Tejashree Pawar

0  

Tejashree Pawar

वेळ चुकली ( भाग २)

वेळ चुकली ( भाग २)

3 mins
2.2K


दिवस असेच चालले होते. उत्कंठा वाढत होती आणि अस्वस्थताही. मनाची इतकी घालमेल कधी झालीच नव्हती. इतकी चलबिचल सहन होईनाशी झाली. जे काही मनात चालेले आहे ते कोणालातरी जाऊन सांगावे असे झाले. सख्ख्या मैत्रिणीला सांगितले. थोडे बरे वाटले. तरीही समाधान मात्र वाटेना. शेवटी त्यालाच सांगून टाकावे असे वाटले. पण हिम्मत होईना. कधी चुकून प्रयत्न झालाच तर तोंडातून शब्दच फुटत नसत. दिवस जात राहिले आणि शब्द तोंडातच राहिले....

कॉलेज ची वर्ष सरू लागली आणि वयानुसार समजूतदारपणाही ..... काही जाणिवा नव्याने विस्तारू लागल्या. मनाची चौकट ओलांडून काही विचार त्याबाहेरही डोकावू लागले. आपल्या स्वप्नांची दुनिया ह्या जगाच्या पूर्ण विपरीत आहे, अचानक जाणवले. आपल्या समाजाच्या चौकटींच्या बाहेरची आहे, हे कळून चुकले. ह्या सर्वाला विरोध करून आयुष्य फुलवायची इचछा नव्हती आणि हिम्मतही. आणि तेही अश्या वेळेस जेव्हा समोरची व्यक्ती आपलीच आहे याची शाश्वतीही नाही. आता मात्र मन काढता पाय घेऊ लागले. ते रात्र रात्र जगणे, हवं तेव्हा आठवण काढणे, जिथे तिथे त्याच व्यक्तीला शोधणे, त्याच्या विचारानेच मन फुलून जाणे, सारेच हळू हळू कमी होऊ लागले ....कमी केले जाऊ लागले. यामागे प्रखर जाणीव होती. आपल्या वाट्याला ह्या नात्यात मैत्रीपलीकडे काहीच नसल्याची. 'प्रेम' ह्या संकल्पनेपासूनच तो अनभिज्ञ असल्याची . बळजबरीने करण्याजोगी ही गोष्ट नसल्याची .

या जाणिवेबरोबर नकळत वागणेही बदलले. त्याच्यापासून हरेक प्रकारे दूर जाण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्याच्या आसपास भटकण्याची ती सवय गेली. पण मैत्री तिच्या जागी तशीच होती. त्याला हवं तेव्हा हवी ती मदत करणे, त्याच्यासाठी प्रत्येकवेळी उपलब्ध असणे, त्याची काळजी घेणे हे सर्व चालूच होते. अवघड होतं तसं.... प्रेम आणि मैत्री यांच्या सीमारेषा ठरवायच्या होत्या. एकमेकांपासून त्यांना दूर ठेवायचे होते. त्यादृष्टीने प्रयत्नही चालू होते. त्रास होणे स्वाभाविक होते. मन अनेकदा भरून येत, भावना दाटून येत आणि मग डोळ्यांत अश्रूंची गर्दी जमे. मनावर ताबा मिळवणे इतकेही सोपे नव्हते पण खंबीर बनण्याचे केव्हाच ठरले होते.

नशिबाने आता उलटा खेळ खेळायचे ठरवले होते. तिच्या जीवापाड मैत्रीची किंमत आता कळू लागली होती. तिच्या वागण्यात होऊ लागलेले बदल आता जाणवू लागले होते. तिचे ते तुरळक बोलणे त्याला अस्वस्थ करू लागले. एखाद्या वेळी तिचे उपलब्ध नसणे त्याला नाराज करू लागले. छोट्या छोट्या गोष्टींत तिची काळजी करणे सुरु झाले. तिचे इतर मुलांसोबत बोलणे आवडेनासे झाले. भावना त्याच, वागणे तेच फक्त व्यक्ती आता बदलली होती. आणि एक मोठा फरक होता. तिला ह्या सर्वांची जाणीव होती पण त्याला नव्हती. ह्या सर्वाला काय म्हणतात हेच त्याला ठाऊक नव्हते तिला गृहीत धरण्याचा त्याचा स्वभाव कायम होता. मैत्रीण म्हणून का असेना पण ती आपलीच आहे अशी त्याची समजूत होती. गोड गैरसमज अर्थातच. मनात कुठल्याश्या भावना येत, पण त्या अजून तितक्याशा तीव्र नव्हत्या . 'ती ' मैत्रिणीवरून आता 'जिवलग मैत्रीण ' बनली होती.त्याच्या प्रत्येक समस्येचं उत्तर असणारी , त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणारी. तिच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जाई कळतच नसे. तो क्षण संपूच नये, असे वाटे. त्याच्या सगळ्या भावनांना तिथे मोकळी वाट मिळत असे. तिच्या संगतीत सर्वच भार हलके वाटत; पण सर्वच गोष्टी आयुष्यात नेहमी तश्याच राहात नसतात. कॉलेजचे दिवस संपू लागले तशी ही जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. गोष्टी दूर जाऊ लागल्या की त्यांची किंमत कळू लागते. ती सर्व सहज स्वीकारत होती. मनाची तयारी तिने केव्हाच केली होती. हे सर्व तिच्यासाठी आता मैत्रीपलीकडे काहीच नव्हते. त्या साऱ्या भावना , ती ओढ, उत्कंठा हे सर्व तिने केव्हाच मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवले होते. त्या कप्प्याची चावी तिने नियतीच्या हाती सुपूर्द करून दिली होती. आयुष्यात कुठल्याच अपेक्षा ठेवायच्या तिने बंद केले होते. कॉलेज संपणार होते आणि पुढे येणाऱ्या नव्या भविष्याला स्वीकारण्यास ती केव्हाच सज्ज झाली होती.


Rate this content
Log in