जात नाही
जात नाही
1 min
236
थंड गारं गारव्याला कोणतीही जात नाही
गर्जणार्या सागराला कोणतीही जात नाही
चिंब झाली धन्य झाली पावसाने सृष्टी सारी
प्राणदात्या पावसाला कोणतीही जात नाही
रानवारा संगतीला वृक्षवेली सोबतीला
खेळणाऱ्या पाखराला कोणतीही जात नाही
काळरात्री दूर केल्या तो धरेचा भाग्य दाता
तेजणाऱ्या भास्कराला कोणतीही जात नाही
मोहणारी बाग आहे खेळणाऱ्या पाडसांची
गंधणाऱ्या मोगर्याला कोणतीही जात नाही
एक वृक्ष खूप मोठा पूर्वजांनी लावलेला
वाढलेल्या सावलीला कोणतीही जात नाही
एक आहे वंश त्यांचा माणसांचा माकडांचा
माकडांच्या टोळक्याला कोणतीही जात नाही
