शाळा आणि माती
शाळा आणि माती


शाळा आणि मातीची
नाळ शोधताना
शब्दांच्या गर्भात
लागला कवितेचा शोध
गर्द रानात भर दुपारी.
कवीची मस्ती
आणि चुकलेली पावलं
आषाढ-श्रावणसरीत
सर्व प्रश्न अनिवार्य सोडवताच
तळ ढवळतो पोशिंदयाचा.
विस्कटलेली चौकट
सांधायचा सायास
आणि दिगंतरीचा प्रवास
सुरू असतानाच कवडसे येतात
डोंगरापलीकडून
चांदणवेल फुलवण्यासाठी.
झोपडीतल्या निरंजनाच्या
प्रकाशात सापडतोच
एक धागा सुखाचा
मातीचे अभंग गाताना
तेव्हा सजतात शिवारांगणात
सहा ऋतूंचे सोहळे
आभाळाच्या पोटाखाली
अन फुटतात धुमारे
आयुष्याला सर्जनशीलतेचे.
तेव्हा
शाळा आणि मातीचा निकाल
उत्तीर्ण येत नाही काय ?