बुद्धिबळ जीवनाचा
बुद्धिबळ जीवनाचा
प्राॅ. १४
१४/०५/२०१९
कवितेचे शीर्षक - बुद्धिबळ जीवनाचा
कोण वजीर, कोण प्यादा
'बुद्धिबळ' खेळ जीवनाचा,
शह-मात हा एकच नियम
डाव चातुर्याने जिंकण्याचा ॥१॥
खेळावी लागते चाल तिरपी
कधी ती असते सरळसोट,
हिमालयी स्वप्ने गाठताना
पदोपदी होते ससेहोलपट ॥२॥
मृत्युचे भय, राजा भयभीत
प्यादा मात्र खिंड लढवतो,
श्रेय घेऊन जातो बादशहा
पटलाबाहेर प्यादा जातो ॥३॥
मोहरे सगळे असतात इथे
परमेश्वर खेळतो ही खेळी,
जरी पटावरती सारे समान
काहींची मात्र रिकामी झोळी ॥४॥
चतुरंगी कोडे कपोलकल्पित
अर्धवट मात काय कामाची?
पुन्हा घडवाया विश्वनाथन
व्यूहरचना अतिव महत्वाची ॥५॥
