चंद्र आणि सूर्य
चंद्र आणि सूर्य
सूर्य विचारी चंद्राला
की, "तू इतका थंड कसा,
किती शांत तुझी काया,
किती शीतल तुझी छाया" || १ ||
इंदू उत्तरी "आदित्या,
तळपतसी तू अखंड दिवसा,
झळ लागता सर्व जिवांना,
देतो बघ मी दिलासा" || २ ||
राकेश म्हणाला, "प्रभाकरा
तू इतका रे उष्ण कसा,
नेत्र दिपवते तुझी प्रखरता,
अग्निगोल तू मोठ्ठासा" || ३ ||
भास्कर वदतसे "रे अधिरा,
प्रातःकाळी सृष्टी उठता,
अंधःकार टाकतो उजळून,
ऊर्जा देतो मी सर्वांना" || ४ ||
प्रेमाचा साक्षी निशिकांत,
लहान मुलांचा लाडका मामा,
दिनकर भासला सफरचंद,
आवडला छोट्या हनुमानाला || ५ ||
बहिणींना देतसे निलाभ,
बंधू जैसे देतात शपथ,
अस्ताच्या चंडाशूने पाहिला,
संपताना जयद्रथ || ६ ||
एकच रवि एकच शशी,
वैशिष्ट्य मात्र भिन्न पहा,
कोणी नसे दुजासारखा,
गरज दोघांची सृष्टीला || ७ ||
विज्ञानाचं म्हणाल तर मानवाने,
गवसणी घातली निलेशाला,
हिरण्यगर्भाचं दर्शनही तो,
एक दिवस घेईलच म्हणा || ८ ||
तरीही भान असे दोघा,
उद्धार करती जैविश्वाचा,
काटेकोर बद्ध असती वचना,
न करती कुणाचाही हेवा || ९ ||
यांच्यासारखे व्हा,
उद्देश आपला स्वच्छ हवा,
न हरता न थकता,
फक्त स्वकर्तव्य करा || १० ||
सगळ्यांना हसवून जगा,
प्रेम भरभरुन करा,
असो कितीही संकटे,
शांत चित्ती कार्य करा ||११||
कधी भानूसारखे व्हा,
प्रकाशाने अंधाराला सारा,
कधी सोमेश्वर बना,
चांदण्यात सर्वांना भिजवा || १२ ||
गर्व मनी धरू नका,
ईर्षा मनी पेटवू नका,
राग मनी बाळगू नका,
ऋण उणे ठेवू नका ||१३||
जन्म नश्वर आहे,
सत्य आहे ईश्वर जसा,
चंद्रमा लुप्त होतो
आणि खग बुडतो तसा || १४ ||
आयुष्यात चढ-उतार ग्रहणापरी,
विप्रा-अर्का ग्रासतेच की नियती,
सुखाच्या सावलीत शेफारु नका,
दुःखाच्या झळांत कोलमडू नका || १५ ||
