गूज
गूज
1 min
28.4K
सांगायचे आहे आई एक गूज तुला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। धृ।
बाबांनाही हवी लेक, दादाला बहीण
दुनियेची अपूर्वाई डोळ्यांनी पाहीन
नको काही हौसमौज, हवा स्वप्नझुला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। १।
जाईन शाळेत, खूप अभ्यास करीन
जपेन दादाला, मोठी मी होईन
वेळोवेळी मदतीचा हात देईन तुला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। २।
आजीआजोबांना भरवीन घास
देणार नाही मी कुणा काही त्रास
गूज अंतरीचे सांगायचे तुला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। ३।
सुगंध कीर्तीचा दाही दिशा पसरीन
माझ्याच नावाने जग तुम्हा ओळखीन
संकटसमयी प्राण देईन देशाला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। ४।
नको नाकारू लेक, घटला जन्मदर
तुझ्या ममतेची होऊ दे भागीदार
नवनिर्मितीचे वरदान तुला मला
खुडू नको तुझ्या लाडक्या या फुला। ५।
