बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
जगाचा पोशिंदा तो बाप माझा शेतकरी
दिन रात राब राबतो तो त्याच्या शिवारात
शेती त्याची फुले आकाशातल्या मेघांवर
वरुणाची झाली कृपा तर असे तो आनंदात.
वाडवडिलांच्या जमीन तुकड्यावर तो राबतो.
बी बियाणाकरता सावकारी कर्ज लागते घ्यावे
अनियमित येणाऱ्या पावसामुळे तो डगमगतो
कर्जबाजारी होऊन कुणी गळी फास लावे.
असंच करायला गेला होता माझा बाप
मी लहान असलो तरी अडवले मी त्यास
मीच बनलो बापाचा बाप समजावले त्याला
बाप रडला पण विश्वास ठेवला माझ्यावर खास.
बापाला दिलेल्या शब्दाला जागून मी शिकलो
खूप कष्टाने घेतले शिक्षण कृषी तंत्रज्ञानाचे
आणि केला त्याचा उपयोग बापाच्या शेतावर
नियतिने ही बदलले तारे आमच्या नशिबाचे.
आज शेती फुलते माझ्या बापाची जोमाने
कर्ज पण नाही घ्यावे लागत सावकाराचे
पण कधी नियतिचा खेळ असे निराळा
मेघ राजाचे बरसणे असे अनियमितपणाचे.
माझा बापच असे शेतीचा राजा जगामध्ये
मागतो मागणे मी एक फक्त देवबाप्पाकडे
पावसाचे येणे जाणे होऊ दे नीट पिकांप्रमाणे
पसरावे न लागो बापाला हात कोणाकडे.
