यशाचा झरा
यशाचा झरा
यशाचा झरा
कोणतेही यश आपल्याला घरबसल्या मिळत नाही. यश प्राप्ती मिळवण्यासाठी कार्याची गरज असते.
यशाचे ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावेच लागतात.
मला अमुक गोष्ट जमणार नाही. मी प्रयत्न करून पाहिले तर जमेल की नाही अशा प्रश्नांची उत्तरं स्वतःकडेच असतात.
कोणत्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त करायचे असेल तर मला हे जमत नाही, मला हे जमणार नाही, मी कधी केलंच नाही आणि माझ्याकडून हे होणार नाही असे जर का म्हटले तर आपल्याला यश प्राप्त होणार नाही. क्षणा क्षणाला आपला आत्मविश्वास कमी होत जातो त्यामुळे माणसाने कुठेही खचून न जाता प्रत्येक यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न हे केलेच पाहिजेत प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते.
प्रथम न जमणारी गोष्ट तुम्ही आनंद घेत केली तर पाहता पाहता तुमच्या बऱ्याच गोष्टी सहज साध्य व्हायला सुरुवात होतात. फक्त कुठेतरी सुरुवात करणे महत्त्वाचे असते.
कधीतरी केलेली सुरुवात ही कधीही न केलेल्या सुरवातीपेक्षा केव्हाही चांगलेच म्हणावे ना!
प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असते पण या स्वप्नांना काही मर्यादा असतात या स्वप्नांचा पाठलाग करायचं म्हटलं तर आपल्याला त्या स्वप्नांच्या ध्येयपूर्तीसाठी कुठेतरी सुरुवात करावी लागते. आपल्या स्वतःच्या पंखात बळ आणावे लागते. शब्दांना विचाराचे पंख लावावे लागतात. कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि मग जे यश संपादन होते ते गगनचुंबी असते.
यश संपादन केल्यानंतर मिळणारा आनंद जो आहे तो अवर्णनीय असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वतः अनुभव घेतलेला असतो. तो अनुभव जास्त प्रगल्भ आणि महत्त्वाचा ठरतो.
स्वप्नांची पूर्तता करताना लोक काय म्हणतील लोक मला हसतील का याचा जर का विचार केला तर आपण कोणतेही कार्य पूर्ण करू शकत नाही. यासाठी लोक काय म्हणतील हा विचार आपल्या मनातून काढून टाकावा. आपण कसेही वागलो काहीही केलं तरी लोक नाव ठेवतातच. समोर जरी कोणी नाव ठेवले नाही तर आपल्या पाठीमागे निश्चित नाव ठेवणारे लोक आहेत आणि ह्या लोकांच्या मुळे आपण पुढे यश प्राप्तीसाठी जाऊ शकतो हे माझे स्वतःचा अनुभव आहे.
जर आपण प्रयत्न केले आणि आपल्याला यश प्राप्ती झाली नाही तर आपणास अपयश पचवण्यास सुद्धा ताकद लागते. ती ताकत आपल्याकडे आपसूकच येते. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की आपण ते कार्यपूर्ती करण्यासाठी त्यासाठी झटलेलो आहोत कष्ट केलेले आहेत. होते असे कधी कधी अपयश पदरी पडते. म्हणून अपयश हाती घेऊन फिरू नये पुन्हा त्याच्यासाठी प्रयत्न करावेत.' अपयश हे पडण्यात नाही तर पडून उभे न राहण्यात अपयश आहे.' एकदा अपयश येईल दुसऱ्यांदा अपयशील तिसऱ्यांदा तर यश मिळेल आपल्याला. हा विचार ध्यानी म्हणे ठेवून आपण कार्यपूर्ती नेहमीच करावी. जोपर्यंत आपल्या मनाची तयारी अशी होत नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात तरळत असतात पण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी केल्याने आपल्याला यश प्राप्ती हमखास मिळते हे विसरू नये.
उदा :-
1) एखाद्या व्यक्तीला बिझनेस मध्ये जर का घाटा आला तर तो बिझनेस सोडून देणार का? तर नाही त्या बिजनेस मध्ये त्यांनी आपल्याला का घाटा झाला? याचा विचार करून पुढील पावले टाकताना जपून टाकावीत आणि पुन्हा यशप्राप्ती मिळवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले,विचार, अभ्यास करून प्रयत्न केले तर त्याचा बिझनेस पुन्हा उभा राहू शकेन. यालाच यशप्राप्ती म्हणतात. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात.
कोणत्याही कृतीशिवाय केलेला विचार हा पांगळा असतो. कोणतेही वैभव प्राप्त करण्यासाठी आपल्याला सततचा सराव, सातत्य,चिकाटी, मेहनत करायलाच लागते.
मन मारून जगायचं की मन भरून जगायचं हे आपण ठरवायचं आहे. आपल्या आयुष्याचा रंगमंच जो आहे तो आपल्याला सुगंध देणाऱ्या शब्द पाकळ्यांनी सजवायचा आहे की सतत शाब्दिक टोचणी देणाऱ्या काट्यांनी मिळवायचा आहे हे आपल्या हातात आहे.
कोणतीही कृती करण्यासाठी आपल्याला ज्यापासून प्रेरणा मिळते तो प्रेरणा स्त्रोत काही काळापुरता मर्यादित ऊर्जा देऊ शकतो. आपल्या अंतर्मनाचा ठाव जोपर्यंत आपलं अंतर्मन घेत नाही तोपर्यंत बदल हा होत नाही. यशप्राप्ती मिळत नाही.
आयुष्याच्या शेवटी आपली जीवन पालखी पूर्णत्वास न्यायची असेल तर आपल्याला कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य सिद्धी केलीच पाहिजे कष्टाची पालखी उचललीच पाहिजे.
जीवन अनमोल आहे, देवाने एकदाच दिलेले आहे, ते आनंदात, सुखात जगायचे की कष्ट उपसत जगायचे हे प्रत्येकाच्या मनावर आणि हाताच्या मुठीवर म्हणजे कर्तुत्वावर अवलंबून आहे. त्याच्या वैचारिक मांडणीवर अवलंबून आहे. मानवाला मिळालेल्या मैत्रीच्या ठेव्यावर अवलंबून आहे. कुटुंबातील सदस्यांच्या विचारांवर अवलंबून आहे. हे जरी सर्व असेल तरी स्वतःच्या विचारांवर ठाम राहून आपले जीवन स्वतः माणसाने छान आनंदी, सुखी घडवावे, जगावे. यालाच तर यशाचा झरा असे म्हणतात आणि हा यशाचा जरा झुळझुळत राहावा आपल्या प्रत्येकाच्या जीवन नेहमीच सदिच्छा!
वसुधा वैभव नाईक, पुणे
धनकवडी,जिल्हा -पुणे
मो. नं. 9823582116
