STORYMIRROR

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Others

3  

प्रा. सौ. सीमा नितीन शेट्ये

Others

जिद्द जगण्याची

जिद्द जगण्याची

1 min
392

श्रावणातल्या एका संध्याकाळी  

फिरायला गेले डोंगर माथ्यावर 

मन हिरमुसलेले, ताण-तणावाने पिचून गेलेले

चेहऱ्यावरचे मुखवटे काढून फेकून देत 

निसर्गाशी समरस व्हायला चाकोरीतून बाहेर पडले

 

सृष्टीचे ते अनुपम्य दृश्य पाहून मात्र 

मन पुन्हा उल्हसित झाले 

काय आणि किती साठवू या इवल्याशा डोळ्यांत 

हिरव्या तृणपात्यांनी शाल पांघरलेल्या त्या टेकड्या   

पर्वतरांगांमधून धोधो फेसाळत वाहणारे ते प्रपात 

झाडांच्या शेंड्याला मिठी मारून बसलेले धुके 

निळ्याभोर आकाशात ओबडधोबड आकाराचे शर्यत लावणारे ते ढग

क्षितिजाच्या पल्याड मावळतीकडे झुकलेला सूर्य

आभाळभर पसरलेल्या लाल, पिवळ्या, सोनेरी,

तांबूस रंगाच्या छटा 

परतीच्या वाटेकडे लागलेले पक्षी, हंबरणारे वासरू    

शेतातील कामे आटोपून दमून भागून घरी जाणारा

शेतकरी 

सगळं कसं प्रतिमेसारखं मनावर कोरल जात होतं


रंगीबेरंगी फुलपाखरासारखा हा निसर्ग

नवविध रूप घेऊन येतो आपल्यासमोर 

कधी पालवी, कधी पानगळ, 

तरीही गळून जाण्याची भीती नाही की कोमेजून जाण्याची खंत नाही 

फक्त इतरांसाठी ओंजळ भरून वाहणारा हा निसर्ग,

जगण्याचा गंध घेऊन तो रुजतो, फुलतो,

बहरतो आणि मातीत मिसळूनही जातो 


निसर्गाचं हे चक्र खूप काही शिकवून जातं माणसाला

अडचणी, खाचखळगे, समस्या येतच राहणार वाटेत 

पण काट्यांवरुनही रक्ताळणारा प्रवास करण्यात खरा संघर्ष आहे

म्हणूनच निराशा, आत्महत्या हा उपाय नव्हे की समाधान नव्हे कोणत्याही शंकेच

त्यासाठी जिद्द हवी जगण्याची, उमेद हवी कर्तृत्वाची 

शर्थीचे प्रयत्न हवेत यशाच्या प्रत्येक पंखावर आरुढ होण्यासाठी

तेव्हाच हिरवागार रसरशीत वसंत आणता येईल आपल्या जीवनात


चला तर  निसर्गाकडून शिकूया अन इतरांनाही शिकवूया

अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षण समरसून जगूया.



Rate this content
Log in