Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

नासा येवतीकर

Others

5.0  

नासा येवतीकर

Others

अपेक्षाभंग

अपेक्षाभंग

5 mins
1.5K


अपेक्षाभंग

आज सरिताच्‍या डोक्‍यात विचाराचं काहूर उठलं होतं. डोकं अगदी सुन्‍न झालं होतं. काय करावं आणि काय नाही याच विचारात ती तशीच झोपी गेली. तिच्‍यासमोर दोनच पर्याय ठेवण्‍यात आले होते. एक तर गुमाने संसार करणे आणि दुसरे म्‍हणजे श्‍यामरावांशी फारकत घेवून नौकरी करणे. या दोन पैकी कोणता पर्याय निवडावे याबाबत तिच्‍या मनात वावटळ उळलं होतं. तिचं जीवन एक सारीपाट सारखं झालं होतं. ज्यात तिला सर्वस्व सांभाळत आपला गड सुद्धा शाबूत ठेवायचं होतं. 

सरिता ही मध्‍यमवर्गीय कुटूंबातील सुसंस्‍कृत घरातील समजदार आणि हुशार मुलगी. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई घरकाम करत होती. तिच्‍यापेक्षा लहान एक भाऊ असा छोटा व सुखी परिवारात वाढलेल्‍या सरिताला दु:खाचा लवलेश ही माहित नव्‍हता. आपण खुप शिकावे आणि यशस्‍वी जीवन जगावे असे तिला वाटत होते. मुलींच्‍या शिक्षणाच्‍या बाबतीत जीवनात असं काही बिकट प्रसंग घडेल की त्‍यावेळी आपणाला हे आजपर्यंत शिकलेल्‍या पदवी प्राप्‍त केलेल्‍या ज्ञानाचा त्‍याग करावं लागेल, याची साधी कल्‍पना सुद्धा केली नव्‍हती. शाळेमध्‍ये शिकतांना शिक्षक तिला प्रश्‍न विचारायचे "सरिता, तुला शिकून काय व्‍हायचं आहे?" तर तिचं उत्‍तर ठरलेले असायचे, “सर, मला शिकून डॉक्‍टर व्‍हायचं आहे आणि रूग्‍णांची सेवा करायची ईच्‍छा आहे." खरोखरच तिची बुद्धीमत्‍ता सुद्धा तशीच होती. पहिल्‍या वर्गापासून तर नवव्‍या वर्गापर्यंत ती अव्‍वल नंबरवरच होती. सा-याच विषयात ती अगदी हुशार व तल्‍लख होती. कोणताच विषय तिला कठीण असे वाटत नव्‍हते. ती एक प्रेमळ, मायाळू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारी मुलगी होती. त्‍यामूळे शाळेत ती सर्वांची आवडती होती. ती एका चांगल्‍या शाळेत शिकत होती जेथे सर्वच प्रकारचे संस्‍कार नकळतपणे मुलांवर करण्‍यात येते होते. त्‍यास्‍तव तिच्‍यावर खुप चांगले संस्‍कार झाले होते. घरात सुद्धा वातावरण अत्‍यंत चांगले असल्‍यामूळे तिला इतर काही दु:खदायक किंवा क्‍लेशदायक बाबींची जाणिवच नव्‍हती. ती मनाने धाडसी व साहसी होती. कठीण प्रसंगी स्‍वत:ला सावरून घेण्‍याची शक्‍ती तिला आयुष्‍यातील एक दोन घटनांनी दिले ज्‍यामूळे तिचा अपेक्षाभंग झाला.

अपेक्षेप्रमाणे मॅट्रीकच्‍या परीक्षेत नव्‍वद टक्‍के गुण मिळवीत तीने स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. बारावीच्‍या परीक्षेत सुद्धा अपेक्षेप्रमाणे विशेष प्राविण्‍यासह उत्‍तीर्ण झाली. तेव्‍हा सर्वांनाच खुप आनंद वाटला. आता फक्‍त सेट परीक्षेत चांगले गुण मिळविले तर तिचा डॉक्‍टर होण्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण होणार होते. पण दैवाने इथेच साथ दिली नाही. दोन वेळा प्रयत्‍न करून सुद्धा तिला चांगले गुण मिळवता आले नाही. बी.एस्‍सी. किंवा बी.ए. करण्‍याचा अजिबात विचार नव्‍हता. काही जणांनी डी.एड्. करण्‍याचा सल्‍ला दिला. तो घरच्‍यांना पटत होता परंतु तिला पटत नव्‍हते. शेवटी घरी रिकामं बसण्‍यापेक्षा डी.एड्. केलेलं बरं म्‍हणून तीने तिथे प्रवेश घेतला.

दिवस असे मजेत जात होते. सरिताला डॉक्‍टर व्‍हायचं स्‍वप्‍न भंग पावलं म्‍हणून दु:ख वाटत होतं. सोबतच शिक्षिका म्‍हणूनही जनतेची सेवा करता येतेच की या विचाराने तिला दिलासाही मिळत होता. ती लग्‍नाच्‍या वयाची झाली, याची जाणिव आई-वडिलांना तेव्‍हाच झाली होती. तिचे हात पिवळे करावे आणि मोकळं व्‍हावं असं आईला नेहमी वाटत होतं. तसं तीने एके दिवशी आपलं मन मोकळं केलं आणि लग्‍न करायचेच असं ठरविलं. परंतु सरिताने स्‍पष्‍ट नकार दिला. ती पाहुणचार म्‍हणजे बघण्‍याचा कार्यक्रम करण्‍यासाठी सुद्धा तयार नव्‍हती. परंतु आईच्‍या आर्जव विनंतीमूळे तयार झाली. बँकेत चांगल्‍या पदावर काम करणा-या शामरावांनी स्‍वत:हून आई-वडिलांकडे गळ घातली. त्‍याला मुलगी पसंद होतीच फक्‍त औपचारिकता पूर्ण करणे बाकी होते. सरिता तशी दिसायला सुंदर होती. नाकी-डोळी छान, रंग गोरा-गोरा पान या गीताप्रमाणेच ती होती. शामरावांनी आपली पसंती “होकार” कळविली तसे घरात चलबिचल सुरू झाली तर हिच्‍या मनात विचाराचं काहूर उठलं.

सरिताच्‍या मनात आत्‍ताच एवढ्या लवकर लग्‍न करायचे नव्‍हते. डी.एड्. पूर्ण केल्‍यानंतर एक-दोन वर्षे शिक्षिका म्‍हणून अनुभव घेऊनच लग्‍न करावे असा तिचा विचार होता. मात्र आई-वडिलांना वाटत होते की, यापेक्षा चांगले स्‍थळ मिळणार नाही. पोरीनं नशीब काढलं आई-वडिलाचे मन दुखवायचे नव्‍हते आणि शिक्षण ही सोडायचे नव्‍हते. करावे काय? अश्‍या दुहेरी पेचात ती पडली होती. शेवटी ती लग्‍नाला तयार झाली पण एका अटीवर “माझे डी.एड्. चे शिक्षण पूर्ण करू देत असाल तरच मी लग्‍न करेन” अशी गळ शामरावांसमोर टाकली. यात शामरावांना काही अडचण जाणवली नाही. डी.एड्. चा अर्धा वर्ष तर सरला आत्‍ता राहिले दीड वर्ष.. लगेच शामरावांनी होकार भरला आणि तुळशीचे लग्‍न लागले की सरिता व शामराव यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्‍यात संपन्‍न झाला. ती नववधू सासरी आली. बघता बघता दिवाळी सुट्टया संपल्‍या. दिवस कसे सरले हे दोघांनाही कळाले नाही. उद्या डी.एड्. चे कॉलेज सुरू होणार त्‍याच्‍या आदल्‍या रात्री शामराव व सरिता यांच्‍यात पहाटपर्यंत चर्चा रंगली. शामराव म्‍हणत होते, “जाऊ दे ना, काय डी.एड्., बी.एड्. लावलीस? माझा पगार काय कमी आहे का?” यावर सरिता आपल्‍या निर्णयावर ठाम राहिली, डी.एड्.पूर्ण करणार म्‍हणजे करणारच! लग्‍नाच्‍या अगोदर माझी अट काय होती? माहित आहे ना! “शामराव एक पाऊल मागे घेतले आणि तिचा मार्ग मोकळा झाला. लढाई जिंकल्‍याच्‍या तो-यात ती कॉलेजात जाऊ लागली.

सुरूवातीचे काही दिवस मजेत गेले कारण सरिता घरीच राहत होती. परंतु आता तिचा कॉलेज सुरू झाल्‍यापासून त्‍या दोघांत रोजच कुरबुर चालू झाली. पहाटे उठल्‍यापासून तर रात्री झोपेपर्यंत दोघांमध्‍ये नेहमी वाद-वाद होऊ लागले. तिची कॉलेजला जायचा वेळ आणि शामरावांचा बँकेत जायचा वेळ एकच त्‍यामूळे सकाळची भरपूर घाई असायची. शामराव पुरूषी रूबाबात तिला ऑर्डर द्यायचा आणि ती स्‍वयंपाक घरातून जोरजोरात बोलायची. सायंकाळी शामराव “मूड” मध्‍ये असायचा परंतु कॉलेजातली स्‍वाध्‍याय, गृहपाठ, पाठाची तयारी यामध्‍ये ती गुंग असायची. कधी कधी तो वाट पाहून वाट पाहून झोपी जायचा मात्र ती गृहपाठ पूर्ण केल्‍याशिवाय झोपायची नाही. या अशा वागण्‍यामूळे तो पूरता त्रस्‍थ झाला होता. कधी एकदा तीचं डी.एड्. पूर्ण होते असं त्‍याला वाटू लागायचं. त्‍यातच शासनाने सहा महिने आंतरवासिता करण्‍याचा नियम काढला तेव्‍हा तर शामरावाचे अजून सहा महिन्‍याचा वनवास वाढल्‍यासारखे वाटले.

तिची आंतरवासिता कालावधी संपतो न संपतो निकाल ही लागला आणि ती प्रथम श्रेणीत उत्‍तीर्ण झाली. तेव्‍हा दोघांनाही खुप आनंद झाला. तिला चांगले गुण मिळाल्‍यामुळे तिला जिल्‍हा परिषदेचा शिक्षिकेच्‍या नौकरीचा कॉल आला. ती कॉल लेटर पाहून आनंदाने नाचू लागली होती. तिची मनोमन खुप ईच्‍छा होती की आपण ही नौकरी करावी. ही संधी सोडू नये. तिचा स्‍वप्‍न साकार होणार असे वाटत असतांना शामराव मात्र या नौकरीच्‍या विरोधात होता. नौकरी करून काय करणार? माझा पगार आपल्‍या संसारासाठी पुरेसे नाही का? मी तुला डी.एड्. चे शिक्षण पूर्ण करून देण्‍याचे वचन दिलो होतो मात्र नौकरीचं वचन तर दिलो नव्‍हतो ना! तू जर नौकरी करू लागलीस तर जे दोन वर्ष आपण दु:ख अनुभवले ते आयुष्‍यभर अनुभवणार का? सर्वप्रथम आपण ठरवायचे की, आपणाला पैसा हवा आहे की, मानसिक सुख. याउपरही तू आपल्‍या निर्णयावर ठाम राहत असशील तर तुझयासमोर एकच पर्याय तू माझयापासून फारकत घे आणि खुशाल नौकरी कर.

याच विचारात रात्रभर तिला झोप लागली नाही. काय करावं सुचेना शाळेत शिकतांना तिच्‍या अपेक्षा खुप मोठ्या होत्‍या. परंतु आज त्‍या शिक्षणामूळे तिला संसार तोडायची पाळी येते की काय असे वाटत होते. काही अशी शामरावाचे तिला योग्‍य वाटत होते, की पैसा कमावून मनाला समाधान नसेल तर तो पैसा काय कामाचा? यापेक्षा घर सांभाळून सुखी राहण्‍यात काय वाईट आहे! आपल्‍या जवळ असलेल्‍या ज्ञानाचा वापर शाळेत करता आले नाही म्‍हणून काय झालं स्‍वत:चे संसार सुखी करण्‍यासाठी या ज्ञानाचा वापर करता येत नाही काय? मनात पक्‍का विचार करून अंथरूणातून उठली संसार या पर्यायावर टीक मार्क करून शामरावांना गरमागरम चहा दिला. लगेच जेवणाचा डबा दिला. शामराव समाधानाने बँकेत गेले. सरिता आपल्‍या सर्व अपेक्षांचा त्‍याग करून झोक्‍यावर बसून रेडिओ सुरू केली त्‍यात "जिंदगी का सफर है, ये कैसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं” हे गाणे चालू होते. अखेर तिने आपल्या वजीरा ला वाचविण्यासाठी सारे पर्याय संपविले होते. तिच्या मनाचा अपेक्षाभंग झाला होता मात्र त्यामुळे ती सारीपाट जिंकत होती हे तिला महत्वाचे वाटले.


Rate this content
Log in