गाते त्याला मी अंगाई..
गाते त्याला मी अंगाई..
मऊ मऊ शैयेवरी निजला गं तान्हा बाई..
हलके हलके जोजवत, गाते त्याला मी अंगाई..
न्याहळतो केव्हाचा छत
झोप येईना माझ्या बाळा..
खेळण्यात रमला संगे
त्याच्या पायातला वाळा..
गालावरच्या खळीलाही त्याच्या गं झाली घाई..
हलके हलके जोजवत, गाते त्याला मी अंगाई..
शीळ घालुनी गातो मंजुळ
इवल्या वेलीवर इवला पक्षी..
आकाशी त्या चांदफुलांनी
शिंपीली बघ नाजूक नक्षी..
वेली, पाखरांच्या संगे तान्ह्याला गं पेंग येई..
हलके हलके जोजवत, गाते त्याला मी अंगाई..
मऊ मऊ शैयेवरी निजला गं तान्हा बाई..
हलके हलके जोजवत, गाते त्याला मी अंगाई..
हलके हलके जोजवत, गाते त्याला मी अंगाई..
