काय दोष तिचा?
काय दोष तिचा?
येते... सांगून निरोप घेते,
रोज ती आई वडीलांचा.
पण... परतेना ती घरी अजुनही,
यात काय दोष तिचा...?
भविष्य घडविण्यासाठी आपुले,
ती चालते वाट यशाची.
या वाटेवरी अकस्मात,
पडे झडप तिच्यावर काळाची.
क्षणात होऊनी बसतो सारा,
हा खेळ नशीबाचा.
परतेना ती घरी अजूनही,
यात काय दोष तिचा...?
वासनांध राक्षसी ती प्रवृत्ती,
जिचा घाला पडे तिच्यावर.
आक्रोश करते अन् करते आर्जव,
पण ते मुळीच नसती भानावर.
मग एवढा छळही पुरे न होतो म्हणूनी,
करती अंत तिच्या आयुष्याचा.
परतेना ती घरी अजुनही,
यात काय दोष तिचा...?
वाट पाहती आई - वडील,
तिच्या घरी येण्याची.
कल्पनाही नसते त्यांना,
तिने सोसलेल्या संकटाची.
पण आता इतकी ती दूर गेली,
जिथे बंद असे मार्ग परतीचा.
परतेना ती घरी अजुनही,
यात काय दोष तिचा...?
