अकांडतांडवी निसर्ग
अकांडतांडवी निसर्ग
माणसा-माणसांत उद्रेकलेला
विद्रोहाचा धगधगता,
पेटता ज्वालामुखी,
जुलमी बेड्यांविरूद्ध,
अनिष्ट प्रथांनी-अपप्रवृत्तींनी
बरबटलेल्या
ह्या समाजाविरूद्ध
आग ओकू पाहत आहे,
निसर्गही मानवाचा
हा विद्रोह पाहून,
आता त्याचं वाटेने
स्वतःला धाडत आहे...
होयं,
निसर्ग ही आता
विद्रोह करू लागला आहे,
संहार करणार्या मानवाचा
सूड घेऊ लागला आहे,
निसर्गाचे युद्ध
हे समस्त मानवजातीशी,
मानवी हुकुमशाही दडपण्या,
तो
एक बंडखोर झाला आहे...
पिढ्यानपिढ्या केला
मानवाने निसर्गाचा मानसिक छळ,
स्वतःचा संसार उभारण्यासाठी
वन्यप्राण्यांची घरे
बळकावली,
निसर्गाच्या काही लेकरांना तर,
जन्मण्याआधीचं
निर्दयतेने त्याने उपटून काढले,
काही गरोदर वृक्षांच्या
उदरात वाढणार्या बीजांची
निर्घृणपणे हत्या केली,
पाठीचा कणा झुकलेल्या
काही वृक्षांना तर त्यांच्या ऐन वार्धक्यातचं कुर्हाडीचे घाव
सोसाया लावले,
वृद्धाश्रमात धाडलेल्या
मानवाच्या वृद्ध मात्या-पित्यांसारखे,
त्या वृक्षवल्लींचा
अनादर करणारा
हाचं तो मानव,
त्यात नवल ते काय !
बहरणार्या वसंत ऋतुला,
पानगळीच्या अभिशापात
रंगवून टाकले,
फळा-फुलांनी लगडलेल्या बागांना रिक्त-ओसाड केले,
वनराईचा अनहद ध्वनी माणसाला कधी ऐकूचं गेला नाही,
मुक्या वनराईच्या मुकेपणाची ही कैफियत...
हृदय नसलेला,
निरिंद्रिय,
फक्त हाडामासाने
वाढत चाललेला,
हा मानव नावाचा
सामाजिक प्राणी
निसर्गावर अधिराज्य गाजवू पाहत आहे.
निसर्गाचा हा उर्मट लेक
दिवसेंदिवस
स्वैराचारी बनत चालला आहे,
अन्यायाला सहन करण्याची परिसीमा आता निसर्गाने गाठली आहे,
आता मात्र तो पार खवळलेला आहे,
अकांडतांडव करू लागला आहे...
शांत किनार्याचे सोंग घेऊन,
फेसाळलेल्या जलधीच्या मुखवट्यात,
ह्या त्सुनामी नावाच्या
समुद्री वादळासारखा
दडून बसलेला आहे.
त्याचा राग जर अनावर झाला
तर, समस्त मानवगण
युद्धभूभीवर
गर्भगळीत होऊन
पडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
मोठ्या अभिमानाने वृक्षसंहार करताना
जी कुर्हाडी-करवतींसारखी शस्त्रास्त्रे त्याने वापरली,
अरे ती शस्त्रास्त्रेसुद्धा
निष्प्रभ ठरतील,
ह्या निसर्गाने दिलेल्या प्रत्युत्तरापुढे...
सांग की मानवा,
आता तुला तारणहार कोण ते?
निसर्गातील सर्व घटकांनी
एकी साधून आता
मानवाला धडा शिकवायला
सुरूवात केली आहे,
"ओखी" नावाची
"चक्रवादळी ढाल"
किनारपट्टीची खरडपट्टी
काढत आहे,
"पिसाटलेला वारा"
अनियंत्रितपणे वाहू लागला आहे,
थंडीच्या गुलाबी मोसमात, घननीळ्या मेघांनी
झाकोळलेल्या नभी
विद्युल्लता माई
तांडव नृत्य
करू लागली आहे,
निनादणार्या मेघांचा
प्रचंड असा मेघनाद
हृदयाच्या ठोक्यांची
गती वाढवत आहे,
हवामान उपडे-पालथे झाले आहे,
डुलणारी शेतपिके निःष्प्राण होऊन पडली आहेत,
धुळीच्या कणांनी युक्त असे
धुके
व
धूर ह्यांचे
विलिनीकरण होऊन,
"धुरके" नावाची तळपती तलवार
हवेत सर्वत्र लटकत आहे,
धरणीचा कंप घडवून आणण्यात
निसर्गाला यश मिळत आहे,
मानवहानी-वित्तहानी बेसुमार करून,
मानवाला सळो की पळो करून सोडलं आहे...
निसर्गाचे संतुलन बिघडवणारा मानव
आज
स्वतःच्याचं
आरोग्याचे संतुलन बिघडवून बसला आहे,
मानवाने केलेल्या अपमानाचा बदला निसर्ग पुरेपूर घेत आहे...
आता इथवर काही तो थांबणार नाही,
आक्रमण करण्याची एक ही संधी तो गमावणार नाही...
जितक्या खालच्या स्तराला माणूस गेला आहे,
निसर्गसुद्धा त्याची बरोबरी करू पाहत आहे...
महापूराचा प्रचंड हाहाकार,
दुष्काळाची भयंकर नामुश्की,
जैवसंरक्षक ओझोनची पडझड,
पर्यावरणाची अमापनीय नासधूस...!
धोक्याच्या रेषेखाली
मानवगण
पार भरडला गेला आहे.
स्वतःच खोदलेल्या विहिरीत,
पाय घसरून पडला आहे...
इतिहासाच्या खांद्यावर बसून भविष्याचा वेध घेणार्या मानवा,
"वेळीच सुधार घडवून आण, नाहीतर तुझं काही खरं नाही",
अशी दमदाटी निसर्ग करू लागला आहे.
प्रकोप हा विकोपाला जाऊ लागला आहे.
माणसांचे-माणसांशी युद्ध तर रोजचेच,
आता निसर्गाची भर ही त्यात पडली आहे.
हे मानव,
निसर्ग नव्हे तुझा वैरी,
तो तर तुझा "पालनकर्ता"
तेव्हा,
थांबव हा घातपात,
थांबव हा निसर्गसंहार,
नाही तर,
विद्रोहाच्या वेषात
पुनःश्च अवतरेल
हा निसर्ग नावाचा "नटसम्राट"...
