विश्वरुप गळताना
विश्वरुप गळताना
1 min
11.6K
एक पहाट अंकुरे
अर्क घेऊन रात्रीचा
पाय झाडता दिव्यांनी
गळे साठल्या स्वप्नांचा
स्वार्थ मोजती दारात
सूर्यकिरणे कोणाची
क्षण होई भूतकाळ
घाई चालली मनाची
एक मध्यान्ह ओसाड
रूपे छताला दाखवी
कोलाहल जीवाणूचा
मिळे धुळीस एकांगी
रिती होते सायंकाळ
चुकता ठेका नृत्याचा
अंतस्वर आवर्तने
छेद घेती पाण्याचा
उजाडली रात्र नवी
चंद्र घेऊन मुठीत
गाणी ठिबकली मंद
प्राण मातीच्या ओठित
चक्राकार जिंदगीला
काळ छिलुन घेताना
रंग फुलांचे उडाले
विश्वरूप गळताना