STORYMIRROR

Pramod Bawiskar

Others

4  

Pramod Bawiskar

Others

हे पावसा...

हे पावसा...

1 min
413

आता जरा थांब रे 

तू ही माणसासारखा वागायला लागलास

बेभरवशाचा...

पाहुण्यासारखं यावं, चार दिवस रहावं

आणि निघून जावं...

पण तू तर ठाण मांडूनच बसला की...


श्रावण महिन्यात आम्हाला बालकवींच्या कवितेतील

"क्षणात येते सरसर शिरवे 

क्षणात फिरुनी ऊन पडे" 

या ओळी अनुभवता आल्याच नाही...

एवढा तू धाड धाड कोसळतो आहेस


यजमानांना कंटाळा येईपर्यंत

पाहुण्याने एवढे दिवस राहू नये

मला माहिती आहे

तू नव्हतास तेव्हा तुझी

खूपच आठवण येत होती...

उन्हाने जीवाची काहिलीकाहिली झाली होती

म्हणून आम्ही तुझी आळवणी केली

'ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा' आणि तू आलास

पण पैसा दिला नाही म्हणून रागावलास की काय?....

म्हणून तू आमचं सर्वस्व लुटून नेतोय...


पण तू तसा नाहीस हे आम्ही जाणतो...

मग तू एवढा कोपलास का?

एकीकडे पूर आणि दुसरीकडे ठणठणपाळ असं का?

आमचे डोळे अजूनही उघडले नाहीत..

तू आल्यापासून आम्ही वृक्षारोपण, वृक्ष संगोपन,

जलपुनर्भरण, पाणी अडवलं नाही...

तुझं पिण्यायोग्य पाणी नदी नाल्यामार्फत 

समुद्रास जाऊन मिळतंय आणि 

खारट होतंय... याच कारणांमुळे

तू असा वागतोस ना?


हे पावसा आता तू जा 

जिथे तुझी गरज आहे तिथे जा

आम्ही धडा शिकलो...

यापुढे आम्ही तुझ्या निसर्गचक्रात 

ढवळाढवळ करणार नाही...

फक्त तू वेळेवर येत जा आणि सन्मानाने 

वेळेवर परत जात रहा...


Rate this content
Log in