अर्थाविन
अर्थाविन


दफ्तराचे ओझे वाहता वाहता
पदव्यांचा ढीग जमा होत राहिला
पोकळ अभिमानाने मान ताठ होत गेली.
पण
पाठीचा कणा मात्र वाकत राहिला
उपाशीपोटी ढेकर देत
पिढ्या घडवताना
आभासी तत्वज्ञान रचत चाललोय
कौशल्याचा बोजवारा उडाला अन
सत्तेची आयाळ कुरवाळत
पत्ताच लागला नाही
सरून गेलेल्या आयुष्याचा.
बाजारात हिंडुन फिरून
भाजी घ्यायचं धाडस होत नाही,
रिकाम्या खिशात हात जाताना
मनात विचार घोळत राहतो
घरातील विकून टा
कावा का
पाळलेला ढिगारा पुस्तकांचा
व्यवहारज्ञान देणारी शाळा
आता सापडत नाही कोठेच
गोल्डन जुबली इंग्रजाळलेल्या स्कूलमधून
सौंदर्यशास्त्राचे धडे घेताना
जगण्याचं अर्थशास्त्र कुठे पसार झालं
हे कळलंच नाही,
अभ्यासक्रमाची चाळण करताना
आर्थिक स्वावलंबनाचे धडे
दिसलेच नाहीत कुठे.
जीवनाला हवा असतो अर्थ म्हणून
अर्थपूर्ण साक्षर व्हायला हवं होतं,
गुलामीतल्या जगण्यात खरंच
अर्थाविन असतो काय पुरूषार्थ?