून वरमली ||
म्हणाली आपलीही मैत्रीच बरी
तेव्हापासून खवय्यांना मिळाली खीर-पुरी ||
