व्यसन
व्यसन
व्यसन
आज सगळं गाव दु:खात बुडालं होत. हळहळ व्यक्त होत होती. बापाच्या सरणाला पोराने विस्तू लावण्याऐवजी आज पोराच्या सरणाला बाप विस्तू लावीत होता हे चित्र गावातील लोकांना देखवत नव्हते. परंतु काळासमोर कोणाचे चालते, जे व्हायचं ते होऊनच राहते. अखेर आबा पाटलांच्या मुलाने पहाटे पहाटे झोपेतच दम तोडला. वर्षभर खाटल्यावरच होता, आज जाईल कि उद्या याचा काही नेम नव्हता. माणसाला झटपट करण यावं, असं तडपून तडपून मरण येवू नये अशी चर्चा गावातल्या लोकांत जास्त पाप केलं की कुत्र्यासारखचं मरण येते हे भाविक मंडळीचे म्हणणे. पण त्या वेळेला आबा पाटलांच्या डोक्यात काय विचार चालले असतील? ते स्वत:लाच दोष देत होते. माझ्यामुळेच..... फक्त माझ्या या वागण्यामूळे, व्यसनामूळे माझ्या मुलाचा जीव गेला. मी विचार करून वागलो असतो, तर ही वेळ माझ्यावर नक्कीच आली नसती असा विचार करून आबा पाटील लहान मुलांसारखे ओक्साबोक्सी रडू लागले. धनुष्यातून निघालेला बाण आणि मागे पडलेली वेळ ही कधीच परत येत नसते.
आबाजी रावसाहेब पाटील हे नुसते पाटीलच नव्हते तर त्या गावचे वीस वर्षे ते सरपंच होते. त्यामूळे ते बोलतील ती पूर्व दिशा, त्याच्या डोळ्याला डोळा सुद्धा भिडवायची कोणाची हिम्मत नव्हती. पंचवीस-तीस एकर जमीन, चार पाच सालगडी शेतात काम करायला, चार-पाच बायका घरकाम सांभाळायला. पाच पन्नास लोकांच्या पत्रावळ्या रोजच उठत होते. देवाने त्यांना काही कमी केलं नव्हतं परंतु लग्न होऊन पाच वर्षे झाले तरी मूल होईना. तेव्हा मोठ्या महादेवाला पाटलीन बाईंनी नवस केला तेव्हा शिवरात्रीला शंभू महादेवच घरी जन्मला. त्या दिवशी पाटलांना ही खूप आनंद झाला. सगळ्या गावाला पाटलांनी गोड जेवण दिलं. अख्या पंचक्रोशीत पाटलांचा दबदबा होता म्हणून खूप लोक आली. सगळीकडे आनंदी आनंद, पाटलांनी त्याचं नाव संभाजी ठेवलं परंतु सगळं गाव त्यांना शंभू पाटील म्हणूनच हाक मारीत होते.
गोरापान, काळेभोर केस, गरगरीत डोळे, असा शंभू पौर्णिमेच्या चंद्रासारखा मोठा होऊ लागला. पाटलाचा एकुलता एक नवसाचा मुलगा त्यामूळे प्रत्येकजण तळहाताच्या फोडासारखं जपत होते. पाटील तर त्यास “संभाजी राजे” म्हणून हाक मारीत. सदान् कदा पाटलांच्या मांडीवरच बसायचा, पाटला सोबत उठायचा अन् त्यांच्यासोबतच झोपायचा. पाटलाचा मुलगा म्हणून कोणी त्यांच्यासोबत भांडण करायचे नाही मग शंभू पाटील जसे म्हणतील तसे ती पोरं करायची. दिवसा मागे दिवस जाऊ लागले. शंभु लहानाचा मोठा झाला. त्याच्या हेकाटीपणामूळे पोरं त्याच्यासोबत खेळेनाशी झाली. शंभू आला की ते दुसरीकडे जाऊ लागली. त्याला कोणी मित्र करून घेण्यास तयार नाहीत. रडका चेहरा करीत तो आबा पाटलाकडे जात आणि या मुलांची तक्रारी करीत. मग आबा पाटील रागात काही तरी बोलून त्याला तेथेच बसवीत. चार-पाच लोक गोल वर्तुळात बसलेली, त्यांच्या हातात बदकाची रंगीत पानं, त्याच्यात होणारी चर्चा ही शंभू पाटलाला नित्याची झाली होती. करमणूक व्हावी आणि वेळ निघावा यासाठी पाटलाचे काही हौशी मित्र रोजच पत्ते खेळायला यायचे आणि दिवसभर त्यांचा डाव चालू राहायचा. शंभू पाटील रोजच आबाजवळ बसून बारीक निरीक्षण करायचा. हळूहळू शंभूला जोकर पासून राणी व गुलाम पर्यंतची पाने कळायला लागली. रंगजमणी खेळता खेळता त्यास चुकत माकत रम्मी सुद्धा जमू लागली. असेच एके दिवशी आबा पाटलांच्या हातात रमी होती परंतु त्यांनी पान फेकणार एवढ्यात शंभू म्हणाला, “बाबा, रम्मी झाली, तुम्ही पान का फेकता?” म्हणत त्याने आबाच्या हातातील पत्ते जुळवून रम्मी करून दाखविली तेव्हा आबा पाटील त्याच्या पाठीत शाबासकी देत “व्वा रे संभाजी राजे, आज तुम्ही माझे पाचशे रूपये वाचविलेत.” शंभूला सुद्धा त्या शाबासकीने खूप बरे वाटले. आत्ता रोजच शंभू आणि आबा एकत्रित विचार करीत रम्मी खेळू लागले. आबांना रोज सायंकाळी घोटभर औषध (शंभूला हे दारू नसुन माझं झोपेचं औषध आहे असे ते नेहमी सांगत) घेतल्याशिवाय झोपच येत नसे. औषध घेतलं की बाब
ा मस्त झोपतात हे शंभू रोजच पाहत असे.
गावात जिथपर्यंत शाळा होती ती पूर्ण झाली. आपल्या पोराला खूप शिकवायचं म्हणून त्याला तालुक्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलं. गावात सगळ्याचा लाडका असलेला शंभू शहरात कोणाचा काय लागतो? सातवीपर्यंतचे शिक्षण त्याचे असे तसेच झाले. त्यामूळे त्याचे शाळेत मन लागत नव्हते ना अभ्यासात. सदा न् कदा तो चिंताग्रस्त. त्याची चिंता दूर करण्यासाठी तशीच काही मुले त्याचे मित्र बनले. त्याची मैत्री गाढ झाली. ती सर्व मंडळी शाळेत कमी आणि खोलीवर जास्त राहू लागली. अभ्यासाच्या नावाने बोंबाबोंब, दिवसभर ही पोरं पत्ते कुटू लागली. शंभूनी सर्वांना रम्मी कसे खेळतात हे शिकवलं मग त्याची बैठक वाढतच गेली. बाबाचं औषध काय असतं हे इथल्या मित्राकडून कळालं. कधी रात्री झोप न आल्यास तो सुद्धा औषध घेऊ लागला. शंभूकडे पैश्याची काही कमी नव्हती आणि आबाकडे मुलांच्या अभ्यासात लक्ष्ा देण्यास वेळ नव्हता. शंभू काय करतो? याकडे जरा सुद्धा लक्ष न देता पैसे मागितले की त्यापेक्षा जास्त पैसा त्याच्या हातात देऊन पाटील मोकळे.
शंभू कॉलेजात जाऊ लागला तसा तो अजून स्वैर बनला. बार मध्ये जाणे, धाब्यात खाणे आणि क्लबात जाणे ही नित्याची बाब झाली. यात कधी कधी तो वाईट मित्राच्या संगतीमूळे बाईकडे वळला. जसे त्याचे बाईकडे पाय वळले तसे ते पाय पुन्हा परत आलेच नाहीत. व्यसनामूळे शंभू आत्ता पूर्ण वाया गेला होता ही बाब आबा पाटलांना कळाली तसं आबाचं काळीज फाटलं. शंभूला लगेच गावी बोलावून घेण्यात आलं. बिघडलेल्या पोराला वळणावर आणण्यास लग्नाच्या बेडीत अडकविण्याचा विचार करून आबा पाटील त्याची सोयरीक बाजूच्या माधवराव पाटलांच्या मुलीशी जुळवलं. संभाजीचं लग्न मोठ्या थटामाटात झालं. आबांना वाटलं की, पोरगं आता पटरीवर येईल आणि सर्व काही सुरळीत होईल.
शहरात शाही, मौजमजेत राहिलेल्या शंभूला हे जीवन पिंज-यात राहिल्यासारखे वाटत होते. बाहेरची मजा चाखलेला शंभू बायकोला समजून घेतला नाही. तिच्यासोबत रोजच हिडीस – फिडीस त्यामूळे घरात अशांतता दिसत होती.
त्या दिवशी रात्रीचे जेवण आटोपून सर्व आपापल्या अंथरूणावर अंग टेकले होते. तेवढ्यात शंभूच्या खोलीतून मोठ्याने रडण्याचा आवाज आला. आबासह सर्व लोक धावले. शंभू चक्कर येऊन पलंगाजवळ पडला होता. आबांनी लगेच गाडी काढली आणि सर्वजण तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी नाडी तपासून आज रात्री येथेच मुक्काम करण्यास सांगून काही औषधं दिली. थोड्या वेळानंतर शंभूला जाग आली, त्याला बरे वाटू लागले परंतु डॉक्टरांना भेटल्याशिवाय जायचे नाही असं आबांनी ठरवलं. सकाळ झाली. डॉक्टर दहाच्या सुमारास दवाखान्यात आले. त्यांनी सर्वप्रथम याच शंभूकडे आले परत नाडी तपासली आणि रक्त व लघवी तपासण्यासाठी पाठविले. आबांच्या चेह-यावर चिंतेची एक रेघ स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांना त्यांनी मनात भिती बाळगत विचारले सुद्धा “काय झालं असेल, डॉक्टर?” “रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगु शकत नाही” असे डॉक्टर म्हणाले. थोड्याच वेळात लघवी व रक्ताचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी रिपोर्ट वाचल्यानंतर आबाला एका बाजूला बोलावले आणि शंभूला एड्स झाले असल्याची माहिती दिली. आबाचं काळीज ठिक-या ठिक-या होऊन जमिनीवर पडले. परंतु ही बाब आबांनी कोणासही सांगितले नाही. काही तरी कारण सांगून अंगाची हळद ही निघाली नाही त्या मुलीसोबत फारकत केलं. शंभूला महारोग झाल्याची कल्पना गावाला झाली परंतु त्यास एड्स म्हणतात हे आबांनी त्यांना जाणू दिलं नाही. दिवसामागं दिवस सरू लागले तसा शंभू अजून बारीक होऊ लागला, खोकला वाढतच राहिला. अखेर त्या दिवशी पहाटे पहाटेच आबाच्या मांडीवर डोकं ठेवून शंभू शांत झोपी गेला. त्याचा जीव दारूच्या व्यसनानेच घेतला परंतु या व्यसनाची मूळ सवय घरातून मिळाली याची बोच अजूनही आबाच्या मनात सलत होती.
नागोराव सा. येवतीकर,
मु. येवती, ता.धर्माबाद, जि.नांदेड.
9423625769